September 24, 2023
Evergreen friendship article by Sunetra Joshi
Home » गेले ते मैत्रीचे क्षण, छे !…
मुक्त संवाद

गेले ते मैत्रीचे क्षण, छे !…

आपण म्हणतो गेलेला काळ परत येत नाही. पण तसाच काळ पुन्हा निर्माण तरी करता येतो ना ?  म्हणजे पुन्हा त्या गोष्टीतला आनंद घेता येतो. नव्याने ते क्षण जगता येतात पण मनातून तितकी ओढ असायला हवी.आपणहून कुणीतरी पुढाकार मात्र घ्यायला हवा. अगदी भेटायला जायचे असे नाही पण एक फोन करून तुम्हाला संवाद करणे सहज शक्य आहे.

सौ सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी 

सकाळी कामे करता करता गाणी ऐकत होते. किशोरकुमार गात होते. जिंदगी के सफर मे गुजर जाते है…. आणि मन मग त्या गाण्याभोवती फिरत राहिले. खरच आपण म्हणतो की गेलेला काळ पुन्हा येत नाही. आणि ते खरेही आहेच. पण… हा पणच मग मनात घर करुन बसला. एका मैत्रिणीचा वाढदिवस आहे हे फेसबुकवर समजले. खूप वर्षे झाली होती भेटून बोलून. मग शोधला तिचा नंबर आणि लावला तिला फोन.

आवाज ऐकताच तिने मला ओळखले. “अय्या तू किती दिवसांनी भेटतोय. मी पण खरे तर तुला खूप मिस करत होते गं, पण असे सुचलेच नाही” असे तिकडून ती म्हणाली. मग शुभेच्छा सोबत खूप बोलणे झाले. मधला काळ कधी नव्हताच जणू. आता नेहमी एकमेकींच्या संपर्कात राहूच. असे म्हणून फोन ठेवला. आणि वाटले आपण म्हणतो गेलेला काळ परत येत नाही. पण तसाच काळ पुन्हा निर्माण तरी करता येतो ना ?  म्हणजे पुन्हा त्या गोष्टीतला आनंद घेता येतो. नव्याने ते क्षण जगता येतात पण मनातून तितकी ओढ असायला हवी. आपणहून कुणीतरी पुढाकार मात्र घ्यायला हवा. अगदी भेटायला जायचे असे नाही पण एक फोन करून तुम्हाला संवाद करणे सहज शक्य आहे. बोलल्यावर आपल्याला कळते की समोरच्या व्यक्तीला पण तेवढेच वाटते किंवा नाही.

खूपदा काय होते ? काही कारणांमुळे आपला त्यांच्याशी किंवा आपला कुणाशीतरी संपर्क होत नाही. मग आपण विचार करतो जाऊ दे मीच का मला गरज असल्याने संपर्क करू. आणि मग उगीचच काहीच कारण नसताना दुरावा वाढत राहतो. कधी कधी नव्हे त्याचा आपल्याला नेहमीच मनस्ताप होत राहतो. पण लक्षात येताच जर बोलून घेतले तर जाणवते की आपण मनात कारण नसताच गैरसमज पाळला होता. आणि मनात साचलेले बोलून मोकळे झाल्याने आपल्या मनातली रुखरुख  तरी संपते. माझ्याकडून मी प्रयत्न केलाच नाही, असे तरी वाटत नाही. 

तसे तर जीवन हे नेहमीच अशाश्वत आहे, पण सध्या तर खूपच झाले आहे. आता भेटून गेलेली व्यक्ती पुन्हा भेटेल की नाही हे सांगता येत नाही. हल्ली तर काही आजारात अंत्य दर्शन सुध्दा घेता येईल की नाही हे कळत नाही. तेव्हा प्रत्यक्ष भेट नाही तरी निदान संवादाने का होईना जोडलेल्या तारा असू द्या. 

त्यामुळे वेळ न घालवता अशी नाती पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न तरी व्हायला हवा. कधीतरी समोरच्या माणसाची खरच काही अडचण असू शकते किंवा परिस्थिती वेगळी असते. किंवा तो पण आपल्या सारखाच विचार करत असतो आणि जाऊ दे मीच का? म्हणून अडून असतो. 

आपण जसा समोरच्या व्यक्तीबद्द्ल विचार करत असतो तसा विचार ती पण आपल्या बद्दल करत असेल हे आपल्या लक्षातच येत नाही.  मग “उनसे आया न गया हमसे बुलाया न गया” म्हणत नशिबाला दोष देत उगाच झुरत बसायचे एवढेच हातात उरते. तेव्हा असे कुणी दुरावले असेल, तर लगेच उचला फोन आणि व्हा कनेक्ट. तो काळ पुन्हा जगण्याची एक संधी तुमच्या मनावर टकटक करत आहे. उघडा मनाचे दार तिचे स्वागत करण्यासाठी. 

Related posts

समुपदेशन काळाची गरज…

सांगा मग शाळा शब्दाचा अर्थ…

मातब्बरांचे विचार असणारा उपयुक्त असा संदर्भग्रंथ

Leave a Comment