- पाण्याचे विभाजन करून हायड्रोजन निर्मितीसाठी भारतीय व जर्मन पेटंट
- शिवाजी विद्यापीठातील प्रा. (डॉ.) सागर डेळेकर व प्रमोद कोयले यांचे संशोधन
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील रसायनशास्त्र अधिविभागातील प्रा. (डॉ.) सागर दा. डेळेकर आणि त्यांचा संशोधक विद्यार्थी प्रमोद अभंगराव कोयले यांनी नॅनो समिश्रे आधारित हायड्रोजन निर्मितीसाठी पाण्याचे विभाजन याचा सखोल अभ्यास केला असून हे संशोधन कार्यास त्यांना एक भारतीय व तसेच एक जर्मन पेटंट मिळाले आहे. या संशोधनाला विज्ञानामध्ये एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ज्यामध्ये पाणी आणि सूर्यप्रकाश यांसारख्या नैसर्गिक स्रोतापासून ग्रीन हायड्रोजनची निर्मिती, त्याचा इंधन म्हणून वापर, व कमी कार्बन उत्सर्जन यांचा समावेश होतो.
संपूर्ण जगात सध्या पेट्रोल, डिझेल, कोळसा इत्यादी पारंपारिक इंधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे, जो आगामी भविष्यात एके दिवशी नक्की संपुष्टात येईल. त्याचबरोबर वाढते जागतिक प्रदूषण, उच्च कार्बन उत्सर्जन व त्यामुळे उद्भवलेल्या आरोग्य समस्या इत्यादीसाठी हे पारंपारिक स्रोत जबाबदार आहेत. म्हणूनच, बहुतेक शास्त्रज्ञ हे पाणी, सूर्यप्रकाश, वारा इत्यादी नैसर्गिक घटकांचा वापर करून इंधन स्त्रोत विकसीत करीत आहेत. यामध्ये हायड्रोजनचा वापर ऑटोमोबाईल्स, उद्योग, वीज उत्पादन आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये केला जाऊ शकतो.
याच अनुषंगाने प्रा. डेळेकर व कोयले यांनी धातू ऑक्साईड, मेटल-ऑरगॅनिक फ्रेमवर्क (MOFs), व कार्बन अब्जांशनलिका (Carbon Nanotubes) आधारित नॅनो समिश्रे वापरून फोटोइलेक्ट्रोकेमिकल पद्धतीने पाण्याचे विभाजन व त्याचा अभ्यास केला. ही नॅनो समिश्रे पाण्यापासून हायड्रोजन तयार करण्यासाठी उपयुक्त आहेत हे या संशोधनातुन साध्य झाले आहे. हे संशोधन प्रतिष्ठित अमेरिकेच्या अप्लाइड नॅनो मटेरियल्स आणि इंटरनॅशनल जर्नल ऑफ हायड्रोजन एनर्जी या संशोधनपत्रिकांमध्येही प्रकाशित झाले आहे.
या महत्वपूर्ण संशोधनाबद्दल व पेटंट्स बद्दल प्रा. डेळेकर व कोयले यांचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्यासह सहकारी शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.