July 27, 2024
How to Clean Mind article by rajendra ghorpade on Dnyneshwari
Home » मनशुद्धी कशाने होते ?
विश्वाचे आर्त

मनशुद्धी कशाने होते ?

मनशुद्धीचे विविध मार्ग आहे. रामदास स्वामी यांनी सांगितलेले मनाचे श्लोक जरी आठवले तरी मन शुद्ध होते. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. भक्ती हा मनशुद्धीचा उत्तम मार्ग आहे. भगवंताची भक्ती, सद्गुरुंची भक्ती यातून मनाचे पावित्र्य वाढते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

मनशुद्धीचां मार्गी। जैं विजयी व्हावें वेगी ।
तै कर्म सबळालागी ।आळसु न कीजे ।।139 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 18

ओवीचा अर्थ – मनाची शुद्धता होण्याच्या मार्गांत आपण लवकरच विजयी व्हावें असें वाटत असेल, तर चित्त शुद्ध करण्याच्या कामी समर्थ असणारे जे कर्म ते आचरण करण्याच्या कामी आळस करूं नये.

साधनेत मन रमण्यासाठी अंगी ऊर्जा असावी लागते. पण ही ऊर्जा येते कशी ? ऊर्जा उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. ऊर्जा ही एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाते. हा ऊर्जेचा नियम आहे. याचा अर्थ ऊर्जा ही आपल्या शरीरातच असते. या ऊर्जेचा वापर योग्य पद्धतीने करायला हवा. ही ऊर्जा योग्य कामासाठी उपयोगात आणायला हवी. यासाठी उपलब्ध ऊर्जेचे संवर्धन गरजेचे आहे. संवर्धनासाठी मनशुद्धी हवी. मनात चांगले विचार, आचार असतील तरच ऊर्जेचे संवर्धन होते.

मनशुद्धीचे विविध मार्ग आहे. रामदास स्वामी यांनी सांगितलेले मनाचे श्लोक जरी आठवले तरी मन शुद्ध होते. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. भक्ती हा मनशुद्धीचा उत्तम मार्ग आहे. भगवंताची भक्ती, सद्गुरुंची भक्ती यातून मनाचे पावित्र्य वाढते. पण येथे तर भक्तीतच मन लागत नाही. मग मन शुद्ध कसे होणार ? साधनेतच मन रमत नाही. हे मन रमण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मन स्थिर होण्यासाठी शरीरात शांती उत्पन्न होईल असा आचार ठेवायला हवा. तसा विचार करायला हवा.

राग आला तर तो गिळायचा नाही, तो विसरायचा. गिळालेला राग पुन्हा वर येऊ शकतो. पण विसरलेला राग पुन्हा येण्याची शक्यता फारच कमी असते. दुसऱ्याचा द्वेष करण्याआधी स्वतःमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण स्वतः मोठे होण्याचा प्रयत्न करायला हवा. द्वेषामध्ये ऊर्जा खर्च करण्याऐवजी आपण चांगले काही तरी करून मोठे कार्य करण्यात ऊर्जा वापरायला हवी. मनशुद्धीसाठी मनाला असे वळण लावायला हवे. मन बदलले तर सर्व काही बदलू शकते.

ऊर्जेच्या संवर्धनाचा विचार मनात जोपासायला हवा. अशी व्यर्थ जाणारी ऊर्जा आत्मज्ञान प्राप्तीसाठी वापरायला हवी. सध्या टिव्हीमुळे मनोरंजन होते. पण हे मनोरंजन आपल्या जीवनात, आचरणात बदल घडवते. याकडे लक्ष द्यायला हवे. लैंगिक विचार आपली ऊर्जा मोठ्या प्रमाणात नष्ट करत आहेत. कामाची हाव आपली शक्ती व्यर्थ घालवत आहे. शरीरात असणारी ही ऊर्जा साठवणे म्हणजेच ब्रह्मचर्य पाळणे होय. यासाठी ब्रह्मचर्याचा विचार हा उपयोगात आणायला हवा.

संसारात राहूनही ब्रह्मचर्य पाळता येते. मुले कोणाला नको आहेत ? सर्वांनाच हवी आहेत. पण गरजे पुरतेच याकामी ऊर्जा खर्ची घालायला हवी. त्याचा वापर करायला हवा. इतर वेळी तो विचार मनात आणून ऊर्जा नष्ट करू नये. ही ऊर्जा साठवायला हवी. काही संतांच्या मते ही ऊर्जा अगदी सहजपणे आत्मज्ञान प्राप्ती करून देऊ शकते. ही ऊर्जा ज्याने साठवली तो सहज आत्मज्ञानी होऊ शकतो. सहजसमाधी साध्य तो करू शकतो. यासाठी ब्रह्मचर्य हवे. ब्रह्मचर्याने मनाची शुद्धी होते. यासाठीच ब्रह्मचर्य पाळण्यात आळस करू नये.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

जीवनानुभवाला समृद्ध करणारी कादंबरी रंधा

वसुंधरा वाचवण्यासाठी आदर्श जीवनशैली विकसित करण्याची गरज

शेततळ्यातील मासे मरत आहेत, मग हे करा उपाय…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading