वास्तव मांडणारा दस्तावेज : बाईचा दगड
आधुनिक मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ भास्कर बडे यांचा “बाईचा दगड” हा कथा संग्रह वाचण्यात आला. हा कथासंग्रह वाचण्याची उत्सुकता होती ती पुस्तकाच्या शीर्षकामुळे. कारण “बाईचा दगड” हे शीर्षक वाचून नकळत मनात विचार आला, सर हे शेती मातीशी एकरूप असणारे वावरातील साहित्यिक आणि त्यांच्या पुस्तकाचं हे शीर्षक…नक्कीच वाचले पाहिजे.प्रा डॉ द्वारका गिते -मुंडे
नांदुर घाट, जि. बीड
ऋषींच्या शापामुळे अहिल्याची शिळा झाली आणि रामाचे चरण स्पर्श झाल्यामुळे तिचा उध्दार झाला. हे पुराण कथेतून आपण सर्वांनीच ऐकलेले आहे, परंतु सरांचे लेखन हे वास्तवाशी भिडणारे असते. हे असे पौराणिक संदर्भ घेऊन सर कधी पासून लिहू लागले. मनातला हा संभ्रम दूर करण्यासाठी आधी हे पुस्तक वाचायला हवे म्हणून मला जसं हे पुस्तक मिळालं तसे मी प्रथम “बाईचा दगड” ही कथा वाचून काढली अन् साराच उलगडा झाला.
आपल्या आईच्या आठवणींचा साक्षीदार असणारा हा दगड…. लेखक जेव्हा जेव्हा गावाकडच्या घरी येतात तेव्हा आईच्या आठवणी जाग्या करून जातो. आईच लेकरांवरच प्रेम, मुलं नातवंडांप्रती असलेली ओढ, आपुलकीचे शब्द, मायेची ऊब, प्रेमाचा घास पुन्हा पुन्हा आठवत राहतो आणि आईच्या आठवणीने लेखक अस्वस्थ होऊन जातो. माय लेकराच्या नात्याची सुंदर गुंफण लेखकाने यामध्ये केलेली आहे. जी वाचणाऱ्याला आपल्या आईशी जोडते.
या कथा संग्रहातील सर्वच कथा या एकापेक्षा एक सरस आहेत. “देशद्रोह” ही कथा देशातील लोकशाहीच्या मंदिरावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा पर्दाफाश करते. शिक्षण क्षेत्राचं झालेल बाजारीकरण, संस्था चालकांची मुजोरी, एकंदरीत व्यवस्थेतच माजलेली बजबजपुरी आणि यामध्ये भरडला जाणारा शिक्षक नावाचा प्राणी न घर का न घाट का अशा अवस्थेत दिवस काढतो. भ्रष्टाचाराचा भस्मासुर कशाप्रकारे पवित्र अशा शिक्षण क्षेत्राला पोखरून टाकतोय याचा लेखकाने केलेला पर्दाफाश वाचणाऱ्याला आपला संघर्ष वाटतो. समाज घडवणारा शिक्षक पण आज त्याचे जीवन कशाप्रकारे उध्वस्त होत आहे. ज्ञानदाना बरोबरच त्याला किती लोकांची हांजी-हांजी करावी लागत आहे. सतत होणारी उपेक्षा आणि मनस्ताप विचार करायला लावणारा आहे. “आम्हाला हजार नवरे” म्हणत शिक्षण क्षेत्रात शिक्षकांचे शोषण करणाऱ्यांची यादीच लेखकाने दिली आहे.
“कांबळे विरुद्ध कांबळे” यामध्ये शिक्षण क्षेत्रात गोरगरिबांची होणारी पिळवणूक लेखकाने शब्दबद्ध केली आहे. परंतु व्यक्तिच्या सहनशीलतेचा अंत झाला अन् तो पेटून उठला तर धनदांडग्यांना ही सुता सारख सरळ करू शकतो. याचा प्रत्यय यानिमित्ताने येतो.
“खांदा” नवऱ्याच्या मृत्यू नंतर मुलासाठी, परिवारासाठी पुन्हा हिमतीने उभं राहण्याचा निर्धार करणाऱ्या युवतीची कथा आहे. बापलेकाच्या प्रेमाला नियतिची लागलेली नजर, दु:खाचा डोंगर समोर असताना सुनेला जगण्याचं बळ देणारे सासऱ्याचे शब्द मोडलेला संसार पुन्हा उभा राहण्यास मदत करतात. “मरणरात्र”चे कथानक भाऊक करून जाते. माय लेकराच्या अटूट प्रेमाचा जीवघेणा प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे.
महिलांचा आपल्या न्याय हक्कासाठीचा संघर्ष, वेळप्रसंगी काढलेले मोर्चे आणि जेल मध्ये जाऊन दिलेला लढा स्त्री सक्षमीकरणाचे फलित समजले पाहिजे. स्त्री शक्तीला सलाम करणारे लेखक “हिसका” या कथेच्या माध्यमातून भूकंपग्रस्त महिलांचा संघर्ष विशद करताना स्त्रीच कणखर रूप रेखाटतात.
शिक्षणाचे महत्त्व ओळखून असणारे आई-वडील आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि कुटुंबाचा विकास व्हावा म्हणून आपल उभ आयुष्य गरिबी, दारिद्र्य आणि कष्टात घालवतात. राब-राब राबतात. प्रसंगी शेती विकून मुलांना शिक्षण देतात पण नाॅनग्रॅण्ट शाळेवर अर्ध आयुष्य घालूनही हाती काहीच लागत नाही तेव्हा उद्विग्न होतात. पण प्रयत्न सोडत नाहीत. आणि मुलगा जेव्हा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन कष्टाचे चीज करतो, गाव परिवाराच नाव करतो तेव्हा तो आनंद शब्दांच्या पलीकडचा असतो. बाप परिस्थितीने दरिद्री असला तरी तो विचाराने श्रीमंत असला पाहिजे. हेच “दरिद्री बाप” मधून लेखकाने मांडले आहे.
प्रस्थापित नराधमांकडून गोरगरीब स्त्रियांचं होणारं शोषण आणि त्याचा प्रतिशोध म्हणून पुन्हा दुसर्या स्त्रीच्या अब्रूची लक्तरं वेशीला टांगणारी गावगाड्याची कथा नकळतपणे भूतकाळात घेऊन जाते. दहशत निर्माण करून झालेले “पुनर्वसन” कायमचं आयुष्यातून उठवते. समाज जीवनातील हे वास्तव लेखकाने अगदीच स्पष्ट शब्दांत मांडले आहे.
शेत शिवार हिरवेगार व्हावे म्हणून आपल्याही वावरात बोअरवेल करण्यासाठी ऊस तोडणीला जाणारी अनेक कुटुंब मुकदमाच्या भरोशावर राहतात. कधी यश मिळतं तर कधी निराशा पदरी पडते. परंतु हार न मानता प्रसंगी नाॅनग्रॅण्ट शाळेवरची नोकरी सोडून आई बापाला उसाच्या फडात मदत करणारी शिक्षित, उच्चशिक्षित अनेक मुलं आजही वाड्या वस्त्यावर कष्टाचं, संघर्षाचं जीवन जगत आहेत. त्यांच्या कष्टाचं चीज झाल्याचे ही अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. दारिद्र्य जाऊन तिथे नवचैतन्य येऊ लागलेल आहे ते केवळ शिक्षणामुळेच. जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर नियतीला सुद्धा विचार करावा लागतो आणि संघर्षाचं सोनं होतं. हेच खरे आहे.
शिक्षण क्षेत्रातील संस्थाचालकांची मुजोरी, कर्मचाऱ्यांचे वारंवार कापले जाणारे खिसे, नोकरी टिकवण्यासाठी मूकवर्गणी देणारे मजबूर कर्मचारी हे आजचं वास्तव लेखकाने नेटक्या शब्दांत टिपताना स्त्रीशक्तीचा बुलंद आवाज अशा अपप्रवृत्तींना कशा प्रकारे आळा घालू शकतो याचं चित्रण “मूकवर्गणी” मधून केले आहे.
“शेतकऱ्याची लई मजा आहे” असं म्हणणारी काही पांढरपेशी मंडळी शेतकऱ्यांच्या कष्टाकडे, हाल-अपेष्टाकडे, त्यांच्या दुःखाकडे डोळेझाक करून बोलतात. अशा लोकांचा लेखकाने “बरं का मॅडम” म्हणत शेलक्या शब्दात समाचार घेतलेला आपल्याला दिसून येतो. आपण काय बोलतो, कसं बोलतो याचं अनेकांना बऱ्याच वेळा भान राहत नाही, तेव्हा बरं का मॅडम म्हणत लेखकाने अशा पांढरपेशी लोकांचा शेतकऱ्या विषयीचा गैरसमज आणि अज्ञान दूर केले आहे.
समाजात घडणाऱ्या अनैतिक घटना, उथळ प्रेमाचे दुष्परिणाम आणि मस्तावलेल्या धनदांडग्यांची मुजोरी कशा प्रकारे समाजात अनैतिकता निर्माण करते व त्याचे दुष्परिणाम कुटुंब आणि परिवारातील व्यक्तिंना भोगावे लागतात हे “नकटी”च्या निमित्ताने लेखकाने विशद केले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर साम दाम दंड भेद वापरून फोडाफोडीचे होणारे राजकारण आणि नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत जिकडे सत्ता तिकडे चांगभलं करणाऱ्या संधीसाधू लोकांचा “जनावर” मधून घेतलेला समाचार अस्सल बोलीभाषेचा आणि गावच्या राजकारणाचा पर्दाफाश करतो. दुसऱ्याला गिळंकृत करून स्वतःचा खिसा भरणारे स्वार्थांध लोक चक्क भाऊ-बहिणींना सुद्धा गिळंकृत करतात. “नाऱ्या बहिणी खातो” म्हणत लेखकाने अशा स्वार्थी अन् भामट्या लोकांची पोलखोल केली आहे. परंतु दुर्दैवाने आज अशाच नकारात्मक आणि नकोशा घटना घडत आहेत. ज्यामुळे समाज आणि समाजमन ढवळून निघत आहे. सत्तेसाठी काय पण तसंच स्वार्थासाठी ही काय पण…. ही वृत्ती जोर पकडू लागली आहे. जे व्यक्ती विकासासाठी जरी एखाद्याला पोषक वाटत असलं तरी ते समाज हितासाठी निश्चितपणे मारक आहे. याची जाणीव ठेवण्याची गरज आज निर्माण झालेली आहे.
लेखकाची सामाजिक निरीक्षण क्षमता आणि त्याला शब्दबद्ध करण्याची हातोटी उत्तम आहे. बोलीभाषेतले हे भाषासौंदर्य लेखकाने उत्तम रित्या मांडले आहे. खरंच ग्रामीण समाज आणि संस्कृतीची ओळख करून देणारा हा कथासंग्रह आहे. काही ठिकाणी शिवराळ भाषा प्रयोग करून लेखकाने आपले वेगळेपण जपले आहे.
“बाईचा दगड” या कथासंग्रहातील संपूर्ण कथा वाचकांना खिळवून ठेवतात. क्षेत्र कोणतेही असो शेती, शिक्षण, समाजकारण, राजकारण एकंदरीत सर्वच क्षेत्रात कळत नकळत आज काही नकारात्मक घटना-गोष्टी घडत आहेत. अशा नकोशा घटनांबद्दल सडेतोडपणे लिहून लेखकाने आपल्या मनातील चीड व्यक्त केली आहे. काही ठिकाणी शिवराळ शब्दप्रयोग वापरून त्यास अस्सल ग्रामीण भाषेची झालर जोडली आहे.
एकंदरीत कष्टकरी-कामगारांचे दु:ख आणि शेतशिवारातील घटनांचे वास्तव मांडणारा हा दस्तावेज आहे. असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. शिक्षण क्षेत्रातील जीवघेणे संघर्ष, ऊसतोड मजुरांच्या हालअपेष्टा आणि शेतशिवारातील घटनांचा मांडलेला लेखाजोखा आधुनिक कथासाहित्यामध्ये मोलाची भर टाकणारा आहे.
पुस्तकाचे नाव – बाईचा दगड (कथासंग्रह)
लेखक – डाॕ. भास्कर बडे
प्रकाशन – चपराक प्रकाशन, पुणे
किंमत – १७० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – 9422552279
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.