October 6, 2024
Creating a reading society is more important in terms of development
Home » Privacy Policy » वाचता समाज निर्माण करणे हे विकासाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

वाचता समाज निर्माण करणे हे विकासाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे

समाजात वाचन संस्कृती रूजवण्यात कोणत्याही सरकारला यश आले, तर सामाजिक संघर्ष कमी होण्यास मदत होणार आहे. समाजात आज जाती, धर्म, विविध पंथ, विचार प्रवाहाच्या निमित्ताने संघर्ष घडत आहेत. अशा परिस्थितीमुळे सामाजिक स्वास्थ बिघडत आहे. त्यामुळे वाचन संस्कृतीने मस्तके घडवली जायला हवी. तसे घडले तर चित्र बदललेले दिसेल.

संदीप वाकचौरे, शिक्षणतज्ज्ञ

ऐसपैस शिक्षण

राज्यात शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यात महावाचन अभियान सुरू करण्यात आले आहे. शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट आहे की, निरंतर अध्ययन, त्या उद्दिष्टाच्या साध्यतेकरिता वाचन हे कौशल्य प्राप्त करण्याची नितांत गरज आहे. वाचन कौशल्याचा केवळ कौशल्य म्हणून विचार करत असताना ते व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी, समाजात शहाणपण आणि विवेकाची पेरणी करता अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.

वाचनाचे महत्त्व सांगताना लोकमान्य टिळक म्हणाले होते की, मला कोणी स्वर्गात जा म्हणाले आणि तेथे पुस्तके नसतील तर ते स्वर्गसुद्धा मी नाकारेन. याचा सरळ अर्थ आहे की, जेथे पुस्तके असतात, तेथे स्वर्ग असतो. स्वर्गाच्या कल्पना काही असल्या तरी जीवनातील आनंदाचे क्षण जेथे असतात, तेथे स्वर्ग आहे असे मानायला हरकत नाही. आपल्याला जीवनात येणारे विविध अनुभवांचा विचार करता जीवनात समस्या निर्माण होत असताना त्यावर मात करायची असेल, तर वाचन संस्कार निश्चित मदत करतात. वाचनाचा संस्कार हा जीवनाला सुख देणारा विचार आहे. वाचनामुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो. वाचनाने जीवन समृध्द होते. जीवनाचे नेमके उद्दिष्टाच्या दिशेने मार्गक्रमण करणे शक्य होत असते. जो समाज वाचता असतो, तो देश प्रगतीच्या दिशेने झेप घेत असतो. त्यामुळे वाचता समाज निर्माण करणे हे विकासाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे असते. शिक्षणाचा अर्थच निरंतर वाचन असा आहे. आज त्या शिक्षणाच्या प्रक्रियेत वाचनासाठी अभियानाच्या स्वरूपात विशिष्ट कालावधीत कार्यक्रम घ्यावा लागतो, हे शिक्षण प्रक्रियेचे अपयश मानायचे का? असा प्रश्न उपस्थित केला जातो. कारण शिक्षण घेतलेल्या माणसाने जीवनभर वाचत राहण्याची अपेक्षा आहे. माणसाला वाचता येत असूनही तो माणूस जर वाचत नसेल तर तो अशिक्षित समजावा असेही म्हटले जाते.

चिंतन आणि मनन

मुळात उत्तम व जबाबदार नागरिक घडवण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन हे कौशल्य आवश्यक आहे. वाचनाने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी निश्चित मदत होत असते. वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची रूची वाढण्यासाठी मदत होते. वाचन कौशल्य जसे जसे वृध्दिंगत होत जाते, त्याप्रमाणे अभ्यासाला देखील गती मिळण्यास मदत होत असते. वाचन संस्कार जेव्हा विद्यार्थ्याची सवय बनते तेव्हा विद्यार्थी केवळ वाचत नाही. वाचन कौशल्य जसे जसे वृध्दिंगत होत जाते, त्याप्रमाणे आकलन समृध्द होत असते. वाचनाने विद्यार्थी ज्या भाषेतील साहित्य वाचतो, त्या भाषेत विद्यार्थ्याचा विकास होतो. वाचनामुळे विद्यार्थ्याची शब्दसंपत्ती उंचावते. भाषिक कौशल्य आणि शैली विकसित होते. पुस्तके आपण जेव्हा वाचतो तेव्हा ती विविध विषयांची पुस्तके असतात. ती विविध विषयांची पुस्तके माणसांना एकाचवेळी वाचकांच्या हाती आली तर त्या वाचकाला विविध विषयांची माहिती मिळवणे शक्य होते. पुस्तके माहिती देत जातात, त्यातून वाचक विचार करतो, चिंतन, मनन घडत जाते. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात परिवर्तन करण्याचा मार्ग अधिक सुलभ होतो.

माणसांच्या विचार प्रक्रियेत परिवर्तन आणि जीवनाच्या विकास प्रक्रियेत गती प्राप्त करून देणारी ती सर्वात मोठी व्यवस्था असते. वाचन संस्कारामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला मोठा हातभार लागत असतो. वाचनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःची अभिरूची विकसित करण्याबरोबर आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी सहजपणे उपलब्ध होते. शासनाच्या वतीने यापूर्वी राबवण्यात आलेल्या उपक्रमात राज्यातील असलेल्या विविध शाळांचा विचार करता सुमारे ६६ हजार शाळांनी त्यात सहभाग नोंदवला होता. या शाळांमधील सुमारे ५२ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सन २०२४-२५ या वर्षात स्टार्स या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव-२०२४ हा उपक्रम राबविण्यास सुरूवात केली होती. या उपक्रमास रिड इंडिया सेलिब्रेशन यांचे सहकार्य देऊ केले आहे. महावाचन चळवळ ही २२ जुलै ते ३० ऑगस्ट कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. इयत्ता तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी व नववी ते बारावी अशा तीन स्तरावर ही महा वाचन चळवळ आयोजन करण्यात आली आहे.

महावाचन चळवळ

महावाचन चळवळीची अंमलबजावणी करत असताना शासनाच्या वतीने काही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. महाउत्सव साजरा होत असताना विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रूजवण्यासाठीचा विचार करण्यात आला आहे. समाजात वाचन संस्कृती रूजवण्यात कोणत्याही सरकारला यश आले, तर सामाजिक संघर्ष कमी होण्यास मदत होणार आहे. समाजात आज जाती, धर्म, विविध पंथ, विचार प्रवाहाच्या निमित्ताने संघर्ष घडत आहेत. अशा परिस्थितीमुळे सामाजिक स्वास्थ बिघडत आहे. त्यामुळे वाचन संस्कृतीने मस्तके घडवली जायला हवी. तसे घडले तर चित्र बदललेले दिसेल. खरेतर शाळेतील विद्यार्थी आणि शाळाबाहेरील नागरिक वाचते व्हायला हवेत. त्याकरिता शाळांमध्ये समृद्ध ग्रंथालये हवी. आज आपल्याकडे शाळांच्या इमारती आणि इतर भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी जितकी आग्रही भूमिका घेतली जाते, तितकी भूमिका ग्रंथालय निर्मितीसाठी घेताना दिसत नाही. मुळात शाळा म्हणजे केवळ शिक्षक, पाठ्यपुस्तके, इमारत नाही. शाळांच्या प्रक्रियेत सर्वात मोठी गरज आहे ती ग्रंथालयांची. ग्रंथालय जर समृद्ध असतील, तर आपण त्या शाळांमधून परीक्षार्थी न घडवता उत्तम विद्यार्थी घडवण्यास प्राधान्य देऊ. आज पालक, विद्यार्थी आणि अगदी शिक्षकांना देखील अवांतर पुस्तके वाचणे म्हणजे केवळ टाईमपास वाटतो. विद्यार्थ्याला अधिक मार्क मिळावेत म्हणून पाठ्यपुस्तकांचा विचार केंद्रस्थानी केला जातो. त्यामुळे मार्क मिळतील मात्र त्याचा प्रवास माणूस म्हणून घडेल का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. वाचन म्हणजे केवळ शब्दांच्या महाजालातील प्रवास नाही, तर माणूस म्हणून घडण्यासाठीचा मार्ग आहे. त्यामुळे त्यादृष्टीने वाचन संस्कृतीकडे पाहण्याची गरज आहे.

राज्यात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान कामी येईल अशी अपेक्षा आहे. मुळात प्राथमिक स्तरावर विद्यार्थी पायाभूत कौशल्य प्राप्त करत असतात. त्या पायाभूत कौशल्यांमध्ये वाचन कौशल्याचा समावेश आहे. येथे वाचन कौशल्य याचा अर्थ केवळ शालेय पाठ्यपुस्तक वाचने अपेक्षित नाही. त्या पलीकडे विद्यार्थ्यामध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करण्याची गरज असते. त्या दृष्टीने हे अभियान विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कार रूजवण्यास मदत करणारे ठरणार आहे. विद्यार्थी वाचत नाही यामागे अनेक कारणे आहेत, त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे त्याच्या भोवती असलेल्या माणसांच्या हातीच पुस्तके नसतील, तर मुलांच्या हाती पुस्तके कशी येणार? मुलांच्या अवतीभोवती वाचन संस्काराचा विचार दिसायला हवा. मुले सुविचार ऐकून आणि केवळ सांगून फार काही शिकत नाही. त्यांना जे शिकवायचे आहे त्यागोष्टी पालक, शिक्षक म्हणून स्वतः ती वाट चालण्याची गरज असते. पालक, शिक्षक जर सतत मोबाइल, दूरदर्शनचा उपयोग करत असतील, तर विद्यार्थी तिकडे आकर्षित होणार यात शंका नाही. वाचता समाज निर्माण करणे महत्त्वाचे आहे आणि आज ते मोठे आव्हान आहे. तसे घडत गेले तर समाज निर्मितीच्या दिशेने पावले पडण्यास सुरूवात होईल.

मुळात विद्यार्थ्याच्या वाचनासाठीचा पहिला टप्पा हा मातृभाषा वाचनापासून सुरूवात होतो. विद्यार्थ्याची जी मातृभाषा आहे त्या भाषेतील पुस्तके वाचनाची सवय रूजली, तर मराठी भाषेसोबत विद्यार्थ्यांची नाळ जोडली जाण्याची शक्यता अधिक आहे.

आज महाराष्ट्रात गेले काही वर्ष इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढत आहे. शासकीय शाळांची संख्या अधिक असली तरी विद्यार्थी पुरेशा प्रमाणात नाहीत, त्यामानाने इंग्रजी माध्यमांची संख्या कमी असूनही विद्यार्थ्यांचा ओढा मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. मुळात इंग्रजी माध्यमातील शिक्षण घेत असताना तेथे मराठी भाषा सक्तीची केलेली असली तरी तेथे होणार्‍या मराठी भाषेच्या शिक्षणाचा विचार किती गंभीरपणे केला जातो याचाही विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये देखील मराठी वाचन संस्कारासाठी निश्चित प्रयत्न करण्याची गरज आहे. असे घडले तर मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे सुलभ होईल. वाचनाच्या निमित्ताने भाषेशी नाते अधिक पक्के होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर मराठी भाषेतील उत्तम आणि दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय होणार आहे. आज मराठी काय आणि इंग्रजी काय कोणत्याही माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी लेखक, कवी यांच्याविषयी आणि त्यांच्याविषयी फार काही बोलता येते असे चित्र नाही. एकीकडे मराठी अभिजात भाषा आहे आणि तिला केंद्र सरकारने मान्यता द्यावी म्हणून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अशावेळी मराठी भाषेच्या साहित्याचा प्रसार आणि प्रचाराची गरज आहे. यावर्षी अमळनेर येथे झालेल्या पुस्तकांची विक्री झाली नाही म्हणून प्रकाशकांनी भरलेली अनामत रक्कम परत द्या, अशी मागणी केली होती. पुस्तक विक्री घडत नसल्याचे सांगण्यात येते. आपल्याकडे वाचन संस्कृती कमी होत असल्याचे अनेकजण सांगत आहेत. खरेतर बारा-तेरा कोटीच्या लोकसंख्येत एखादा हजार पुस्तकांची आवृत्ती संपण्यास पाच-दहा वर्षे लागत असतील, तर परिस्थिती गंभीर आहे हे लक्षात घ्यायला हवे. विद्यार्थ्यांची वाचनाशी नाळ जोडली जायला हवी.

साहित्यिकांचे योगदान

समाज घडवण्यास साहित्यिक मोठे योगदान देत असतात. काळाच्या पुढे जात ते समाजात स्वप्न पेरत असतात. त्यामुळे त्याबद्दल विचार करण्याची गरज आहे. पाश्चात्य देशात साहित्यिकांचे स्थान अत्यंत वरचे आहे. आजही शेक्सपिअरसारख्या लेखकांचे घर वारसा म्हणून जपला जाते. तेथे जाणारे पर्यटक त्यांच्या घराला भेटी देतात. आम्ही हवे ते देऊ; पण आमचा शेक्सपिअर मात्र देणार नाही, ही त्या देशाच्या नागरिकांची भाषा असते. साहित्यिकांच्या प्रति असलेला हा अभिमान आहे. आज आपल्या देशातील साहित्यिकांची स्मारके किती प्रमाणात जपण्याचा प्रयत्न केला जातो हा प्रश्न आहे. ज्यांनी साहित्यसेवेसाठी योगदान दिले आहे ती माणसे काळाच्या पटलावर हरवत चालली आहेत. समाज आणि व्यवस्था जर साहित्यिकांच्या प्रति कृतघ्नता व्यक्त करणार असेल, तर भविष्यासाठी शाळेत शिकणार्‍या पिढीने कोणाचे स्मरण करावे हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

व्यक्तिमत्त्व विकास

लोकमान्य टिळक तुरूंगात होते आणि त्यांनी गीतेवर भाष्य करणारे गीतारहस्य लिहिले. तो ग्रंथ इंग्रजांच्या हाती देण्यात आला. त्यांनी तो ग्रंथ अत्यंत सुक्ष्मतेने तपासला गेला. याचे कारण टिळकांच्या शब्दसंपत्तीची शक्ती त्यांना ठाऊक होती. मुळात शब्दात शक्ती असते हे इंग्रज जाणून होते. त्यामुळे समाजात काय पेरायचे आहे हे साहित्यिक करू शकतील. साहित्य माणसांची मस्तके घडवत असतात. ती मस्तके पुस्तकांच्या विचारांनी एकदा घडली की, पुन्हा ती माणसे लाचार्‍यांच्या फौजेत गुंतून पडत नाही. माणसाला स्वाभिमानाच्या दिशेने प्रवास घडवण्यासाठी साहित्य महत्त्वाची भूमिका बजावत असते. साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासास चालना देणे. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे. या उद्दिष्टांच्या दिशेने सहजतेने प्रवास घडणे सहज शक्य आहे. आपल्याला समृद्ध समाज निर्माण करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सुरू झालेले हे महावाचन अभियान कायमस्वरूपी रूजले, तर महाराष्ट्राचे चित्र बदललेले दिसेल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading