October 14, 2024
The launch of CAR-T cell therapy in cancer
Home » Privacy Policy » कर्करोगावरील सीएआर-टी सेल उपचारप्रणालीची सुरुवात
काय चाललयं अवतीभवती

कर्करोगावरील सीएआर-टी सेल उपचारप्रणालीची सुरुवात

आयआयटी बॉम्बे, टाटा मेमोरियल केंद्र आणि इम्युनोॲक्ट यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या कर्करोगग्रस्त रुग्णांसाठीच्या भारतातील पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचारप्रणालीचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुंबईत आयआयटी बॉम्बे अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था, येथे कर्करोगावरील सीएआर-टी सेल म्हणजेच टी पेशीआधारित उपचारप्रणालीची सुरुवात करुन तिचे लोकार्पण केले. याप्रसंगी  महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस , आयआयटी, मुंबई या संस्थेचे संचालक प्रा.शुभाशिष गुप्ता, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक प्रा.सुदीप गुप्ता, शैक्षणिक तसेच पायाभूत सुविधा विषयक व्यवहार विभागाचे उपसंचालक प्रा.एस.सुदर्शन, वित्त आणि परराष्ट्र व्यवहार विभागाचे उपसंचालक प्रा.के.व्हि.के. राव यांच्यासह, आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेले प्रा,राहुल पुरवार तसेच मुंबई येथील टाटा मेमोरियल केंद्र येथे कार्यरत डॉ.हसमुख जैन आणि शस्त्रक्रिया विभाग तज्ञ डॉ.गौरव नरुला यांच्यासारखे उपरोल्लेखित उपचार पद्धतीमधील महत्त्वाचे भागधारक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की भारताच्या पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात ही कर्करोगाविरुध्दच्या आमच्या लढ्यातील मोठी प्रगती आहे. “सीएआर-टी सेल उपचार प्रणाली” असे नाव असलेली ही उपचार पद्धती सुलभतेने तसेच किफायतशीर दरात उपलब्ध होणार असल्याने संपूर्ण मानवजातीसाठी ही उपचार प्रणाली नवी आशा देणारी ठरली आहे. ही उपचारप्रणाली असंख्य कर्करोग ग्रस्तांना नवजीवन देण्यात यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की सीएआर-टी सेल उपचार प्रणाली ही वैद्यकीय शास्त्रातील सर्वात अभूतपूर्व प्रगतीसंबंधित बाबींपैकी एक समजली जाते. विकसित देशांमध्ये काही काळापासून ही प्रणाली उपलब्ध आहे, मात्र ती अत्यंत खर्चिक असल्याने जगभरातील बहुतांश रुग्णांच्या आवाक्याबाहेरील आहे. आज सुरु करण्यात आलेली उपचार प्रणाली ही जगातील सर्वात किफायतशीर सीएआर-टी सेल उपचार प्रणाली आहे हे समजल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला.

मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था,बॉम्बे आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्यातील सहयोगासह आणि इम्युनोअॅक्ट या उद्योग क्षेत्रातील भागीदाराच्या सहकार्याने भारताची ही पहिलीच सीएआर-टी सेल उपचार प्रणाली विकसित करण्यात आली आहे हे समजल्यावर राष्ट्रपती मुर्मू यांनी आनंद व्यक्त केला. देशातील शिक्षणक्षेत्र आणि उद्योगक्षेत्र यांच्यातील भागीदारीचे हे उत्कृष्ट उदाहरण असून त्यातून अशा पद्धतीच्या इतर प्रयत्नांना प्रेरणा मिळेल असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी, उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल रमेश बैस यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल आयआयटी बॉम्बे, टाटा मेमोरियल केंद्र तसेच इम्युनोॲक्ट या संस्थांच्या पथकांचे अभिनंदन केले.या प्रकल्पासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी उद्योग क्षेत्रातील भागीदारांची देखील प्रशंसा केली. उपस्थितांना उद्देशून केलेल्या भाषणात ते म्हणाले, “आज आपल्या देशासाठी आणि विशेषत्वाने आयआयटी मुंबई तसेच टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. देशातील दोन प्रमुख संस्थांनी एकत्र येऊन वैद्यकीय क्षेत्रातील हा अत्युत्कृष्ट उपक्रम सुरु केला आहे. आज आपण काही प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यात मदत करणाऱ्या नव्या कर्करोग उपचार प्रणालीची सुरुवात तर करतच आहोत.

कार्यक्रमात सुरुवातीला केलेल्या स्वागतपर भाषणात, आयआयटी बॉम्बे या संस्थेचे संचालक प्रा. शुभाशिष चौधरी म्हणाले, “स्वदेशी पद्धतीने पेशी-आधारित उपचार पद्धती विकसित करु शकणाऱ्या जगातील निवडक देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आपल्या देशातील कर्करोग रुग्णांना मदत करण्याच्या उद्देशाने हे लक्ष्य साध्य करण्यासाठी गेल्या दशकभरात अनेक अडचणींवर मात करत एकत्रितपणे अथकपणे काम करणाऱ्या अनेकानेक शास्त्रज्ञांच्या, डॉक्टरांच्या, नर्सेसच्या तसेच या विषयाशी संबंधित अनेकांच्या प्रयत्नांचा हा पुरावा आहे.”

याप्रसंगी बोलताना, टाटा मेमोरियल केंद्राचे संचालक डॉ.सुदीप गुप्ता म्हणाले,“पहिल्या स्वदेशी सीएआर-टी सेल उपचारपद्धतीच्या विकसनासाठी झालेली आयआयटी(बी) आणि टाटा मेमोरियल केंद्र यांच्यातील ही भागीदारी अत्यंत फलदायी तसेच समाधानदायक ठरली आहे.ही सीएआर-टी सेल उपचार प्रणाली भारताबाहेर उपलब्ध असलेल्या अशा पद्धतीच्या उत्पादनांच्या तुलनेने अत्यंत कमी खर्चात कर्करोगग्रस्तांचे जीव वाचवण्यात उपयुक्त ठरेल. येत्या काही वर्षांमध्ये आपल्या सहयोगातून विविध प्रकारच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांना लाभदायक ठरणाऱ्या इतर पेशीय आणि जनुकीय उपचार विषयक उत्पादनांचा विकास करता येईल अशी आम्हांला आशा वाटते.”  

इतर मान्यवरांसह आयआयटी बॉम्बे या संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक गण तसेच टाटा मेमोरियल केंद्र आणि इम्युनोॲक्ट या संस्थांची पथके देखील या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

सीएआर-टी सेल उपचारपद्धतीविषयी माहिती:

नेक्ससीएआर19 सीएआर-टी उपचारपद्धती ही शिक्षण क्षेत्र आणि उद्योगक्षेत्र यांच्या भागीदारीतून स्वदेशी पद्धतीने भारतात पहिल्यांदाच विकसित करण्यात आलेली सीएआर-टी उपचार प्रणाली आहे. नेक्ससीएआर19 ही जगातील सर्वात किफायतशीर सीएआर-टी उपचारपद्धती आहे आणि या प्रणालीच्या विकसनामुळे पेशी तसेच जनुकीय उपचार पद्धती विषयक जागतिक नकाशात भारताचे स्थान पक्के झाले आहे. टाटा मेमोरियल केंद्र आणि इम्युनोॲक्ट यांच्या संपूर्ण सहयोगासह प्रा.राहुल पुरवार आणि त्यांच्या पथकाने आयआयटी बॉम्बे या संस्थेतील बीएसबीई विभागात सदर उपचारप्रणाली विकसित केली. 

सीएआर-टी सेल उपचारपद्धतीवर आधारित व्हिडिओ –

https://immunoactmumbai-my.sharepoint.com/:f:/g/personal/atharva_karulkar_immunoact_com/Ensx2lW8LNhAq1aHYk_Op-YBUW2D5WvPUorrNEIbGHl4GQ?e=SJVnjz

इम्युनोॲक्ट या संस्थेची माहिती:

आयआयटी बॉम्बे या संस्थेतून वर्ष 2018 मध्ये वेगळी झालेली इम्युनोॲक्ट ही संस्था भारताच्या पहिल्या स्वदेशी पेशी आणि जनुकीय उपचार प्रणालीच्या विकास कार्यातील देशातील अग्रणी संस्था आहे.रक्ताच्या कर्करोगावरील उपचारासाठी अशा पद्धतीची प्रणाली विकसित करण्यापासून या संस्थेचे कार्य सुरु झाले असून आता या कार्याचा वेगाने विस्तार होत आहे. देशातील कर्करोगग्रस्तांना किफायतशीर दरात नॉव्हेल ऑटोलॉगस सीएआर-टी सेल उपचारप्रणाली उपलब्ध करून देणे हे या संस्थेचे ध्येय आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading