June 7, 2023
article-on-vasantoushav-by-ujjawal-sahasrbudhe
Home » वसंतोत्सव
मुक्त संवाद

वसंतोत्सव

प्रत्येक ऋतू आपल्या वैशिष्ट्यांबरोबर येतो आणि हिंदू संस्कृतीत त्या ऋतूचे स्वागत आपण सणाने करतो. जशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा पौषात मकर संक्रांती येते. वर्षांऋतूत आपण नारळी पौर्णिमे सारखा सण साजरा करतो तर धान्य समृद्धी नवरात्राच्या काळात दिसून येते. तसेच वसंत ऋतु येतो तेव्हा चैत्रगौरीचा उत्सव सुरू होतो.

उज्वला सहस्रबुद्धे

पुणे मोबाईल – 80879 74168

‘कोकीळ कुहू कुहू बोले’ गाण्याचे बोल रेडिओवरून कानावर पडताच नकळत वसंत ऋतुची चाहूल मनाला लागली ! फाल्गुनातील रंगपंचमीचा रंग उधळत होळीच्या सणाची सांगता होते आणि वेध लागतात ते वसंताचे ! सूर्याच्या दाहक किरणांनी सारी सृष्टी पोळली जात असतानाच वसंताचे होणारे आगमन नकळत सृष्टीच्या नव्या बदलाची जाणीव करून देते.

दिवसभर ऊन झळांनी त्रस्त झालो तरी संध्याकाळी येणारी थंड वाऱ्याची झुळूक वसंताचा निरोप आपल्याला देते ! सुकलेल्या झाडांना पालवी येण्याचे दिवस जवळ येतात. पिवळी, करड्या रंगाची, वाळलेली पाने जमिनीवर उतरतात. जणू ती आपल्या आसनावरून – जागेवरून – पायउतार होतात आणि नव्याला जागा करून देतात. सकाळी फिरण्याच्या वेळी मी सृष्टीतले हे सूक्ष्म बदल मनाने टिपून घेत असते. कॅशिया, गुलमोहरा सारखी रंगांचे सौंदर्य दाखवणारी झाडे आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर केशरी, जांभळे पिसारे फुलवून उभी असतात. त्याच वेळी आंब्याचा मोहर आपला सुगंध पसरवीत असतो !

प्रत्येक ऋतू आपल्या वैशिष्ट्यांबरोबर येतो आणि हिंदू संस्कृतीत त्या ऋतूचे स्वागत आपण सणाने करतो. जशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा पौषात मकर संक्रांती येते. वर्षांऋतूत आपण नारळी पौर्णिमे सारखा सण साजरा करतो तर धान्य समृद्धी नवरात्राच्या काळात दिसून येते. तसेच वसंत ऋतु येतो तेव्हा चैत्रगौरीचा उत्सव सुरू होतो.

पूर्वी अंगणात चैत्रांगण घातले जाई. या चैत्रांगणातून चंद्र, सूर्य, गाई, हत्ती, झोका, कैरी … अशा विविध प्रतीकांची रांगोळी काढली जाई. निसर्गाप्रती कृतज्ञता दाखवण्याचा हा उत्सव असतो. चैत्री पाडव्या नंतर येणाऱ्या पहिल्या तीजेला चैत्र गौरीची
स्थापना करतात. देवीचा उत्सव म्हणून तिला पानाफुलांची सजावट करून झोक्यावर बसवतात. रुचकर कैरीची डाळ, कैरीचं पन्हं आणि खरबूज, कलिंगडासारखी थंड फळे देवीसमोर ठेवली जातात. या सर्व गोष्टींचा एकत्रित आनंद घेता यावा म्हणून चैत्रागौरीचे हळदी कुंकू केले जाते. अक्षय तृतीये पर्यंत हा सण साजरा केला जातो. हळदीकुंकू सारख्या समारंभात सुगंधित गुलाब पाणी शिंपडून, अत्तर, गुलाब देऊन सुवासिनी वसंताचे स्वागत करतात.

काही ठिकाणी ‘वसंत व्याख्यानमाला’चे कार्यक्रम चालू असतात. या काळात दिवस मोठा असतो. उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळी अशा व्याख्यानमालां मुळे लोकांना नवीन ज्ञान आणि मनोरंजन मिळत असते. याच काळात गायनाचे कार्यक्रम होत राहतात. माणूस मुळातच उत्सवप्रिय प्राणी आहे. कोणत्याही ऋतूत, सण साजरे करून तो आनंद शोधत असतो. आणि त्यानिमित्ताने निसर्गाची जवळीक साधली जाते !

पंजाब, उत्तर प्रदेश यासारख्या उन्हाळा जास्त असणाऱ्या भागात चैत्र वैशाखात ‘बैसाखी’सण साजरा करतात. तिथे लस्सी सारखे थंडपेय अधिक उपयुक्त ठरते. या दिवसात कलिंगड, खरबुजे यासारखी फळे ही थंड म्हणून खाल्ली जातात.फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातील पाणी अधिक चांगले असते. त्यात वाळा, मोगरा टाकला की पाण्याला एक प्रकारचा सुगंधही येतो.
आपल्या महाराष्ट्रात कोकम, लिंबू, कैरी,वाळा, खस यांची सरबते थंडाव्यासाठी आपण वापरतो.

निसर्गाने ही सर्व फळे उन्हाळ्यापासून संरक्षणासाठी नैसर्गिक रित्या आपल्याला प्राप्त करून दिलेली आहेत. अलीकडच्या काळात थंड पेय, आईस्क्रीम यासारख्या गोष्टी थंडाव्यासाठी दिल्या जातात, पण शेवटी कृत्रिम ते कृत्रिमच ! त्यापेक्षा निसर्गाने दिलेले नैसर्गिक पदार्थ या उन्हाळ्याच्या काळात वापरणे हे शरीराला हितकर असते. पुढे येणाऱ्या वर्षा ऋतूत कोणतेही त्रास होऊ नयेत म्हणून शरीराला सज्ज ठेवण्याचे काम नैसर्गिक विटामिन ‘सी’ घेण्यामुळे होत असते !

वसंत ऋतुची खासियत यातच आहे की, हा ऋतू नवीन सृजनाची सुरुवात करून देतो. वसंतोत्सवामुळे नवचैतन्य सृष्टीत भरून येते. त्यावर वर्षाराणी आपल्या प्रेमाचे सिंचन करते. त्यामुळेच पुढे धनधान्याची लयलूट होते. शिशिर आणि हेमंत ऋतूत थंड, निद्रिस्त झालेले वातावरण वसंत ऋतूच्या आगमनाने चैतन्यमय बनते आणि तोच निसर्गाचा खरा ‘वसंतोत्सव’ असतो !

Related posts

साहित्यकृतीचा सहृदयतेने घेतलेला शोध

न्याय हक्कासाठी संघर्ष करायला शिकवणारी कादंबरी

गडकिल्ल्यांची अनोखी सफर

Leave a Comment