गेल्या कित्येक वर्षांत शेतीच्या उत्पादकतेत घट होताना दिसत आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. वाढते जागतिक तापमान, पावसाची अनियमितता, गारपीट, बदलते हवामान ही मुख्य कारणे असली तरी पिकाच्या वाढीवर हवेचे प्रदूषणही परिणाम करत आहे. वाढत्या शहरी व औद्योगिकीकरणामुळे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा वनस्पतींच्या वाढीवर दुष्परिणाम होत आहे. यावर विविध पातळीवर संशोधन केले जात आहे. भोपाळ येथील भारतीय मृदशास्त्र विभागाच्या संशोधकांकडून करण्यात आलेल्या संशोधनाविषयी थोडक्यात….
वाढते औद्योगिकीकरण आणि ऑटोमोबाईलमुळे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा परिणाम वनस्पतीच्या पानांमध्ये होणाऱ्या प्रकाशसंश्लेषण क्रियेवर होतो. पानांमधील क्लोरोफिल ‘अ’, क्लोरोफिल ‘ब’ आणि कॅरोटिनॉईडस् या रंगद्रव्याच्या प्रमाणात घट होताना आढळली आहे. भोपाळ येथील भारतीय मृदशास्त्र संस्थेतील संशोधक सुमित्रा गिरी, दीपाली श्रीवास्तव, केतकी देशमुख आणि पल्लवी दुबे यांनी प्रयोगाअंती हे सिद्ध करून दाखवले आहे. वाहनांतून निघणाऱ्या धुरामुळे आणि औद्योगिक वसाहतीमधून बाहेर पडणारी नायट्रोजनची ऑक्साईडस्, सल्फर आणि राखेच्या कणांमुळे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. या प्रदूषणामुळे वनस्पतींच्या उत्पादन क्षमतेमध्ये तसेच बियांच्या उगवण क्षमतेमध्ये घट होते, असा निष्कर्ष या संशोधकांनी काढला आहे.
असे केले संशोधन
संशोधकांनी भोपाळ शहरातील अतिप्रदूषित व कमी प्रदूषण असणाऱ्या भागातून लिंब, कणेरी, आंबा आणि शिसम या वनस्पतींची पाने गोळा करून त्यांतील घटकांची तपासणी केली. तसेच शहरात वाहनांची गर्दी असणाऱ्या रस्त्यावरील व वाहनांची तुरळक संख्या असणाऱ्या रस्त्यावरीलही या वनस्पतींची पाने त्यांनी गोळा करून त्याचा अभ्यास केला.
असे तपासले क्लोरोफिलचे प्रमाण
लिंब, कणेरी, आंबा आणि शिसम या झाडांची पाने विविध भागांतून गोळा करण्यात आली. यांतील ५० मिलिग्रॅम वजनाची पाने कुस्करून त्यातील रस काढण्यात आला. या रसामध्ये असणाऱ्या क्लोरोफिलचे प्रमाण प्रयोगशाळेत तपासण्यात आले. गोळा केलेला रस टेस्ट ट्यूबमध्ये घेऊन त्यामध्ये १० मिली डायमिथिल सल्फरडायॉस्काईड (डीएमएसओ) टाकले. ही टेस्ट ट्यूब ओव्हनमध्ये ६० ते ६५ अंश तापमानात चार तास ठेवण्यात आली. त्यानंतर स्पेक्ट्रोमीटरच्या सहाय्याने लिंब, कणेरी, आंबा आणि शिसममधील क्लोरोफिलचे प्रमाण मोजण्यात आले.
निष्कर्ष
हवेतील धूलिकण, राख यांसह वायूच्या प्रदूषणामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेवर दुरगामी परिणाम दिसून येतो. क्लोरोफिलच्या प्रमाणात घट होते. संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार लिंबामध्ये ५३ टक्के, कणेरीमध्ये ४२ टक्के, शिसममध्ये ३९ टक्के, तर आंब्यामध्ये २७ टक्के क्लोरोफिलचे प्रमाण घटल्याचे आढळले. याचा परिणाम झाडाच्या बाह्य आकारावरही दिसून आला. झाडामधील फिजिओलॉजिकल, बायोकेमिकल क्रियावरही याचा परिणाम दिसून आला. संशोधकांनी हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषणग्रस्त भागात ग्रीन बेल्ट विकसित करण्याची गरज असल्याचा निष्कर्ष काढला आहे.