September 17, 2024
Dhanurmar Meera Utpat Tashi article
Home » धनुर्मास…
मुक्त संवाद

धनुर्मास…

डिसेंबरचा मध्य आला की थंडीचा कडाका वाढायला लागतो..हेमंताची अखेर आणि शिशिराची सुरुवात असा हा संक्रमणाचा काळ.. धुक्यात लपेटलेली सृष्टी..थिजलेल्या खोबरेल तेलासारखे सूर्यबिंब.. दवांनी डवरलेली पानं फुलं.. आणि त्यावर धुक्यातून वाट काढत काढत पसलेली सूर्यकिरणे.. आणि उगवला म्हणता म्हणता मावळणारा दिवस.. असे फार मौजेचे हे दिवस.. याचं सुख अनुभवताना मागं वळून पाहिलं तर सुर्याच्या लांब लांब किरणांनी वेढलेल्या.. आठवणींच्या धुक्यात लपेटलेल्या गतकाळच्या दिवसांच्या स्मृती धनुर्मासातल्या फिकट सूर्यकिरणांसारख्या हव्याहव्याशा वाटतात..मन परत परत त्यात रमून जातं..

पहाटेचा बोचरा गारठा.. लपेटून घेतलेलं उबदार पांघरुण.. झोपेच्या आधीन असलेलं शरीर..अर्धवट जाग..पेंगुळलेल्या डोळ्यांनी घेतलेला ठाव.. नाकात घुसलेला,घरभर पसरलेला खिचडीचा खमंग वास..ही धनुर्मासातली हवीहवीशी पहाट. पापण्या जडावलेल्या असल्या तरी भूक झोपेवर मात करी आणि नाईलाजाने पांघरूण ढकलून उठावेच लागे. भल्या पहाटे उठून अंग धुवून माई आई काकू स्वयंपाकाला लागलेल्या असत.. महिनाभर देवाला मुगाघ्या खिचडीचा नैवेद्य असे.

कोले, कटकमवार, कोंडेवार, वट्टमवार मंडळी धनुर्मासात रूक्मिणी मातेला मूग डाळीच्या खिचडीचा नैवेद्य करत असत. त्यात रविवारी खिचडीच्या नैवेद्याचे जास्त महत्त्व असे. सोमवारी खिचडी करायची नाही अशी प्रथा होती. सूर्य उगवायच्या आत नैवेद्य तयार करावा लागे. रूक्मिणी मातेला आणि सूर्याला नैवेद्य दाखवून झाला की आम्हाला खायला मिळे‌. मऊसूत गरम गरम वाफाळती खिचडी, वर लोणकढं तूप, पापड, डावीकडं शेंगदाण्याची चटणी, लालभडक खमंग लोणचं,घट्ट, मधुर सायीचं दही, आणि लोणी साखर असा मस्त बेत असे.. रसना तृप्त होत असे. मला हा धनुर्मास फार आवडत असे. माई त्याला धुंधुरमास म्हणत असे..ती सांगत असे की हा सूर्याचा धनुराशीत संक्रमणाचा काळ.. याला ‘धनुसंक्रांत’ असेही नाव आहे. भोगीच्या दिवशी धनुर्मास संपतो. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून ती मकर संक्रांत.

अन्नधान्य पिकवण्यासाठी जसा पाऊस आवश्यक असतो तसा सूर्य प्रकाशही गरजेचा असतो.. आणि या दिवसांत सूर्य प्रकाश किती हवाहवासा वाटतो. त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गरम गरम खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे.. आपल्या पूर्वजांनी त्या त्या ऋतुनुसार त्या त्या देवतेला कुठल्या गोष्टी अर्पण करायच्या हे ठरवलं आहे. किती समर्पक आहे हे सारं.. आरोग्य आणि धर्म याचा सुरेख मेळ प्रत्येक ऋतू,सण उत्सवात साधलेला आहे.

या दिवसांत विठोबा सुद्था घोंगडी पांघरून, पागोटं गुंडाळतो.. रूक्मिणी माता उबदार शाल पांघरते. इतके गोड आणि मोहक दिसतात मायबाप!! विठोबा तर मला देवा पेक्षा आपल्यातल्याच एक वाटतो..इतका तो आपल्यात मिसळून गेला आहे.म्हणून त्याचे उपचारही माणसासारखे आहेत.. त्याला थंडी वाजते. शिणवटा येतो. मग त्याला घोंगडी पांघरतात..काढा देतात.. देवाला महिनाभर मऊसूत खिचडी लोणी साखरेचा नैवेद्य असतो..धनुर्मास फार भरकन संपतो..पण माझ्या स्मरणात मात्र तो दीर्घकाळ टिकून आहे…


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मानला तर देव नाहीतर तो दगडच…

Navratri Biodiversity Theme : निळ्या रंगातील जैवविविधतेची छटा…

शनिवार पासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार!

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading