अध्यात्म हे अनुभव शास्त्र आहे. पारायणातून, ग्रंथाच्या अभ्यासातून ही अनुभुती येत राहाते. समस्त मानव जातीच्या कल्याणाचा विचार या ग्रंथात दिला आहे. विश्वाचे कल्याण व्हावे, ज्याला त्याला त्याच्या इच्छेनुसार फळ मिळत राहो, असा प्रसादही या ग्रंथातून मिळतो. म्हणूनच हा ग्रंथ नित्य वाचावा, अशी इच्छा उत्पन्न होते. चुकांना योग्य मार्गदर्शन या ग्रंथातून होत राहील्याने आत्मज्ञानाचा मार्ग सुकर होतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
तैसा प्रबंधु हा श्रवणी । लागतखेवो समाधि आणी ।
ऐकिलियाही वाखाणी । काय व्यसन न लवी ।। १७४४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – त्याप्रमाणे ही माझी ओवीबद्ध टीका कानांवर पडताक्षणी श्रोत्याला समाधि आणिते व माझ्या ओवीबद्ध टीकेचे व्याख्यान ऐकले असता हे व्याख्यान ऐकण्याचे व्यसन लावणार नाही काय ?
प्रत्यके ग्रंथाचे काही ना काही वैशिष्ट्य असते. ग्रंथातून जनतेचे प्रबोधन केले जाते. तसे ज्ञानेश्वरीचे सुद्धा वैशिष्ट्य आहे. अनेकांना तसे अनुभव, अनुभुतीही आली आहे. ज्ञान संपन्न होण्यासाठीच ज्ञानेश्वरीची पारायणे होतात. पारायण दुसरा जरी करत असला तरी तो वाचत असलेल्या ओव्या कानावर पडल्या तरी त्यातून बोध होऊ शकतो. इतके सामर्थ्य त्या ओव्यांच्या रचनेत आहे. जसा ओवीचा अर्थ लावाल तसा त्या ओवीचा अर्थबोध होतो. प्रत्येकवेळी त्यात नाविन्य असते. त्याच्या अर्थात सृजनशीलता आहे. म्हणूनच आज ७०० वर्षांनंतरही त्या ज्ञानेश्वरीची पारायणे होतात. काळ बदलला, वेळ बदलली, विकासही झाला तरी त्यातील शास्त्र मात्र कायम आहे. त्यामुळेच त्यातील ओव्या आजही आपणास अनुभव देत राहतात.
ज्ञानेश्वरी परंपरेतील काही आत्मज्ञानी संतांच्या संजीवन समाधीजवळ ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाचण्यासाठी ठेवला जातो. काही ठिकाणी तेथे एक फलकही पाहायला मिळतो. हा ग्रंथ श्रद्धापूर्वक उघडा आपणाला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. ग्रंथाचे जे पान तुम्ही उघडाल त्या पानावरील ओव्यात तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. खरंच असे घडतेही असा अनेकांचा अनुभव आहे. काहींना ही अंधश्रद्धा वाटेल. अतिशोक्तीही वाटेल. पण या ग्रंथातून आपल्या जीवनातील प्रश्नांना उत्तरे निश्चितच मिळतात. हा आध्यात्मिक अनुभुतीचा विषय आहे. प्रत्येकाला ही अनुभुती येईलच असे नाही. पण बऱ्याच जणांना यातून समाधानकारक उत्तरे मिळाली आहेत. ज्ञानेश्वरीतील एक आत्मज्ञानी परंपराही अशाच अनुभुतीतून जन्माला आलेली आहे. देवनाथ महाराज यांनी आळंदी येथे ज्ञानेश्वरीची पारायणे करून आत्मज्ञान मिळविले होते. त्यांनी सुरु केलेली ही परंपरा आजही मराठी नगरीत अखंड विस्तारत आहे. त्यामध्ये अनेक थोर संतही होऊन गेले.
शांत चित्ताने स्वतःला भेडसावणारे प्रश्न अभ्यासले तर ज्ञानेश्वरीतून आपल्या प्रश्नांना निश्चितच उत्तरे मिळतात. इतके सामर्थ्य या ग्रंथात आहे. जीवनातील अडीअडचणीवर समाधानकारक उत्तरे या ग्रंथाच्या अभ्यासातून मिळतात. स्वतःच्या होणाऱ्या चुकांचीही आठवण हा ग्रंथ करून देतो. फक्त त्याचे पारायण हे श्रद्धने करायला हवे. जीवनातील नैराश्य दूर करण्याचे सामर्थ्य या ग्रंथात आहे. कारण हा ग्रंथ स्व ची ओळख करून देतो. या ओळखीतूनच वाचकाला त्याची उत्तरे मिळू लागतात. अन् यातून नैराश्य दूर होते. साहजिकच हा ग्रंथ वारंवार वाचण्याचे व्यसनच लागते. सतत वाचन करावेसे वाटणे हेच या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.
अध्यात्म हे अनुभव शास्त्र आहे. पारायणातून, ग्रंथाच्या अभ्यासातून ही अनुभुती येत राहाते. समस्त मानव जातीच्या कल्याणाचा विचार या ग्रंथात दिला आहे. विश्वाचे कल्याण व्हावे, ज्याला त्याला त्याच्या इच्छेनुसार फळ मिळत राहो, असा प्रसादही या ग्रंथातून मिळतो. म्हणूनच हा ग्रंथ नित्य वाचावा अशी इच्छा उत्पन्न होते. चुकांना योग्य मार्गदर्शन या ग्रंथातून होत राहील्याने आत्मज्ञानाचा मार्ग सुकर होतो. यातील ओव्या ह्या वाचकाशी संवाद साधतात. ती ओवी मनाला स्पर्श करते अन् मनातील सर्व दुषित दूर होते. अज्ञान गेल्यानंतर केवळ ज्ञानच उरणार. या ज्ञानानेच सर्व उत्तरे आपोआप मिळत राहातात अन् प्रगती होत राहाते. फक्त श्रद्धापूर्वक, विश्वासाने याकडे पाहायला हवे. नुसत्या ओव्यांच्या श्रवणातून समाधीही प्राप्त होते इतके सामर्थ्य या ओव्यामध्ये आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.