आत्मज्ञानाच्या हव्यासाने वेगळ्याच धर्माची शिकवण दिली जाऊ शकते. वेगळेच मार्ग अवलंबले जाऊ शकतात. यातूनच मग धर्माची युद्धे सुरू होतात. धर्म हा शांतता प्रिय आहे. हा विचारही मग मनाला पटत नाही. हिंसेतून धर्माचे रक्षण कधीच होत नाही.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
अर्जुना तयाच्या ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं ।
आणि भयातें नेणें कहीं । परिपूर्ण तो ।।295।। ज्ञानेश्वरी अध्याय 2 रा
ओवीचा अर्थ – अर्जुना, त्याच्या ठिकाणी स्वभावताच कामक्रोध नसतात आणि त्याला भय हे केव्हाच माहीत नसते. असा तो परिपूर्ण होय.
माणसाचे मन चंचल आहे. या चंचल मनाला स्थिर कसे करायचे ? क्षणाक्षणाला वेगवेगळे विचार मनात सातत्याने घोळत असतात. लहानपणी नवनव्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असते. सातत्याने नवनव्या विचारात मन गुंतत असते. यातूनच तर खऱ्या अर्थाने बुद्धीचा विकास होतो. पण वय वाढेल तसे या विचारांना फाटे फुटू लागतात. लहान वयात निरपेक्ष बुद्धीने कर्मे केली जातात. लाभालाभ मनामध्ये नसतो. पण वय वाढेल तसे लोभी, स्वार्थीवृत्ती ही त्याला स्पर्श करु लागते. आपलेपणा येतो. हे माझे, हे माझे हा विचार सुरू होतो.
या विचारांवर नियंत्रण मिळावे यासाठीच संस्काराची जोड द्यावी लागते. अन्यथा हा हव्यास वाढत जाऊन मुलांना वाईट सवयी लागतात. हे घडायचे नसेल तर बालमनावरच संस्काराची गरज आहे. त्याच्या विचारांना सुसंस्काराची जोड द्यावी लागते. तरच त्याला चांगल्या सवयी लागून त्याची बुद्धी स्थिर राहाते. अध्यात्माचेही असेच आहे. सुरवातीला हे काय शास्त्र आहे याची उत्सुकता असते. यातून याचा अभ्यास होतो. पण हे शास्त्र जाणून घेताना योग्य मार्गदर्शन न झाल्यास व्यक्ती अंधश्रद्धेमध्ये गुरफटण्याची शक्यता अधिक असते. तंत्रमंत्राच्या या दुनियेत कर्मकांडाकडेही ओढा वाढण्याची शक्यता असते.
योगाच्या आहारी जाऊन दुःख ओढवून घेण्याचाही धोका अधिक असतो. यासाठी मन स्थिर ठेवून याचा अभ्यास करायला हवा. तसे आचरण ठेवायला हवे. आत्मज्ञानाच्या हव्यासाने वेगळ्याच धर्माची शिकवण दिली जाऊ शकते. वेगळेच मार्ग अवलंबले जाऊ शकतात. यातूनच मग धर्माची युद्धे सुरू होतात. धर्म हा शांतता प्रिय आहे. हा विचारही मग मनाला पटत नाही. हिंसेतून धर्माचे रक्षण कधीच होत नाही. भरकटलेली मने मग जगाला अशांत करतात. अभ्यास नसल्याने चुकीच्या मार्ग स्वीकारला गेल्याने हे कृत्य होते. यासाठी स्थिर मनाने, स्थिर बुद्धीने याचा अभ्यास करायला हवा.
पण ही स्थिरता येते कशी हे समजून घ्यायला हवे. काम आणि क्रोधाच्या त्यागाने मनाला स्थिर करता येते. कितीही दुःखे आली तरी त्याचे मन विचलित होत नाही. त्याला कशाचीही भीती मनामध्ये नसते. भीतीने तो कधी गांगरून जात नाही. नेहमी सकारात्मक विचार ठेवून त्याची वाटचाल सुरू असते. अपयशाने खचून न जाता यशाची आशा ठेवून त्याची वाटचाल सुरू असते. अपयशातील चुका शोधून तो यशस्वी होण्याचा विचार सातत्याने करत असतो. पण त्याला यश मिळाले तर त्यात तो अडकून राहात नाही. अशी व्यक्ती स्थिरबुद्धीची असते.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।