बहामनी सुलतान अहमदशाह यांनी बांधलेला हा भव्यदिव्य किल्ला. मध्ययुगीन काळात ही शाही देशातील सर्वात शक्तीशाली सत्ता होती. इ. स. १४२६-३२ दरम्यान हा किल्ला बांधण्यात आला. सुमारे साडेपाच कि.मी.चे क्षेत्र या किल्ल्याने व्यापले असून संपूर्ण देशातील काही अपाराजित किल्ल्यांमधील हा एक किल्ला आहे. शिवाय देशातील अनेक किल्यांमधील सुंदर आणि भव्य असा हा लक्षवेधी किल्ला आहे. हा भुईकोट किल्ला तीन समांतर खंदकांनी सुरक्षित करण्यात आला आहे. किल्ल्यात असंख्य दालने, अनेक भुयारे आणि भूमिगत कक्ष आहेत. ३७ बुरुज आणि संरक्षणासाठी सुमारे ३००० सैनिकांची व्यवस्था. ही शाही फुटूनच पुढे पाच शाह्या जन्मल्या. त्यांनी आपले किल्ले बांधताना या किल्ल्याची नक्कल केल्याचे स्पष्ट जाणवते. त्यामुळे गोवळकोंडा, विजापूर, हैद्राबाद आणि बेंगलोरचे किल्ल्यांवर बीदरचा प्रभाव दिसतो. सुलतान अहमदशाह कारकिर्दीत बीदर हे एक प्रमुख सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र म्हणून प्रसिद्धीस आले. या काळात इराणमधून अनेक लोक येथे येऊन स्थायिक झाले आहेत. हा किल्ला मुद्दाम जाऊन पाहण्यासारखा आहे.
डॉ. नंदकुमार मोरे,
मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर



















