‘ व्योम व्यथांचे व्यापक ‘ या शिर्षक कवितेत कवी मनाच्या एकटेपणाची जाणीव होऊन परिस्थितीला सामोरे जाताना दिसतो. कवीच्या मनाचे घनाशी असलेले नाते, कधी निरभ्र आकाश तर कधी घुसमटलेले, मेघांचे मायावी रंग, निसर्गातील प्रतीके हे सारे समवेत असले तरी हे विसरता येत नाही की व्यथाही व्यापक आहेत. अवघे आकाश व्यथांनी व्यापून टाकले आहे.
सुहास रघुनाथ पंडित, सांगली
9421225491
जगण्याच्या स्पर्धेत धावाधाव करताना आपल्याला स्वतःकडे पहायलाही वेळ असत नाही.अशा धकाधकीच्या जीवनात अंतर्मुख होऊन, स्वतःच्याच आयुष्याकडे तटस्थपणे पाहून, कविमनाच्या रसिकतेला धक्का न लावता, मनातील विचारघनांतून शब्दांचा शिडकावा करत व्यथांचे व्यापक असे व्योमही सुसह्य करणाऱ्या कविता सादर करुन कवी शरद कुलकर्णी यांनी आपल्या सर्वांच्याच जगण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अलिकडेच त्यांचा ‘ व्योम व्यथांचे व्यापक ‘ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्या कविता पुस्तक रुपाने वाचकांसमोर आणून त्यांनी आपले मनच उघडे केले आहे. सुखदुःखाबरोबरच प्रेम, निसर्ग, आत्मचिंतन करणाऱ्या कविता त्यांनी आपल्यासमोर आणल्या आहेत. आत्मसंवाद आणि आत्मानुभवाच्या या कविता वाचकालाही विचार करायला लावणाऱ्या आहेत.
कलावंताला व्यक्त होण्यासाठी त्याच्या कलेचे माध्यम उपयुक्त ठरते. याठिकाणी कविने आपली कविता हेच माध्यम वापरुन आपल्या मनाचे पदर उलगडले आहेत. किंबहुना कवितेने कविला ‘आत्मज्ञाना’चा मार्ग दाखवला आहे असे वाटते. आयुष्यात आपल्याला नेमकं काय हवं आहे याचं ज्ञान आपल्याला व्हावं एवढच कवीचं मागणं आहे.
म्हणून कवी म्हणतो,
” भूक समजावी माझी
आणि कळावी तहान
नाही आणिक मागणे
व्हावे इतुकेची ज्ञान “
कवीतेनेही कवीचे मागणे मान्य केले आहे याचे प्रत्यंतर पुढच्या अनेक कविता वाचताना येतो. जीवनातील सत्य काव्यात्म पद्धतीने समजावताना कवी म्हणतो,
” झाडांचे वैभव सरता
पाखरे उडून जाती
जखडून जायबंदी मी
शोधतो नव्याने नाती “
वैभव सरत असतानाही नवी नाती शोधण्याची कवीची वृत्ती जीवनावरील प्रेमाचे द्योतक आहे. त्याच वेळेला अंतीम क्षणाची जाणीव व्यक्त करताना कवी आपल्या आयुष्याकडे किती तटस्थपणे पाहू शकतो हे अनुभवायला मिळते.कवी लिहीतो आहे ,
” नाही आक्रोश आकांत
नाही अश्रूंचे प्रपात
नेणिवेच्या पलीकडे
सारे अवकाश शांत “
कदाचित या तटस्थपणामुळेच कवी म्हणून शकतो की ,
” सांभाळीत सर्व किनारे
मी व्रतस्थ कालसरिता
दैनंदिनीत जरी बंदिस्त
बंधमुक्त मी कविता “
अध्यात्माशी जवळीक साधल्यामुळेच अशी तटस्थ वृत्ती त्यांच्या अन्य कवितांमधूनही दिसून येते.
” कधी कधी चष्मा काढून
थोडेफार डोळेही पुसावे
तुका म्हणे उगी राहावे
एवढे तरी अध्यात्म जमावे “
किंवा ” आता प्रयोजन जगण्याचे,
आयुष्यालाच विचारावे
प्रत्येक ऋतू समजून घेत,
समजूतदार व्हावे “
या काव्यपंक्ती हेच दर्शवतात.या वृत्तीमुळेच कवी सहजपणे म्हणू शकतो, ” साफल्य,वैफल्य
दोन्हीही सापेक्ष
निरपेक्ष मन
शअसो द्यावे. ” तर कधी त्याला वाटते
” देह मानवाचा जरी व्यथा ईश्वरी भोगाव्या डोळे संतांचे असावे ठेवा दुःखाचा जपावा “
पण असे असले तरी कविलाही सामान्य माणसाप्रमाणे सुखदुःखे भोगावी लागतातच.त्यामुळे त्यातून येणारे अनुभव कवितेतून शब्दबद्ध होत जातात.व्यावहारिक जगात पदोपदी येणारा खोटेपणाचा अनुभव मन उद्विग्न करुन टाकणारा असतो.त्यामुळे हे सगळं जगच खोटेपणाने भरुन राहिले आहे की काय अशी मनाची भावना होऊ लागते.सत्याचा क्वचित प्रसंगी येणारा अनुभवही असत्य वाटू लागतो.मनाला वाटते,”स्वप्न खोटे,वास्तव खोटे
ऐहिकाचे ज्ञान खोटे
जिंकणारे वचनात अंतिम
सत्यही झूट खोटे “
पण याला पर्याय नाही हे जाणून घेऊन, जनरीतीचा आधार मदतीला घेऊन , ” तरी टेकविला माथा
केली तडजोड
सर्वत्र बिघाड
मान्य केला “
का ? तर दुसरे मन हेही बजावत असते की चुकली तरी ही माणसं आपलीच आहेत.सोसलं पाहिजे.हे भिन्न प्रवाह आपणच जोडले पाहिजेत.आपणच व्हावं,
” कधी सुजाण संयमी
कधी पूल समजूत
दोन विभिन्न मतांचा
पूल एक शांतिदूत ” पण ही शिकवण तरी कुठून मिळते ? डोळे उघडे ठेवून समजून घ्यायचा प्रयत्न केला तर सहज समजते की निसर्गच आपल्याला कितीतरी गोष्टी शिकवत असतो.”कधी असावे तटस्थ
कधी राहून व्रतस्थ
अध्यात्म जगावे
तरुवत ” किंवा
” कधी चिमणी होऊन
घर मेणाचे बांधावे
क्षेमकुशल ठेवावे
अबाधित “
मग निसर्गही आपला वाटू लागतो.जवळचा वाटू लागतो.आपल्या मनाच्या विविध अवस्था या निसर्गाशी निगडीत आहेत असे वाटू लागते.एक पाऊसच मनाला चिंब करुन टाकत असतो आणि त्याची विविध रुपे ही जणू मनाचीच विविध रुपं असतात.कवी या पावसाशी इतका एकरुप होतो की शेवटी त्याला जाणवते की,
“पाऊस थेंब थेंबांचा पाऊस एक सरिता
निःशब्द करुन ठरली नीरव शांत कविता “
निसर्गाशी एकरूप झाल्यामुळेच कविच्या प्रेमकाव्यातही
निसर्ग भरुन राहिलेला दिसतो.’ती’ कधी श्रावणाची बरसात होते तर कधी तिच्यात कधी तरुचा धुंद बहर दिसू लागतो.कधी ती गंधयुक्त शीतल झुळूक असते तर कधी शांत सरिता बनते.कधी ती आठवणींचा सैलाब बनते.तर कधी सुखाची सावली होऊन रिझवत असते.
या सर्व कवितांच्या अर्थ व्यापकपणे समजून घेण्यासाठी संपूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे.पण याशिवाय अन्य काही कवितांचा उल्लेख करणे उचित ठरेल.‘यार होतो मी नवा ‘ ही कविता खूप वेगळी वाटते.कारण या कवितेत कविने मराठी ,हिंदी आणि उर्दू शब्दांच्या चपखलपणे केलेल्या वापरामुळे शेरोशायरी गझल आठवल्याशिवाय रहात नाही.’नुसतंच’ या कवितेतून कवितेच्या निर्मिती अवस्थेत कविच्या मनाची होणारी अवस्था व्यक्त झाली आहे.पावसाची विविध रुपे विविध अर्थांनी व्यक्त करणारी कविता म्हणजे ‘ आर्त पाऊस ‘
तर ‘ यश ‘ ही कविता एक उत्तम उपहासात्मक प्रेमकाव्य म्हणावे लागेल.’ प्रश्न ‘ हे गझलसदृश काव्य त्यातील शेरांमुळे उठावदार झाले आहे. ‘ महाकवी मी बाजारी ‘ या कवितेतून कविने काळाबरोबर होणारी फरफट योग्य शब्दात व्यक्त केली आहे.तर ‘ प्रारब्ध ‘ या कवितेतून कविने जणूकाही अपयशाची प्रामाणिक कबुलीच दिली आहे.परिस्थितीला सामोरे जाताना जी भूमिका घ्यावी लागते, मग ती आपल्याला पटो न पटो, त्याचे चित्रण ‘ लिपीत मौनाच्या ‘ या अतिशय छोट्या कवितेत केलेले दिसते.
कविचे मागणे तरी काय आहे ? ‘ येवो मरण कधीही ‘ या कवितेत कवी म्हणतो कवितेशी, शब्दांशी इमान राहो, बाकी मरणाची फिकीर नाहीच. केव्हाही येवो. आणि त्या पश्चात ओळख राहणार असेल तर कवी म्हणून ओळख रहावी. अशी ही प्राणप्रिय कविता कशी अंकुरते याचे रहस्य ‘आतल्याआत ‘ या कवितेत कविने उलगडले आहे.
‘आतून ‘ आल्याशिवाय कविता अंकुरत नाही हे सांगताना कविने दिलेले दाखले कविमनालाच समजू शकतात. ‘चिमणी ‘ ही आणखी एक, चिमणीसारखी छोटी कविता, पण खूप मोठा आशय घेऊन आलेली. थोड्याश्या यशाने हुरळून जाणे , भ्रमात जगणे व्यर्थ आहे हे शिकवणारी ही चिमणी. संध्याकाळ नेमकी कशी असते हे चित्रमय शब्दात रंगवणारी कविता म्हणजे ‘ संध्याकाळी ‘. कातरवेळेचे नेमके चित्र डोळ्यासमोर उभे रहावे अशी कविता ! तर भूतकाळात रमणारी ‘ भातुकली ‘ ही कविता , आठवणींचे बोट धरुन हरवलेल्या गावात जाणारी.
अशा किती कविता सांगू ? कवीची काही दैवते आहेत. त्यांच्यावरही कविने काव्य केले आहे .मी दुःखाचा कवी असे म्हणणारे कवी ग्रेस, स्वरांचे चांदणे पसरणाऱ्या किशोरी अमोणकर स्वतःच्या हस्तस्पर्शाने वाद्यांतून मनमोहक स्वर उमटवणारे संगीतकार मदन मोहन आणि चंदेरी सूरांच्या तलम वस्त्राने मनाला वेढून टाकणारे तलत मेहमूद यांच्या विषयी प्रेम, आदर आणि त्यांच्यातील दिव्यत्वाचे दर्शन घडवणाऱ्या कविता अत्यंत मोजक्या शब्दात त्यांचे व्यक्तिमत्त्व उजळून टाकतात.
‘ व्योम व्यथांचे व्यापक ‘ या शिर्षक कवितेत कवी मनाच्या एकटेपणाची जाणीव होऊन परिस्थितीला सामोरे जाताना दिसतो. कवीच्या मनाचे घनाशी असलेले नाते, कधी निरभ्र आकाश तर कधी घुसमटलेले, मेघांचे मायावी रंग, निसर्गातील प्रतीके हे सारे समवेत असले तरी हे विसरता येत नाही की व्यथाही व्यापक आहेत. अवघे आकाश व्यथांनी व्यापून टाकले आहे. त्यातून कुणाचीही सुटका नाही. अवघ्या आयुष्याकडे पहायचे म्हणजे सुख-दुःखाचा ताळेबंद मांडायचा. आणि असा हिशेब मांडतानाही कविला ,” अव्यक्ताला व्यक्त करत,कवितेच्या वाटेवरुन नियोजित ठिकाणी पोहोचायचं आहे.” हा प्रवास कविनेच म्हटल्याप्रमाणे शब्दांशी इमान राखून आणि आपली काव्यमुद्रा उमटवून पूर्ण करायचा आहे.’पथ्य ‘ सांभाळून चालू असलेल्या या ‘उपचारांना’ नक्कीच यश येईल व अशीच सशक्त कविता कविच्या लेखणीतून पाझरत राहिल याविषयी शंकाच नाही.
काव्यसंग्रह : व्योम व्यथांचे व्यापक
कवी : शरद कुलकर्णी, मिरज 9673737044
प्रकाशक : प्रतिभा पब्लिकेशन, इस्लामपूर. 7588586676
मूल्य : रु.200
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.