ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या साहित्य निर्मितीचा शताब्दी सोहळा कोल्हापूर येथे पार पडला. त्यानिमित्ताने…
‘आभाळीच्या पंखाखाली’ ‘झुंज ही वाऱ्या वादळाची’ यांनी आता “उंबरठा” ओलांडला आहे. मनःपूर्वक आंनद होतो ! नलगे सरांच्या व्यक्तिमत्त्वातली ही किती ऋजुता ! शंभर पुस्तकं लिहूनही त्या पुस्तकाचं शीर्षक ‘उंबरठा’ असं आहे. लिहिणाऱ्यांपुढं त्यांनी ही एक रेषा आखली आहे. साहित्य निर्माण करायचंच असेल तर असं करा! इतकं लिहा!
विष्णू पावले
शंभरी संस्थेची साजरी होते, माणसाच्या वयाची होते. पण साहित्यनिर्मितीची ? छे ! छे ! हे काय ‘आक्रीत..!’ होय, हे अपूर्व असं आक्रीत म्हणावं लागेल. किमान डॉ. चंद्रकुमार नलगे ज्या पर्यावरणातून आले, ज्या परिस्थितीशी झुंज देऊन आले; त्यामुळे तर अपूर्व असंच म्हणावं लागेल. थोडीथोडकी नव्हे, तब्बल शंभर पुस्तकं..! इथं एक लिहिताना शेंडीवरून पाणी. त्याची पहिली आवृत्ती खपायलाच पाच-पंचवीस वर्षे. पण यास नलगे सर अपवाद आहेत. हे सर्व त्यांच्या लेखनाविषयीच्या अनिवार ऊर्मीचं द्योतक आहे. त्यांच्या ऊर्जस्वल स्वभावाचं लक्षण आहे.
ज्यांनी ज्यांनी नलगे सरांना ज्या झफाट्यानं फक्त चालताना पाहिलंय, त्यांना त्यांना यापाठीमागचं इंगीत कळेल. हा काळ थोडाथोडका नव्हे, १९५२ ते आजवर असा प्रदीर्घकाळ त्यांची साहित्यनिर्मिती शारदीय चंद्रकळेप्रमाणे झळाळत राहिली आहे. ती जशी प्रारंभी प्राचीप्रभा होती, ती चैतन्यशील झाली. पण उत्साह तोच! त्यात तिळमात्र खंड नाही. नीलकंठेश्वरानं हलाहल पचवावं तसं घात-आघातांचं, दैन्य-दारिद्र्य डुयान डुया. प्रारंभीचं ते ‘चिनुपटाणं’ जग पुढं अक्षरा-अक्षरानं मागं पडत राहिलं. अक्षरांच्या संगतीनं आभाळ अक्षरांचं झालं. ते विस्तारत राहिलं. सतेज चेहऱ्यानं सर स्वतःसह सृष्टी-समष्टीकडे अधिक सजगतेने पाहत राहिले… आपल्याबरोबर इतरांना उभा करत राहिले… आणि असा साहित्यप्रकार उरला नाही, की ज्यात सरांचं पुस्तक नाही. ही खरी नवलाईची गोष्ट आहे! मी जे पर्यावरण म्हणालो ते यासाठीच. सातत्य, निष्ठा हे त्या नवलाईचे पंख आहेत. आणि हे ‘शब्दांगण’ प्रतिभेच्या पंखांवर आरुढ होऊन ‘काळांतरीच्या गोष्टी’ सांगत राहिले आहेत.
‘अनादिअनंत’ असे ‘आर्त अक्षरांचे’ ‘घुंगरांच्या तालावर’ ‘पठ्ठे बापूरावांच्या शोधात’ ‘चौदा चौकड्यांचं राज्य’ उलगडून दाखवत राहिले आहेत. आत्मचरित्र, चरित्र, लोककथा, व्यक्तिचित्रे, काव्य, प्रवासवर्णनं, समीक्षा, संपादनं…. कथा, कादंबरीबरोबरच ललितगद्य हा तर सरांचा जीव की प्राण!
नाकाबंदी करून आम्ही चोर-दरोडेखोर, छुपा माल पकडू; पण गुन्हेगाराच्या हृदयपालटाचं काय? यासाठी ‘गस्त’ वाचावी लागेल! साताजन्मीचा फेरा वडाला तिढा टाकून सुसह्य होणार नाही, तर त्यासाठी ‘अगीनफूल’ व्हावं लागेल! सरांचं साहित्य शिकवण देते ते याची. ते शाश्वत मानवी मूल्यांवर आधारित आहे. दुःखाचं बाशिंग बांधणारी माणसं या पानापानावर भेटतील. पण त्या नुसत्या ‘रेघोट्या’ नाहीत. तर ती ‘खंत शिवाराची’ सांगतील. ‘आगराळ’ व्यथा-वेदना कथतील. आपलं ‘मनरंग’ ओळखून ‘फणसाखालचं घर-शिवार’ उजळतील. ही ‘सावलीची झाडं’ ‘कल्पवृक्ष’ बनून सहृदयतेची शिकवण देतील. चांगुलपणावरचा विश्वास शाबूद ठेवतील कारण हे ‘डोळे वादळाचे’ आहेत. अनेक ‘जलम’ शोधत वारणामाईच्या पाण्यावर पोसले आहेत. कनसेच्या खोऱ्यातून ‘गस्त’ घालत राहिले आहेत. ‘अशीच एक ‘पांढरीची वाट” शोधत.. (खरे तर निर्माण करत) ‘गावपांढर’ म्हणून पंचगंगाकाठचा साहित्य’हुरडा’ समस्त मराठी जनास वाटत उभे आहेत.
‘आभाळीच्या पंखाखाली’ ‘झुंज ही वाऱ्या वादळाची’ यांनी आता “उंबरठा” ओलांडला आहे. मनःपूर्वक आंनद होतो ! नलगे सरांच्या व्यक्तिमत्त्वातली ही किती ऋजुता ! शंभर पुस्तकं लिहूनही त्या पुस्तकाचं शीर्षक ‘उंबरठा’ असं आहे. लिहिणाऱ्यांपुढं त्यांनी ही एक रेषा आखली आहे. साहित्य निर्माण करायचंच असेल तर असं करा! इतकं लिहा!
नलगे सर यांच्या शंभराव्या पुस्तकाचा शताब्दी साहित्यनिर्मिती सोहळा पार पडला. तुमचं साहित्य हा तर अक्षय ठेवा आहे. आम्हाला तो सदैव प्रेरक ठरत आला आहे. आजच्या-उद्याच्या विजा-वादळांना दीपस्तंभासारखा दिशादर्शी आहे. म्हणून कधी कधी वास्तवाच्या विराट खडकावर आपली नाव आदळून फुटेल, असं ज्या ज्या क्षणी वाटतं त्या त्या दिवसाच्या रात्री ‘चंद्रबनातल्या सावल्या’, ‘रातवा’ माझ्या उशाशी असतं.
विष्णू पावले
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.