संपूर्ण महाराष्ट्रात सोमवार ( दि.२९ एप्रिलपर्यन्त )म्हणजे अजुन ४ दिवस, ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी ( वादळी वारा, विजांसह पाऊस) पावसाची शक्यता ही कायम आहे. काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही नाकारता येत नाही.
महाराष्ट्रातील पण कर्नाटक व तेलंगणा राज्यांच्या सीमावर्ती क्षेत्रातील तालुक्यात तर हे वातावरण अजुन २ दिवस म्हणजे १ मे पर्यन्त टिकून राहू शकते.
उष्णतेच्या लाटेची शक्यता
मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तसेच लगतच्या गुजरात राज्यात मात्र ( दि.२७ ते ३० एप्रिलच्या ) चार दिवसात (शनिवार ते मंगळवार) दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यताही जाणवते, तर तेथील किनार पट्टीवरील क्षेत्रात तर दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येऊ शकतो.
मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अश्या १० जिल्ह्यात मात्र पहाटेच्या किमान तापमान हे सरासरीपेक्षा ५ अंश सेल्सिअसने झालेल्या वाढीमुळे ह्या चार (२७ ते ३० एप्रिल) दिवसात रात्रीच्या उकड्यातही वाढ ह्या १० जिल्ह्यात होण्याची शक्यता जाणवते.
संपूर्ण एप्रिल महिना अवकाळी पाऊस व गारपिटीचे असलेले महाराष्ट्रातील वातावरण चार दिवसानंतर म्हणजे मंगळवार ( दि.३० एप्रिलपासून ) निवळण्याची शक्यता जाणवते.
सध्या सोमवार ( दि.२९ एप्रिल पर्यन्त ) सकाळी वातावरण जरी स्वच्छ वाटत असले तरी दुपारनंतर अवकाळीचे वातावरण तयार होते व ते मध्यरात्री पर्यंतही टिकून राहण्याची शक्यता असते. त्यातच रब्बीतील पिकांपैकी सध्या मागास कांदे साठवणी तर भरड धान्ये मशीनिंग, रास भरणी , वाळवणी आदी स्थितीत खळ्यावर आहेत. त्यामुळे अश्या शेतकऱ्यांनी सोमवार ( दि.२९ एप्रिल पर्यन्त ) गाफील न राहता सावधानता बाळगुन खळ्यावरील कामाचे नियोजन करणे गरजेचे समजावे, असे वाटते.
मंगळवार (३० एप्रिलपासून) मात्र वातावरण स्वच्छ होवु शकते. आणि, त्यानंतर दुपारच्या कमाल तापमानातही सध्यापेक्षा हळूहळू २ ते ३ अंशांनी वाढ होवु शकते.असे वाटते.
सध्या जरी हे वातावरण निवळत असले तरी पूर्व-मोसमी हंगाम अजुनही ४० ते ५० दिवस बाकी आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस, उष्णतेची लाट व चक्रीवादळ निर्मिती अश्या सारख्या हंगामी वातावरणीय घटनांची शक्यता ही असतेच. तसे काही असल्यास, त्या त्या वेळी सूचित केले जाईल.
अवकाळीसाठी – समुद्र सपाटीपासून दिड किमी. उंचीवर हवेच्या कमी दाबाचा दक्षिणोत्तर आस व त्यातून तयार होणारी वारा खंडितता प्रणाली महाराष्ट्रावर सुस्पष्ट असुन मराठवाड्यावरही एक चक्रीय वाऱ्याची स्थितीही आहे. उष्णतेसाठी इराण, अफगाणिस्तान, दक्षिण पाकिस्तानातून गुजराथ मार्गे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात उष्ण वाऱ्याचे वहन होत आहे.
माणिकराव खुळे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.