गोवा टपाल विभागाने भारतातील भाषा आणि साहित्य तसेच जैवविविधता या विषयावरील टपाल तिकीटांच्या प्रदर्शनाचे केले आयोजन
गोवा टपाल विभागाने, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त, भारतातील भाषा आणि साहित्य, तसेच भारतातील जैवविविधता या समृद्ध संकल्पनेचे दर्शन घडवणाऱ्या आकर्षक टपाल तिकीट संग्रहाचे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन पणजी मुख्य टपाल कार्यालयात 18 ते 30 मे 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले असून, गोवा विभाग पणजीच्या पोस्टमास्टर जनरल मरियम्मा थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गोवा येथील राष्ट्रीय सागरविज्ञान संस्थेतील (NIO) माजी शास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध टपाल तिकीट संग्राहक (फिलाटलिस्ट) डॉ. रमेश कुमार यांनी आपला संग्रह प्रदर्शनासाठी प्रदान केला आहे. उद्घाटन समारंभास पणजी मुख्यालयाचे वरिष्ठ पोस्टमास्टर जी.एस. राणे, प्रसिद्ध टपाल तिकीट संग्राहक डॉ. रमेश कुमार, आणि विभागाचे समर्पित कर्मचारी उपस्थित होते.
टपाल तिकिटांचे हे प्रदर्शन 18 ते 30 मे 2023 पर्यंत दररोज सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 पर्यंत खुले असणार आहे. हे पाहण्यासाठी जनतेला आमंत्रित केले आहे. भारताचा सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा, तसेच आपल्या देशाला लाभलेल्या विलक्षण जैवविविधतेबद्दल जाणून घेण्याची ही अनोखी संधी आहे.