डीआरआयने नाशिकजवळ घोरपडीच्या 781 पुरुष प्रजनन अवयव जोडी (हत्था जोडी )आणि 19.6 किलो मृदू प्रवाळ (इंद्रजाल) केले जप्त
मुंबई – वन्यजीव तस्करांची एक टोळी हत्था जोडी, घोरपडीचे पुरुष प्रजनन अवयव आणि मृदू प्रवाळ यासाठी संभाव्य खरेदीदार शोधत असल्याची गुप्त माहिती डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाला प्राप्त झाली होती. या गुप्त माहितीनुसार डीआरआय मुंबईच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने तस्करांना पकडण्यासाठी योजना आखली. तस्कराने खरेदीदाराला नांदगाव रेल्वे स्थानकावर (नाशिक जिल्हा) बोलावले. मात्र सुमारे तीन तास त्यांचे स्थान बदलणे सुरू होते. डीआरआयचे पथक त्याच्यावर पाळत ठेवून होते. तस्कराने शेवटी चारचाकी जाऊ शकणार नाही असे दुर्गम आदिवासी वस्तीतले काटेरी झुडपे असलेले कठीण ठिकाण ठरवले.
टेहळणीसाठी तस्करांनी संपूर्ण परिसरात 3-4 गस्ती पथके ठेवली होती. डीआरआयच्या पथकाने ओळख लपवण्यासाठी आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत आपल्या वाहनांवर निळे झेंडे लावले. त्यामुळे इतर वाहनांमध्ये त्यांची वाहने मिसळून गेली.
तस्करांनी विक्रीसाठी माल काढताच डीआरआयच्या पथकाने त्यांच्या दिशेने धाव घेतली. पण बाईकवरच्या टेहळणी गटाने त्यांना अडवले. तस्कर सतर्क झाले आणि क्षणार्धात डीआरआयचे पथक तीसएक जणांच्या समूहाने घेरले गेले. त्यांनी अधिकाऱ्यांवर दगडफेक करायला सुरुवात केली. या संधीचा फायदा घेऊन तस्कर आणि त्याच्या सहाय्यकांनी मालासकट पळ काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र अधिकाऱ्यांनी अत्यंत दुर्गम परिसरात अर्धा किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग केला आणि तस्करांना ताब्यात घेतले. पथकाने त्यांच्याकडून वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या सूची -I अंतर्गत सूचीबद्ध 781 हत्था जोडी आणि 19.6 किलो मृदू प्रवाळ जप्त केले.
जप्त केलेल्या जंगली वस्तू आणि ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्ती वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत पुढील कारवाईसाठी महाराष्ट्र राज्य वनाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या.
नाशिक जिल्ह्याच्या दुर्गम परिसरात करण्यात आलेली ही कारवाई वन्यजीवांशी संबंधित गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठीची डीआरआयची प्रतिबद्धता दर्शवते. तसेच विविध कायदा अंमलबजावणी संस्थांमधल्या समन्वित कृतीचे महत्त्वही अधोरेखित करते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.