January 20, 2025
Cauvery A triumphant story of struggle against personal and social ills Dr Aparna Patil Book
Home » “कावेरी”: वैयक्तिक व सामाजिक व्याधींविरुध़्द केलेल्या संघर्षाची विजयगाथा    
मुक्त संवाद

“कावेरी”: वैयक्तिक व सामाजिक व्याधींविरुध़्द केलेल्या संघर्षाची विजयगाथा    

डॉ. अपर्णा पाटील यांच्या कावेरी या इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद पुण्यातील मैत्री प्रकाशनच्यावतीने येत्या २५ जानेवारीला प्रकाशित होत आहे. पुणे येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या परांजपे हॉलमध्ये हा प्रकाशन सोहळा सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास होत आहे. या निमित्ताने या कादंबरीविषयी…

अनेकविध आशयसूत्रांनी एकत्र बांधलेल्या कावेरी या कादंबरीचा मध्यवर्ती विचार अनंत अडचणींमधूनही सकारात्मक विचारांनी संकटांवर मात करता येते, कदाचित एकरेषीय पध्दतीने नव्हे तर बहुविध मार्गांनी, असा आहे.

माया पंडित

“कावेरी” ही अपर्णा गजानन पाटील यांची पहिली इंग्रजी कादंबरी. या कादंबरीची आता अनुवादीत मराठी आवृत्ती प्रकाशित होत आहे. त्याआधी त्यांनी अनेक पुस्तके, बालकथा, कथा, स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया यांच्या विषयी लिहिलेली आहेत. परंतु कावेरी ही कादंबरी या चोखाळलेल्या वाटा सोडून थोड्या वेगळ्या वाटेने जाऊ पहाते. आत्मचरित्रावर आधारित कादंबरीच्या अंगाने या पूर्वीही स्त्रियांनी असे प्रयत्न केले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ वानगीदाखल सांगायचे तर ’आदोर’ असो वा ’फिंद्री’ या दोन्ही बहुवचर्चित कादंबऱ्या ह्या खरेतर आत्मचरित्रात्मक कादंबऱ्याच आहेत.

खरे तर सारेच साहित्य एका अर्थाने लेखकाला आलेल्या अनुभवांवर आधारित असे पण आत्मचरित्रावर आधारलेल्या कादंबऱ्या विशेषत: स्वत:च्या ’स्व’ जाणिवेच्या विकासातील प्रवासाची काही विशेष नोंद घेतात, त्यातील टप्पे दाखवतात आणि आयुष्याचे सिंहावलोकनही करतात. कधी कधी हे सिंहावलोकन हंसा वाडकरांच्या आत्मचरित्रासारखे एखाद्या कबुलीजबाबाच्या अंगाने जाते, तर कधी ते त्या स्वजाणिवेच्या विकसनातील काही टप्पेही दाखवते. अपर्णा पाटील यांच्या लेखनात या दोन्हींचा मिलाफ जाणवतो. स्त्रियांच्या लेखनात हा प्रवाह अलिकडे बराच जाणवतो.

स्रियांनी लिहिलेल्या अशा स्वरूपाच्या लेखनाचे महत्व गेल्या काही दशकांपासून खूप तीव्रतेने अधोरेखित करण्यात आले आहे. कैक शतके समाजाने मूक रहाण्याचे कुलुप स्रियांच्या तोंडाला घातले होते. त्यांच्या भावना, आशा, आकांक्षा, जीवनानुभवांचे कथन या साऱ्या गोष्टी चारचौघात बोलणे गैर मानले होते. याला अपवाद मौखिक परंपरेचा! पण आता मात्र  शिक्षणाची उपलब्धी, स्रियांचे बदलते स्थान व अनुषंगाने त्यांच्या “स्व”बद्दलची बदलती जाणीव यांचा परिपाक म्हणून असे लेखन होताना दिसते. आजवरच्या अशा प्रकारच्या लेखनात अपर्णा पाटील यांनी एक पुढचे पाउल टाकले आहे. जरी ती एक आत्मनिवेदनपर कादंबरी असली तरी कावेरीचा विषय वेगळाच आहे. तिला झालेल्या एका विलक्षण दुखण्याची आणि त्याविरुध्द तिने दिलेल्या प्रदीर्घ लढ्याची कथा ती आपल्यापुढे मांडते.

कावेरी ही अपर्णा पाटील यांच्या कथनातील नायिका. आजीआजोबांच्या, आईबापाच्या लाडाची लेक, नातेवाईकांना प्रिय असणारी हुशार मुलगी, मित्रमैत्रिणींच्यामध्ये लोकप्रिय, शाळेतील चमकदार कामगिरीने शिक्षकांना आवडणारी … लहानपणी अंगाने गुबगुबीत असणाऱ्या या मुलीची चेष्टामस्करी होते आणि तिला एक दुर्धर मानसिक विकार ग्रासतो.  तिच्या मनात अन्नाविषयी विलक्षण नावड निर्माण होते, हा हा म्हणता तिचे वजन भीषण वेगाने कमी होते.  तिच्याबद्दलच्या इतरांच्या शैक्षणिक यशाच्या अपेक्षा आणि तिचे त्यांना नकार देऊन परतवणे यातून तिच्या मनातले शल्य महाभयानक वेगाने तिच्या जीवनानंदाचा, जगण्याच्या इरेसरीचा ग्रास करू लागते. डॉक्टर होण्याच्या तिच्या स्वप्नाचा चुराडा होतो आणि अतिशय बुध्दिमान अशा या मुलीच्या साऱ्या शैक्षणिक स्वप्नांचा चुराडा होतो.

       कादंबरीच्या सुरवातीच्या भागात तिच्यावर कोसळलेल्या या व्याधीच्या संकटांच्या विविध परिणामांचे वर्णन आहे आणि उर्वरित भाग तिच्या लढाईचा आहे, मात्र कथानकाची मांडणी ही इतक्या एकरेषीय पध्दतीने होत नाही. वर्तमान आणि भूतकाळ या दोन्हींमध्ये सातत्याने तिच्या मनाच्या येरझारा चालू असतात. ही रचना खूपदा स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेसच्या पध्दतीने होत रहाते. वर्गात क्लास घ्यायला सज्ज होऊन जाणारी प्राध्यापक तिच्या निवेदनाचा  एक प्रारंभबिंदू होते तर तिला शाळेपासून तो प्रवास कसकसा करावा लागला ह्याचे निवेदन पुढच्या (खरेतर मागच्या)  काळाच्या   टप्प्यावर येते. त्यातून मात्र आपल्याला जडलेया या व्याधीचा मुकाबला करायला कशी सज्ज होते याचे वर्णन पुन्हा काळाच्या निसरत्या टप्प्यांवर येत रहाते. त्या तिच्यावर उपचार करणारे अनेक डॉक्टर्स, तिच्या घर व भवतालातील अनेका व्यक्ती आणि त्यांच्याशी तिचे असलेले कधी अवलंबित्वाचे तर कधी हृद्य प्रेमाचे संबंध एखटाद्या सराइत कथाकाराच्या लेखणीतून उतरावे तसे येत रहातात. हे सारे मुळातूनच वाचण्यासारखे आहे पण त्यात जाणवणाऱ्या काही आशयसूत्रांचा निर्देश मात्र इथे केला पाहिजे.

       एक आशयसूत्र आहे ते तिला झालेल्या आजाराचे. त्याला सर्वसाधारणपणे  ऍनोरेग्झिया म्हटले जाते. शरीराचे वजन, आपल्या शरीराचा आकार यांच्याबद्दल व्यक्तींच्या मनात काही विशिष्ट कल्पनांचा इतका पगडा असतो किंवा तयार होतो  की त्यातून खाण्याबद्दलची एक भीतीच तयार होते. याला कोणतीही कारणे असू शकतात. आपल्या मित्रमैत्रिणींच्या मस्करीपासून ते सौंदर्याच्या मूर्खपणाच्या कल्पना पौगंडावस्थेत मनावर बिंबवणारे हजारो घटक. (बार्बी ही बाहुली त्याचे प्रतीकच आहे म्हणून जगभरातील स्त्रिया त्या खेळण्याला विरोध करतात. बार्बीच्या शरीराची मापे इतकी विलक्षण अशक्य आहेत की तसे शरीर असणे कोणालाच शक्य नाही तरीही हजारो मुलींना बार्बीसारखे व्हायचे असते!) ) पण त्याचे परिणाम मात्र अत्यंत धोकादायक असतात. ते शारीरिक, मानसिक असतात. खाण्यावरची वासना संपतेच. जराही खाल्ले की ते उलटी येऊन बाहेर पडते. तुमच्या स्वप्रतिमेला कमालीची झळ बसते. असे लोक खूपदा प्राणही गमावून बसतात कारण वजन कमालीच्या बाहेर घटते आणि ज्या कॅलरीज व अन्नघटक शरीराला आवश्यक आहेत तेही घ्यायला शरीर मना करते. विशेषत: स्त्रिया या प्रकारच्या डिसऑर्डर्सना बळी पडतात. कावेरी ही या प्रकाराच्या रोगाच्या मनोवस्थेची बळी आहे. त्याच्याशी तिने केलेला प्रदीर्घ संघर्ष हे यातले एक आशयसूत्र आहे.

       त्याशिवाय अन्य आशयसूत्रात प्रथम मोडते ते व्यावसायिक क्षेत्रातल्या विशेषत: प्राध्यापकी करणाऱ्या तथाकथित बुध्दीमान समजल्या जाणाऱ्या  माणसांचे एका वेगऴयाच ’आजाराने’ ग्रासलेले जग. विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानक्षेत्राचे संगोपन व जोपासना यांचे बीजारोपण करणाऱ्या या व्यावसायिकांचे मनाचे क्षेत्र, आणि ज्ञानाचेही क्षेत्र, कधीकधी इतके संकुचित, स्वार्थांध, आणि असुरक्षिततेने ग्रासलेले असते की त्यांना त्यांच्यापेक्षा कोणी अधिक चांगले असेल तर त्याचे फार भय वाटते. म्हणजे एका अर्थाने त्यांना नव्या ज्ञानाचाच ऍनोरेक्झिया आहे! ऍनोरेक्झियाच्या पेशंटला जसे अन्नाचे वावडे तसे त्यांना ज्ञानाचे!  कोणत्याही नव्या ज्ञानाचा वाराही त्यांच्या चित्ताला लागायला नको असे त्यांना वाटते. मग त्यापायी ते स्वत:च्या मनाची दारे इतकी घट्ट बंद करतात की त्यांची सारासार विचारशक्ती संपून जाते. विवेकाचा विलय होतो. ज्या विद्यार्थ्यांसाठी ते मुळात असतात त्यांच्याबद्दल त्यांना काडीचीही बांधिलकी वाटत नाही. आपापले गट बनवणे व त्यातून न आवडणाऱ्या प्राध्यापकांविरुध्द (बहुधा ते अधिक चांगले व विद्यार्थीप्रिय असतात म्हणून) बिनडोक राजकारण ’खेळणे’ हा त्यांचा आवडता छंद असतो. नोटस घेऊन वर्गात काय ते बोलले की शिकवण्याची इतिश्री! सुदैवाने अशा ’आजारी’ प्राध्यापकांची संख्या आपल्याकडे त्यामानाने कमी आहे पण ते असतात जरूर.

खूपसे विशेषत: नवे प्राध्यापक आणि खूपदा जुने प्राध्यापक देखील आपल्या विषयातल्या नव्यनव्या ज्ञानाचे उपासक असतात आणि ते खरोखरी विद्यार्थ्यांना ज्ञानसंपादनाच्या नव्या मार्गावर नेतात, व्यावसायिक प्रगल्भतेसाठी वेगवेगळे अनौपचारिक मार्गही चोखाळतात आणि त्यांना अभ्यासात रस असतो, स्वत:च्या आणि विद्यार्थ्याच्याही. अनेकदा प्राचार्यही खूप उत्तम प्रशासक असतात. आपल्या शाळा वा महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीचा ध्यास घेतलेले असतात. नायिकेच्या व्यावसायिक जीवनात तिच्या प्राध्यापक म्हणून जगण्यात तिला आलेले विविध कडूगोड अनुभव जितके दाहक आहेत तितकेच चैतन्यपूर्ण आहेत. आपल्या प्राध्यापक म्हणून असलेल्या ’पोटेन्शिअल’ची जाणीव करून देणारे प्राचार्य, आणि विद्यार्थीही, यांच्या अनोख्या आणि अतिशय मानवी नात्यांचा आलेख तिला काढता येतो तो या अनुभवांचे चित्रण करण्यातून. एक प्राध्यापक आणि तेही कॉमर्सच्या विद्याशाखेतल्या एका अवघड विषयाची स्त्री प्राध्यापक म्हणून, वर्गात विद्यार्थ्यांच्यासमोर बावचळून मूक उभी राहिलेली एक मुलगी त्या भयावर मात करीत त्या विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानदानाच्या औपचारिक व अनौपचारिक अशा विविध मार्गांनी कसे जिंकते त्याचा  वस्तुपाठच “कावेरी”मधून मिळतो. त्यात जसे एखाद्या विषयावरचे ज्ञानसंपन्न असे व्याख्यान देणे असो वा त्यांना प्रॅक्टिकल कामांचा अनुभव यावा म्हणून बॅंकाना भेटी देत काही व्यावहारिक शिक्षण देणे असो, किंवा अकादमिक जर्नल चालवणे व त्यांना लिहिते करणे असो. ती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकते हा तिचा एक मोठाच विजय आहे. तो तिचा शिक्षणाला ग्रासून राहिलेल्या काही आव्हांनांवर मिळवलेला विजय आहे. शिक्षकांच्या विद्यार्थ्यांकडे पहाण्याच्या अवहेलना करणाऱ्या दृष्टीने दुखावून शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ती विविध मार्गांनी परत वर्गाकडे कसे वळवते हे पहाणे मनोज्ञ ठरते. अर्थात या प्रवासात तिचे काही सहकारीही तिला साथ देतात, शाळेतील जुने निवृत्त शिक्षक आणि तिच्या महाविद्यालयाचे प्राचार्यही तिला मदत करतात, हेही खूप महत्वाचे आहे. 

       आणखी एक आशयसूत्र आहे ते तिच्या भोवताली असणाऱ्या दु:खाचे, विशेषत: ग्रामीण भागातील मुली व स्त्रिया यांच्या अभावग्रस्त जीवनाचे. शिकणाऱ्या मुलींना शिक्षणाच्या संधी नाकारल्या जाणे, घरकामासाठी लहान भावंडे सांभाळण्यासाठी शाळा सोडून द्यावी लागणे, विविध शारीरिक, मानसिक कोंडमाऱ्यांना तोंड देत भुकेसकट, कपड्यालत्त्यांच्या गरजा न पुरवल्या जाण्या पासून ते सततचे घरकाम, आरोग्याबद्दलची कमालीची अनास्था अशा सर्व संकटांना सतत सामोरे जाणे, शिक्षक वा अन्य पुरुषांच्या घाणेरड्या नजरांना तोंड देत कसेबसे स्वत:चे संरक्षण करणे… या सर्वांचे चित्रण “कावेरी” मध्ये आढळते. महत्वाचे आहे ते म्हणजे स्वत: इतरांवर अवलंबून असणारी, स्वत;ला कमालीची दुर्बळ समजणारी कावेरी त्या स्त्रियांसाटी एक अत्यंत सशक्त असा आधारवड बनते. कावेरीचा हा प्रवास अतिशय स्तिमित करणारा आहे. आपल्याला झालेल्या गंभीर आजाराचे भान कावेरीला सर्वांगीण पध्दतीने येणे, आणि मग ते वास्तव स्वीकारून एकदा आपल्या पेक्षाही अनेकपटींनी दुबळ्या असलेल्या या महिलांचे, त्यांच्या गरजांचे, जीवनाचा अधिकार शाबूत ठेवून त्यांना ज्या गरजा असतील त्या पुरवण्याचा प्रयत्न करत त्यांना एक मूलगामी असे स्वभान देणे आणि त्यांना  त्यांचे आयुष्य घडवण्यासाठी समर्थ बनवणे हे प्रत्यक्षात पाहिले तर अत्यंत आव्हानात्मक काम आहे.

मात्र  कावेरी ते स्वीकारते इतकेच नव्हे तर ते यशस्वीपणे पार पाडते, हा तिचा आयुष्यातील उपाधींवर  मिळवलेला विजय आहे!  तिच्या आजोबांच्या वाडेश्वर या गावातल्या वास्तवाशी तिने नीट ओळख करून घेणे, आजोबांच्या वाड्यातल्या बंद खोलीचे रहस्य तिला उलगडणे हे खूप महत्वाचे प्रसंग आहेत. ती खोली म्हणजे स्त्रियांना पारंपरिक जीवनपध्दतीत सोसाव्या लागलेल्या, विविध हक्क व अधिकार नाकारले जाण्यातल्या अबोल वेदनांचे प्रतीकच आहे. ती खोली खऱ्या व लाक्षणिक अर्थाने उघडल्यानंतर तिला परिवर्तनाची गरज तीव्रतेने जाणवते आणि मग ती गावातल्या स्त्रियांसाठी विविध उपक्रम चालू करते. त्याच्या तपशीलात जाण्यापेक्षा तिच्या वृत्तीत झालेला अत्यंत सकारात्मक बदल आणि तिचे कर्तेपण नव्याने आलेल्या आत्मभानाने कसे झळाळून उठते हे पहाणे महत्वाचे आहे. ते मुळातूनच वाचायला हवे. इतरांसाठी दीप होण्याचा तिचा हा प्रवास इतर स्त्रियांना अत्तदीप भव असे सांगतो व त्याच वेळी अन्य वाचकांना देखील एखाद्या दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरतो.

       कावेरीच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या व्यक्ती आणि त्यांच्याशी तिचे जुळलेले बरेवाईट अनुबंध हे या निवेदनातले आणखी एक महत्वपूर्ण आशयसूत्र आहे. तिचे आईवडील, तिचे विविध डॉक्टर्स, तिच्या घरात राहिलेली कोटीअम्मा, तिचा प्रेमळ भाऊ, तिचे मित्रमैत्रीणी हे तर आपापल्या प्रेमाचे छत्र तिच्यावर धरतातच. तिची मस्करी करणारे काही अति खट्याळ मित्र सोडा कारण त्यांना काही तिच्याबद्दल आकस वा शत्रृत्व नाही. तिचे शाळेतले बहुतेक शिक्षकही तिच्याबद्दल ममत्व असलेले आहेत.  त्यातही कोटीअम्माचे तिच्यावरचे प्रेम एखाद्या दैवी आशिर्वचासारखे तिच्यावर सतत आपले संरक्षक छत्र धरून रहाते. अनेक प्रसंगात ती तिची पाठराखण करते, अगदी तिच्या आईवडिलांना न कळू देताही. आजारातून बाहेर पडून आता यौवनात पदार्पण केल्यानंतर तिच्या प्रेमभावनांना साद घालणारा तिच्या वकील पित्याचा एक मदतनीस वकील तिला आपल्या कह्यात घेण्याचा प्रयत्न करतो. या साऱ्या रिलेशनशिपचे, त्यातील रोमान्सचे  आणि त्यातून झालेल्या फसवणुकीतून आलेल्या भयंकर नैराश्याचे चित्रण म्हटले तर पारंपरिक व म्हटले तर आधुनिक जीवनाचे एक चित्र आपल्यासमोर उभे करते. श्रीमंत व देखण़्या तरूण मुलींना आपल्या जाळ्यात पकडणे हा म्हटले तर एक पारंपरिकच प्रकार आहे. पण कावेरीची दुर्दम्य जीवनेच्छा त्यातूनही त्या फ्रस्ट्रेशनवर विजय मिळवून पुन्हा जोमाने जीवन जगायला तिला भाग पाडते, नव्या नजरेने स्त्रीपुरुष संबंधांकडे पहायला शिकवते, माणसांच्या मधल्या बऱ्यावाईटाची पक्की ओळख करून देते हे महत्वाचे. 

       अनेकविध आशयसूत्रांनी एकत्र बांधलेल्या कावेरी या कादंबरीचा मध्यवर्ती विचार अनंत अडचणींमधूनही सकारात्मक विचारांनी संकटांवर मात करता येते, कदाचित एकरेषीय पध्दतीने नव्हे तर बहुविध मार्गांनी, असा आहे. इंग्रजीतून लिहिलेली अन् आता मराठीत अनुवादीत केलेली ही बांधीव कादंबरी तिच्या सुलभ लेखन शैलीमुळे सर्वसामान्य वाचकांनाही नीट समजेल. तेव्हा या कादंबरीचे स्वागत करायलाच हवे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading