July 21, 2024
Control anger to get spiritual Experience article by Rajendra Ghorpade
Home » राग-द्वेष गेल्यास ब्रह्मीचें स्वराज्य
विश्वाचे आर्त

राग-द्वेष गेल्यास ब्रह्मीचें स्वराज्य

राग-द्वेष नाहीसे झाले तर मनाची स्थिरता सहजच साधता येते. मन स्थिर झाले की साधनेतही स्थिरता साधता येते. साधनेत मन रमण्यास मदत होते. यासाठी स्वतःच्या मनातील राग-द्वेष यांचा त्याग करायला हवा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

तैसें रागद्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मीचें स्वराज्य आलें ।
मग तो भोगी सुख आपुलें । आपणचि ।। 271।। ज्ञानेश्वरी अध्याय 3

ओवीचा अर्थ – तसें कामक्रोध जर निःशेष गेले, तर ब्रह्मप्राप्तीरुप स्वराज्य मिळाले असे समज. मग तो पुरूषच आपणच आपलें सुख उपभोगितो.

ब्रह्मसंपन्नता मिळावी ही साधना करणाऱ्या प्रत्येक साधकाची अपेक्षा असते. तो मज भेटावा, तो मिळावा, त्याची अनुभूती यावी असे मनोमन प्रत्येकाला वाटत असते. तसे ते प्रत्येक साधकाचे स्वप्न असते. या स्वप्नात तो जगत असतो. पण हे कसे हस्तगत होते ? यासाठी कशाची गरज असते ? हे मात्र माहीत नसते. ते जाणून घेण्याचा प्रयत्न साधक करत असतो.

हळूहळू ही प्रक्रिया घडत असते. पण त्यासाठी दृढसंकल्प, मनाची तयारी ही हवी असते. मनात राग उत्पन्न होऊ नये. कोणाचाही द्वेष आपल्याकडून होऊ नये. असा बदल आपल्यात घडवावा लागतो. हा दृढसंकल्प केला आणि तो पाळला तर ब्रह्म मिळण्याची वाट सुकर होते. राग येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. राग दाबून मनातील राग घालवता येत नाही. यासाठी मनमोकळे करावे लागते. मनाला राग येऊ नये यासाठी मौन व्रत हा एक उपाय आहे.

कोणी रागाने बोलले तर त्यावर मौन पाळायचे. त्याकडे दुर्लक्ष करायचे. प्रतिक्रियाच द्यायची नाही. दुसऱ्याने व्यक्त केलेल्या रागाने आपले मन बिघडणार याची काळजी घ्यायची. हसतमुखाने त्याच्या रागाचा स्वीकार करायचा. एखाद्या घटनेत आपणासही राग येतो. त्यावेळी आपण तो राग व्यक्त करायचा नाही. मनाला आवर घालायची. मनात राग उत्पन्न होणार नाही, याची काळजी घ्यायची. तसा बदलच आपल्या स्वभावात करून घ्यायचा. आपणच आपल्यात हा बदल घडवायचा आहे. हा बदल घडविता आला तर आपणाला आपल्या मनाची स्थिरता साधता येणे सहज शक्य होणार आहे.

राग-द्वेष नाहीसे झाले तर मनाची स्थिरता सहजच साधता येते. मन स्थिर झाले की साधनेतही स्थिरता साधता येते. साधनेत मन रमण्यास मदत होते. यासाठी स्वतःच्या मनातील राग-द्वेष यांचा त्याग करायला हवा. छोट्या छोट्या गोष्टीतून होणारी मनाची चिडचिड दूर करायला हवी. हे मला करायचे आहे. एखाद्या गोष्टीत स्वतःचे मन गुंतवायला हवे. त्यात इतके गढून जायला हवे की मग राग-द्वेषाचा विसर पडायला हवा. राग आल्यानंतर लगेच मन दुसऱ्या कामात गुंतविण्याचा प्रयत्न करावा. अशाने मनातील द्वेष सहज दूर होतो.

रागाचा विसर होण्यासाठी आपल्या आवडत्या कामात लगेच मन रमवायला शिकावे. सहजच राग नाहीसा होतो. आपण राग आणि द्वेषावर नियंत्रण मिळवू शकलो तर साधनेत मन रमवू शकू. साधनेत त्याचा बोध निश्चितच होऊ लागेल. साधना करताना राग-द्वेष याची मनात कालावाकालव सुरू असते. अनेक विचार डोळ्यासमोर घोंघावत असतात. यातून मन बाजूला काढून मन सोऽहममध्ये गुंतवायला हवे. सोऽहमचा स्वर मनाने, कानाने ऐकायला हवा. यासाठी मनाची स्थिरता साधायला हवी. हे मिळवता आले तर ब्रह्मीचे स्वराज्य सहज हस्तगत होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

सावध रे सावध…

करटोली (ओळख औषधी वनस्पतीची)

देहविक्रीचं जग

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading