April 19, 2024
Decrease in level of Nitrogen American scientist report
Home » नायट्रोजनचे प्रमाण घटतेय ! व्यापक धोरणाची गरज
संशोधन आणि तंत्रज्ञान

नायट्रोजनचे प्रमाण घटतेय ! व्यापक धोरणाची गरज

नायट्रोजनचे प्रमाण घटतेय ! व्यापक धोरणाची गरज

जागतिक वातावरणीय बदलावर एक व्यापक धोरण निश्चित करण्याची गरज असल्याचे मत गेल्या कित्येक वर्षापासून संशोधक व्यक्त करत आहेत. वाढते पृथ्वीचे तापमान असो वा बदलते पर्यावरण असो मानवजातीच्या अस्तित्त्वासाठी आता खऱ्या अर्थाने ठोस पाऊले उचलण्याची गरज भासू लागली आहे. सर्वत्र समतोल राखता न आल्यास पृथ्वीवरील जीवसृष्टीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. कारण खाद्य साखळीत एखादा घटक जरी कमी जास्त झाला तरी त्याचा परिणाम या साखळीवर होतो. अमेरिकेतील संशोधकांनी खाद्य साखळीतील नायट्रोजनच्या बदलत्या प्रमाणावरून हा धोका व्यक्त केला आहे.

पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक सुमारे 78 टक्के प्रमाणात नायट्रोजन वायू आढळतो. पण गेल्या काही दशकात काही ठिकाणी नायट्रोजनचे हे प्रमाण कमी जास्त झालेले पाहायला मिळत आहे. साहजिकच याचा परिणाम वनस्पतींच्या वाढीवर होत आहे. हे घटलेले प्रमाण धोकादायक असल्याचे मत अमेरिकेतील संशोधकांनी मांडले आहे. नायट्रोजनच्या प्रमाणाबाबत जगभरात विविध ठिकाणी नायट्रोजन चक्राचा अभ्यास करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्याच्या नोंदी नियमित ठेवून त्यावर व्यापक अभ्यासाचीही गरज असल्याचे मत या संशोधनात व्यक्त केले आहे.

विसाव्या शतकाच्या मध्यापासूनच विविध ठिकाणी तसचे पाणी साठ्याच्या ठिकाणी होणारा अतिरिक्त नायट्रोजनचा दुष्परिणाम याची नोंद घेण्यात येत आहे. पण आता नव्या पाहाणीनुसार जगभरात नायट्रोजनच्या उपलब्ध साठ्यात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही घट कशामुळे होत आहे यामागची कारणे काय आहेत ? याचे काय दुष्परिणाम होत आहेत याचा शोध संशोधक घेत आहेत.

वनस्पतीच्या वाढीसाठी खताच्या रुपात नायट्रोजन पुरवण्यात येते. पण हाच निसर्गात आढळणारा नायट्रोजन वायू घटत चालला आहे. वातावरणामध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे वाढते प्रमाण यास कारणीभूत असल्याचे मानले जाते. ऑक्सिजन, पाणी, कार्बन प्रमाणेच नायट्रोजन हा महत्त्वाचा घटक आहे. नायट्रोजन शिवाय पेशी जगू शकत नाहीत कारण प्रोटीन तयार होण्यासाठी नायट्रोजन हा आवश्यक घटक आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास वनस्पतींच्या पानात नायट्रोजनचे प्रमाण कमी झाल्यास त्या वनस्पतीवर आढळणाऱ्या किटकांसाठी कमी प्रमाणात नायट्रोजन उपलब्ध होईल. याचा परिणाम त्या किटकाच्या प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो. किटकांचे प्रमाण घटल्यास या किटकांना खाणारे पशु, पक्षी यांच्यावरही परिणाम होऊ शकतो. याचाच अर्थ नायट्रोजनचे चक्र यामुळे बिघडू शकते. हे जलवायू परिवर्तन तसेच वातावरणात वाढत चाललेले कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण हे मानवजातीस खूपच हानिकारण आहे. गेल्या दहा वर्षात याचे परिणाम ठळकपणे जाणवू लागले आहेत असा दावा संशोधकांनी केला आहे.

राष्ट्रीय सामाजिक पर्यावरण संशोधन केंद्रातील अभ्यासक राहेल मेसन यांच्या मते पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजन एकाच वेळी कमी- जास्त प्रमाणात आढळत आहे. गेल्या शंभर वर्षात औद्योगिक आणि शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. साहजिकच क्रियाशील नायट्रोजनच्या पुरवठ्यात दुपट्टीने वाढ झाली आहे. बेटावरील तसेच समुद्र किनारपट्टीवरील पाण्यात, तलावात हा अतिरिक्त नायट्रोजन जमा होतो. यामुळे कधी कधी युट्रोफिकेशनमुळे कमी ऑक्सिजन असणाऱ्या क्षेत्रात हानीकारक अशा शेवाळाची वाढ होते. अतिरिक्त नायट्रोजनच्या या दुष्परिणामामुळे नायट्रोजन आता प्रदुषणाच्या दृष्टिने अभ्यासण्याचे आव्हान संशोधकांपुढे उभे राहीले आहे.

तथापी वाढता कार्बनडाय ऑक्साईड आणि अन्य जागतिक बदलामुळे वनस्पती आणि जीवाणूंकडून नायट्रोजनच्या मागणीत वाढ झाली आहे. नायट्रोजनचा वापर ज्या भागात कमी केला जात आहे. त्या भागातील वनस्पती आणि जनावरांच्या वाढीवर परिणाम होत आहे. प्रोटीन निर्मितीमध्ये नायट्रोजनची महत्त्वपूर्ण भुमिका असते. यासाठी वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजनची आवश्यक भासते. पण तो मिळू न शकल्यास वनस्पतीमध्ये नायट्रोजनचे प्रमाण घटते. कमी प्रमाणात नायट्रोजन मिळाल्यास वनस्पतींची वाढही हळूहळू होते. अशा वनस्पतींची पानात प्रोटीनचे प्रमाण कमी असते. ही पाने खाणाऱ्या किटक आणि जीवांना आवश्यक प्रथिने मिळत नाहीत. साहजिकच त्यांच्या वाढीवरही परिणाम झालेला पाहायला मिळतो. या वनस्पती खाऊन जगणाऱ्या जनावरांच्या विकासावर याचा परिणाम झालेला दिसून येते आहे.

मेरिलँडच्या पर्यावरण आणि विज्ञान केंद्रातील प्राद्यापक अॅड्यु एलमोर याबाबत म्हणाले, खाद्याच्या साखळीमध्ये नायट्रोजनच्या या कमतरतेचा परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे. यामुळे नायट्रोजन चक्राचा वेग कमी होतो. संशोधकांनी या जागतिक बदलाचा अभ्यास कित्येक वर्षापासून सुरु केला आहे. त्यांनी नायट्रोजनच्या उपलब्धतेमध्ये घट झाल्याचे पुरावे सादर केले आहेत. मध्य उत्तर अमेरिकेतील गवताच्या मैदानी प्रदेशात गेल्या शंभर वर्षापासून नायट्रोजनच्या उपलब्धतेमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. या प्रदेशात चरणाऱ्या जनावरांच्यामध्ये प्रोटीनची कमतरताही जाणवू लागली आहे. तसेच उत्तर अमेरिका आणि युरोपमधील काही वनक्षेत्रामध्येही काही दशकांपासून आहारामध्ये नायट्रोजनची कमतरता दिसून येत आहे.

पर्यावरणातील बदल हे या कमतरते मागचे कारण असू शकते, वातावरणात कार्बनडाय ऑक्साईडचा वाढता थर याचाही यात समावेश आहे. लाखो वर्षांपासून कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण उच्चपातळीवर गेले आहे. वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड वनस्पती शोषून घेतात. वाढत्या कार्बनडाय ऑक्साईडच्या प्रमाणामुळे वनस्पतींची वाढ जोरात होते. पण या प्रक्रियेत या वनस्पतींकडून नायट्रोजनही मोठ्या प्रमाणात शोषून घेतला जात असल्याने वातावरणातील उपलब्ध नायट्रोजनचे प्रमाण घटत आहे. वातावरणातील वाढते कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण, जंगलातील वणवा यासह जागतिक तापमानवाढ यामुळेही नायट्रोजनच्या प्रमाणात घट होऊ शकते, असे मत या संशोधकांनी व्यक्त केले आहे.

नायट्रोजनच्या कमतरतेमुळे वनस्पतींकडून होणारे वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे शोषण सुद्धा प्रभावित होऊ शकते. यासाठी आता व्यापक मोहीम उभी करण्याची गरज या संशोधनात व्यक्त केली आहे. नायट्रोजन च्रकाबाबत जागतिक पातळीवर वार्षिक नोंदी करण्याची गरज आहे. यावरून उपलब्ध नायट्रोजनचे बदलते प्रमाण यावर संशोधकांना जागतिक धोरण निश्चित करावे लागणार आहे.

Related posts

सद्गुरुच तारणहार असल्यानंतर बुडण्याची भिती कसली

‘काटेरी पायवाट’ : एक प्रेरणादायी दस्तऐवज

पत्रकार

Leave a Comment