September 8, 2024
Disciple attitude article by rajendra ghorpade
Home » शिष्याचे स्वभावदर्शन
विश्वाचे आर्त

शिष्याचे स्वभावदर्शन

अंहकाराने मदमस्त झालेल्या मानवाला आता या घटनांच्या मागे कोण आहे याची कल्पनाही नाही. किंवा ती जाणून घेण्याचीही त्याची इच्छा नाही. कारण तो अहंकाराने अधिकच अंध झाला आहे. त्यामुळे त्याला या गोष्टी पटणेच शक्य नाही. अनुभूतीने ही गोष्ट नव्या पिढीला जोपर्यंत समजणार नाही, तोपर्यंत त्याचा हा मीपणा गळून पडणार नाही.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

भक्त जैसेनि जेथ पाहे । तेथ ते तेंचि होत जाये ।
तो मी तुझें जाहालों आहें । खेळणें आजि ।। २८४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – भक्त ज्या भावनेने जेथे पाहील, त्या भावनेप्रमाणें मी तेथें होत जातो, असा तो मी, तो आज तुझ्या पूर्ण स्वाधीन झालों आहे.

भक्ताची भक्ती खरी असेल तर देव त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतो. या संदर्भात इतिहासातील अनेक दाखले देता येऊ शकतात. भक्त प्रल्हादासाठी देव खांबातून प्रकट झाला. संत गोरा कुंभारासाठी तो मडक्यांसाठी चिखल मळायच्या कामात गुंतला. संत जनाबाईंसाठी तो जात्यावर दळण दळायला लागला. अर्जुनासाठी कृष्ण रथाचा सारथी झाला. अशी एक ना अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत. पण या मागचे कारण समजून घेणे गरजेचे आहे. भक्ताच्या अधिन देव इतका कशासाठी होतो ? भक्तामध्ये तो इतका कशासाठी गुंततो ? भक्ताला अनुभूती यावी यातून त्याचा विश्वास, प्रेम, श्रद्धा वाढावी यासाठीच देव अशी रुपे घेत असतो. देव सर्वत्र आहे. सर्वामध्ये त्याचा वास आहे. अशी अनुभूती देण्यासाठीच तो इतका स्वाधीन होतो.

सध्याच्या नव्यापिढीला, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील या मानवाला अशा कल्पना रुचने मोठे कठीणच आहे. मी इतके शोध लावले, मी चंद्रावर पोहोचलो, मी इतके मोठे कार्य केले हा त्याच्यातील मीपणाचा अहंकार त्याला या आध्यात्मिक विचारापासून दूर लोटतो आहे. अंहकाराने मदमस्त झालेल्या मानवाला आता या घटनांच्या मागे कोण आहे याची कल्पनाही नाही. किंवा ती जाणून घेण्याचीही त्याची इच्छा नाही. कारण तो अहंकाराने अधिकच अंध झाला आहे. त्यामुळे त्याला या गोष्टी पटणेच शक्य नाही. अनुभूतीने ही गोष्ट नव्या पिढीला जोपर्यंत समजणार नाही, तोपर्यंत त्याचा हा मीपणा गळून पडणार नाही. तोपर्यंत त्याची आध्यात्मिक प्रगतीही होणे अशक्य आहे. हा मी म्हणजे कोण ? मनात विचार उत्पन्न करणारा हा मी कोण ? मनात कल्पना प्रकट करणारा हा मी कोण ? हा मी म्हणजे आत्मा आहे. भगवंत आहे. हे आत्मज्ञान त्याला व्हायला हवे. ही अनुभूती त्याला यायला हवी. तेंव्हाच हे विचार पटतील. यासाठीच देव अशी वेगवेगळी रुपे घेऊन आपल्या आसपास वावरत असतो.

आपली दृष्टी यासाठीच बदलायला हवी. पाहाण्याचा दृष्टिकोण हा बदलायला हवा. अनुभूतीतून हा बदल घडायला हवा. यासाठी अवधान हे असायला हवे. सदैव सावध राहून भगवंताची ही विविध रूपे जाणून घ्यायला हवीत. सर्वत्र असणारा त्याचा वावर हा अनुभवायला हवा. भक्त ज्या गोष्टीत पाहातो त्या गोष्टीत भगवंत त्या रुपात प्रकट झालेला असतो. शिष्याला आपली ओळख व्हावी यासाठी भगवंताचा हा प्रयत्न असतो. जीवनात अवघड वाटणारी एखादी गोष्ट जेव्हा अगदी सहजरित्या होते तेव्हा तोंडून अगदी सहजच भगवंताची स्तुती व्यक्त होते. ही अनुभूती ही केवळ शिष्याची प्रगती साधण्यासाठी भगवंत देत असतात.

आपल्या मनात प्रकट होणारे विचारही आपले नाहीत तर ते भगवंतांनी आपल्या मनात उत्पन्न केले आहेत. हा ब्रह्मसाक्षात्कार व्हायला हवा. यावर आपली श्रद्धा असायला हवी. पण आपल्यातील मीपणाने ही अनुभूती येत नाही. भक्त जसा विचार करतो तसे ते घडत जाते. इतके ज्ञान भक्तामध्ये प्रकट होते. या सहजतेलाच अध्यात्म म्हणतात. भगवंताची अनुभूती त्याची नित्यता याची जाणीव सदैव राहाणे हेच अध्यात्म आहे. हीच अनुभूती घेऊन आत्मज्ञानी व्हायचे आहे. देवाप्रती असणारे प्रेम यातून वृद्धींगत होते. बाबा महाराज आर्वीकर दिव्यामृतधारेमध्ये म्हणतात, श्रीगुरुंच्या प्रेमवलयात चित्त स्थिर करीत त्यांच्या आनंदरुपाचा भोग घेत हळूहळू आपले अहं तत्त्व त्या प्रेमात विसर्जित होईल असे करीत राहाणें हे शिष्याचे स्वभावदर्शन होय. हे सर्व अनुभवायला हवे तेंव्हाच अध्यात्म समजेल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

विज्ञानाचा आधार घेत संगतपणे कथन करणाऱ्या विज्ञान कथा

आत्मा कसा आहे ?

मौसमई नैसर्गिक गुहा: निसर्गाची अजब किमया

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading