September 27, 2023
Satkaman Well on Samangad article by Geeta Khule
Home » Photos And Video : सामानगडावरील ऐतिहासिक सातकमान विहीर…
पर्यटन

Photos And Video : सामानगडावरील ऐतिहासिक सातकमान विहीर…

गडावर देखरेखेसाठी वेताळ बुरुज, प्रवेश बुरुज, झेंडा बुरुज, सोंडी बुरुज असून तटबंदीच्या डागडुजी आणि बांधणीसाठी विटा काढून नंतर पाण्यासाठी काढलेल्या विहिरी आहेत. गडाचं आभूषण असलेल्या या विहिरी प्रेक्षणीय असून आवर्जून पाहावी अशी सातकमान विहीर आहे.

दुर्गकन्या गीता खुळे

http://instagram.com/durg_kanya

कोल्हापूर जिल्ह्याला अनेक गड किल्यांचा वारसा लाभला आहे. सामानगड हा त्यापैकीच एक. बाराव्या शतकात शिलाहार वंशीय दुसरा राजा भोज यांनी गडाची बांधणी केली. इ. स. १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड जिंकून गडाची डागडुजी केली. त्यावेळी गडाची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरणीस अण्णाजी दत्तो प्रभूणीकर यांच्याकडे होती.

१८४४ मध्ये इंग्रजा विरुद्ध पहिले बंड सामानगडाने पुकारले ज्याचे नेतृत्व मुंजप्पा कदम आणि इतर धारकर्त्यांनी केले. कोल्हापूरपासुन ८० कि. मी. अंतरावर असलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील हा ऐतिहासिक गड. वाहतुकीसाठी सुलभ आणि सुरक्षित असलेल्या या गडावरून इतर गडांना रसद आणि युद्ध साहित्याचा पुरवठा केला जात असे. गडावर देखरेखेसाठी वेताळ बुरुज, प्रवेश बुरुज, झेंडा बुरुज, सोंडी बुरुज असून तटबंदीच्या डागडुजी आणि बांधणीसाठी विटा काढून नंतर पाण्यासाठी काढलेल्या विहिरी आहेत.

गडाचं आभूषण असलेल्या या विहिरी प्रेक्षणीय असून आवर्जून पाहावी अशी सातकमान विहीर आहे. बाराव्या शतकातील स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आणि वैशिष्ट्यपुर्ण उदाहरण म्हणजे सातकमान विहीर. वरच्या बाजूने इंग्रजी मुळाक्षर सी या आकारासारखी दिसणारी विहिरीची रचना अभ्यासावी अशी आहे. सपाट भूभागापासून आत जमिनीत खुप खोल अशा उभ्या, आडव्या आणि पुन्हा उभ्या अशा आयाताकृती दिसणाऱ्या अंदाजे ७ ते ८ फूट रुंदीच्या चऱ्या जांभ्या दगडात खोदलेल्या आहेत.

यात उतरण्यासाठी एक ते दीड फूट उंची आणि रुंदी असलेल्या दमछाक करणाऱ्या खोदिव पायऱ्या असून सुरक्षिततेसाठी बाजूने कठडा आहे. इथून आत उतरताना आपण तळघरात उतरल्याचा भास होतो. सरळ खाली मग उजव्या हाताला पायऱ्या पुन्हा त्या उतरून पुन्हा उजवीकडे वळण आणि मग विहीर. अशा जवळ जवळ ६० ते ६५ पायऱ्या उतरून विहिरीजवळ जाता येते.

पायऱ्यांवर सुंदर ७ कमानी असुन विहिरीपासून वरील पृष्ठभागापर्यंतची उंचीचे अंतर अंदाजे ६० ते ७० फूट इतके असावे. पावसाळ्यात पाणी वाढल्यामुळे आपण विहिरीच्या इतर कमानी पाहू शकत नाही. विहिरीची अंतर्गत रचना, पाण्याचं व्यवस्थापन, तिचा थाट पाहून आजच्या पेक्षा त्याकाळी असणारं तंत्रज्ञान आणि दूरदर्शी विचारांची प्रचिती येते. इतक्या शतकांचा हा अमूल्य ठेवा ’दुर्गवीर प्रतिष्ठान’ आणि इतर शिवप्रेमीन मुळे पुनर्जीवित झाला आहे. या दुर्गप्रेमींनी साफसफाईपासून गाळ काढण्यापर्यंतचा मेहनत घेतली.

सातकमान विहीर आणि सामानगडावरील व्हीडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

Related posts

कामदा एकादशीनिमित्त पंढरपूर विठ्ठल मंदिरात द्राक्षांची आरास

उत्कृष्ट पर्यटन गाव नामांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

खरीप २०२३ मध्ये पेरणी झालेले क्षेत्र…

Leave a Comment