June 16, 2024
Pune Distirct 29 Forts Maharanjachya Jahagiritun book by Sandeep Tapkir
Home » पुण्यात पदभ्रमंती करू इच्छिणाऱ्या डोंगरभटक्यांसाठी मार्गदर्शक असे पुस्तक
मुक्त संवाद

पुण्यात पदभ्रमंती करू इच्छिणाऱ्या डोंगरभटक्यांसाठी मार्गदर्शक असे पुस्तक

आपल्या किल्ल्यांची जरी आज खंडारं झाली असली तरी किल्ल्यावरचा प्रत्येक भग्न दगड आणि चिरा हा आपले पूर्वज शेवटपर्यंत परकियांशी प्राणपणाने लढल्याचा पुरावा देतात. यासाठी किल्ल्यांना जवळून पाहावे आणि तो इतिहास जाणून घेऊन त्यातून स्फुर्ती घ्यावी. किल्ल्यावरील प्रत्येक बुरूज हा आपणास जीवनात येणाऱ्या संकटांना भक्कमपणे सामोरे जा अशी प्रेरणा देतो. ‘महाराजांच्या जहागिरीतून’, पुणे जिल्ह्यातले 29 किल्ले’ हे संदीप तापकीर यांचे पुस्तक अशाच किल्ल्यांची ओळख आपणास करून देते. संदीप यांच्या या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीला लाख लाख शुभेच्छा.

गणेश खंडाळे, मोबाईल 98232 14420

पुण्याच्या आसपासच्या गावातील आम्ही पोरं पुण्यात शिक्षणानिमित्त एकत्र आलो होतो. मी आणि संदीपराव १९९८ सुमारास स. प. महाविद्यालयात शिक्षणाच्या निमित्ताने एकत्र आलो. वाचन या एका आवडीनं आम्ही एकत्र बांधले गेलो. संदीपराव माझ्या अगोदर पुण्यात शिक्षणासाठी आल्यामुळे त्यांना माझ्यापेक्षा अधिक संदर्भ माहित होते. पुण्यात असणारे साहित्यिक, वक्ते याबद्दलची त्यांची माहिती आमच्या सगळ्यांपेक्षा अधिक असायची. त्यामुळे त्यांच्या व्यक्तित्वाकडे माझ्या बरोबर अनेक मित्र आकर्षित होत असत. संदीपरावांना त्यावेळेस किल्ले भटकण्याचा छंद जडला होता. सुरवातीपासूनच त्यांना डोळसपणे किल्ले पाहण्याची सवय होती. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्याने ऐकणे. प्र. के. घाणेकर, गो. नी. दांडेकर यांची पुस्तके अभ्यासून किल्ले पाहण्याचा त्यांनी जणू सपाटाच लावला होता.

त्याकाळात किल्ल्यांच्या पुस्तकांमध्ये केवळ किल्ल्यांची वर्णने असायची. क्वचित कृष्णधवल छायाचित्र असायचे. अनेकदा आम्ही किल्ल्यावर गेल्यानंतर विस्तीर्ण किल्ल्यावरील अनेक गोष्टी आमच्याकडून पाहूण होत नसत. त्या निसटत असत. किंवा त्या ठिकाणांची केवळ वर्णन मिळत परंतु, ते ठिकाणच सापडत नसे. अनेकदा चारशे पाचशे किलोमीटर प्रवास करून आल्यानंतर जवळचे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण पाहायचे राहून जात असे. अशा अनेक अडचणींना सामोरे गेल्यानंतर आम्हाला त्या काळात किल्ल्यावरील एका परिपूर्ण पुस्तकाची गरज स्पष्टपणे जाणवत होती. असे पुस्तक ज्यामध्ये किल्ल्याचा अगदी प्रमाणबद्ध नसला तरी स्थलदर्शन करणारा नकाशा, किल्ल्यावरील ठिकाणांचे फोटो, किल्ल्याचा इतिहास, आजूबाजूची महत्त्वाची ठिकाणं अगदी किरकोळ पण महत्त्वाचं किल्ल्यावर पाणी आहे कि नाही याचा उल्लेख असणारं पुस्तक ही आमची त्यावेळेची अत्यंत गरज होती.

किल्ल्यांवरची पुस्तकं कोणीही लिहू शकत नव्हतं. अभ्यासू असणारा भटका असेलच असे नाही. आणि भटका असलेला अभ्यासू नसतो. त्यामुळे संदीपरावांमध्ये आम्हाला या दोन्हींचा अभूतपूर्व संगम दिसला. त्यातूनच गरूडझेप प्रकाशनाची संकल्पना सूचली. या व्यासपीठावरूनच आम्ही महाराजांच्या जहागिरीतून या पुस्तकाचा संकल्प पूर्ण केला. यासंकल्प पूर्तीमध्ये जसा माझा सहभाग होता. तसा योगेश काळजे, सारीका तापकीर या दोघांचाही तितकाच मोलाचा सहभाग होता. अनेक छायाचित्रांसाठी आम्हाला रोहित गोवईकरांची, शिनलकर यांची मदत झाली. संदीपराव इतिहासाचे विद्यार्थी त्यामुळे त्यांचे पहिले लेखन हे इतिहासाला अनुसरूनच होते. त्यांच्या लेखनामध्ये स्थलदर्शना ऐवजी इतिहास लेखन अधिक होते. त्यामुळे त्यांच्या पुस्तकाला परिपूर्ण गिरिभ्रमंतीची मार्गदर्शिका करण्यासाठी अनेक कष्ट घेतले. त्याकाळात मी सगळी तांत्रिक जबाबदारी सांभाळली होती.

किल्ल्यांचे नकाशे आमच्या पुस्तकाचे बलस्थान असणार होतं. गुगलने त्यावेळी थ्रीडी नकाशे द्यायला सुरवात केली होती. त्या नकाशांच्या आधारावर आम्ही पुणे जिल्ह्यातील २९ किल्ल्याचे सॅटेलाईट चित्रांच्या आधारे नकाशे तयार केले. त्यानंतर आमच्या भटकंतीच्या अनुभवानुसार त्यामध्ये आम्ही ठिकाणं भरत गेलो. त्यावेळे पर्यंत अनेक किल्ल्यांवर माझे जाण झालं नव्हतं. योगेश आणि संदीपरावांचे सर्व किल्ले पाहून झाले होते. त्यामुळे सॅटेलाईट इमेजद्वारा किल्ला शोधणे यामध्ये दिवस जायचा. अनघाई किल्ला शोधण्यासाठी आमचा संपूर्ण एक दिवस खर्ची झाल्याचे मला अजूनही आठवतेय. यामध्ये योगेश काळजेचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते. या संपूर्ण प्रकल्पासाठी आम्हा सर्वांना एकत्र बांधण्याचे काम सारीका यांनीही केलं. त्यामुळे हे पुस्तक येऊ शकलं.

त्यानंतरच्या दहा वर्षात किल्लांवरील गर्दी अमाप वाढत गेली. किल्ल्यावर अपघातांमध्ये देखील खूप वाढ होत गेली. अगदी तोरणा राजगडच्या गडघेऱ्यामध्ये चुकून नवखे मृत्यूमूखी पडल्याच्या बातम्यांनी आश्चर्य वाटत असे. स्मार्ट फोनमुळे फोटोग्राफी सेल्फी यांना अनन्य साधारण महत्त्व येत गेले. सेल्फी घेण्याच्या नादात कड्यावरून कोसळल्याच्या बातम्या वाचून डोक्याला हात मारून घ्यावासा वाटत असे. असे असले तरी या काळातच दुर्ग संवर्धनाची चळवळ देखील मोठ्या प्रमाणावर मूळ धरत होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची प्रेरणा घेत किल्ल्यावरील भग्न वास्तू दुरुस्त करणे, दरवाजे बसवणे, टाक्यामधील गाळ काढणे, एखादा किल्ला दत्तक घेऊन त्याची सुव्यवस्था लावणे या गोष्टीमुळे समाधानही वाटत होते.

यासंदर्भात संदीपरावांच्या पुस्तकाने केलेले काम अधोरेखित करणारे आहे. इतिहासाबद्दल ऐतिहासिक वास्तूंबद्दल नव्या पिढीला प्रेम जिव्हाळा आणि स्वाभिमान जर वाटावयाचा असेल तर प्रथम त्यांना इतिहासाबद्दल माहिती करून द्या. नक्की इतिहास काय आहे. इतिहास कुठे घडला. त्यामुळे इतिहासातील एक शाखा असणाऱ्या लोकल हिस्ट्री या उपशाखेचे महत्त्व आज अधोरेखित होते. या उपशाखेमध्ये संदीपरावांच्या या पहिल्याच पुस्तकांने खरंच खूप मोलाची भर घातली आहे. साधारण वर्षभरामध्ये आम्ही संदीपरावांच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपविली.

त्याचवेळेस ट्रेकर्स आणि भटक्यांमध्ये आणखीन एक नविन जमात तयार होत होती. ती म्हणजे अमूक अमूक किल्ल्याचा शोध लावणारे स्वयंघोषित इतिहास संशोधक. अशा इतिहास संशोधकांना संबंधित परिसरातील गावकऱ्यांनी चांगलेच टाळ्यावर आणले. एखादी वास्तू ठिकाण हे जेव्हा आपण ऐतिहासिक म्हणतो. त्यावेळेस ते ठिकाण तुम्ही शोधले असे कसे होऊ शकते. त्या परिसरातील गावकरी, गुराखी, नागरिक त्या ठिकाणी जात असतात. भले त्यांना कागदपत्रांमधील इतिहास माहित नसेल. त्यामुळे तुम्ही कागदपत्रांमधील इतिहास शोधावा. तो अभ्यासकांसमोर मांडावा. त्यानंतर अभ्यासक ठरवतील. परंतु या सगळ्या तारतम्याच्या प्रक्रियेलाच फाटा देत अमुत तमुक किल्ला मीच शोधला हे घोषित करणे म्हणजे मूर्खपणाचा कळसच म्हणावा लागेल.

आम्ही महाराजांच्या जहागिरीतून हे पुस्तक चोखंदळ ट्रेकर्स आणि भटक्यांसाठी काढून एक तपापेक्षा अधिक कालखंड लोटला. मधल्या काळात या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली. तो पर्यंंत अनेक गोष्टी घडल्या होत्या त्यात स्मार्ट फोनचा वापर, फेसबुक, इन्स्टा, गुगल या ऑनलाईन साधनांमुळे ट्रेकिंग क्षेत्रात अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडल्या आणि घडत आहेत. तरीदेखील आज दुसऱ्या आवृत्तीनिमित्त असे वाटते. एखाद्या शिवप्रेमी दुर्ग भटक्याने आपल्या बॅकपॅकमध्ये संदीपरावांचे हे पुस्तक टाकले तर बिनदिक्कत सलग दोन महिने या शहाजीराज्यांच्या सुपे परगण्यातील पुणे जहागिरीत भटकू शकतो. पुस्तकात उल्लेख केलेले 29 किल्ले डोळसपणे पाहू शकतो. कारण या पुस्तकात नकाशारुपात जसा भूगोल आहे तसा प्रत्येक किल्ल्याचा इतिहासदेखील आहे. मुक्काम कुठे करायचा, आसपास काय पाहण्यासारखं आहे. किल्ल्यावर पाणी आहे कि नाही. कुठून एसटी किंवा बस पकडायची, किलोमीटर किती, समुद्रसपाटीपासून किल्ला किती उंचीवर, बालेकिल्ल्याहून आजूबाजूला किती किल्ले दिसतात असे एक ना अनेक संदर्भ संदीप तापकीर यांनी दिले आहे. त्यामुळे पुण्यात पदभ्रमंती करणाऱ्या डोंगरभटक्यांसाठी हे पुस्तक परफेक्ट असं ट्रेकिंग गाईडबुक असं आहे. अत्यावश्यक रंगीत छायाचित्र व कृष्णधवल छायाचित्रांनी हे पुस्तक सजलेलं आहे. मोगऱ्याच्या प्रत्येक फांदीवर टंच फूल लकडलेलं असतं तसं प्रत्येक पानावर पानावर अत्यंत ज्ञानवर्धक माहिती या पुस्तकात आहे. आणि मोगऱ्याच्या जाळीतील सगळी फुलं संपली असं वाटत असतानाच देदिप्यमान इतिहास सांगणारी, स्फुलिंग चेतवणारी रसरशीत इतिहासाच फुल पानाआड आपल्याला अवचित सापडतात. एकंदरीत इतिहासप्रेमींना प्रोत्साहित करणारे हे पुस्तक आहे.

पुस्तकाचे नाव – महाराजांच्या जहागिरीतून…पुणे जिल्ह्यातील २९ किल्ले
लेखक – संदीप भानुदास तापकीर
प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन
किंमत – 395 रुपये, पृष्ठे – 280


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts to your email.

Related posts

सांगली परिसरात आढळले हे पक्षी…

रंग होळीचे…

जोशीमठ घटनेतून जागे होण्याची गरज

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading