June 6, 2023
book-review-of-dr-mahaveer-akkole-book
Home » भावनाशील, पण बुद्धिवादी मानवतावादाचा धागा
मुक्त संवाद

भावनाशील, पण बुद्धिवादी मानवतावादाचा धागा

संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्राला स्त्री स्वातंत्र्य, समता, बंधुता, विषमतेविरूद्ध विद्रोह, श्रम प्रतिष्ठा, ज्ञान पिपासा, ज्ञान मीमांसा व मानवतावाद ही मूल्ये दिलेली आहेत. त्यामुळे संतांचे वाडःमय हे निवृत्तीपर नसून प्रवृत्तीपर आहे. त्यामध्ये आधुनिक मानवतावादी मूल्यांंचा जयघोष दिसतोच, पण भगवान बुध्द, भगवान महावीर, कबीर व बसवण्णा यांच्याही तत्त्वांचा उदघोष आहे.

प्राचार्य डाॅ. राजेंद्र कुंभार
 जयसिंगपूर 

`संताचा तो संग नव्हे भलतैसा` हे माझे परममित्र डाॅ. महावीर अक्कोळे यांनी केलेले एक संवेदनशील आस्वादन आहे. गेल्या काही दशकांपासून वारकरी चळवळीकडे पहाण्याचे नवे आयाम लोकांपुढे येत आहेत. विनायक सावरकर व त्यांच्या प्रभावळीतील मंडळींनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये संतांना टाळकुटे ठरवून त्यांच्यामुळे महाराष्ट्र प्रवृत्तीमार्ग सोडून विरक्तीकडे झुकला. त्यामुळे महाराष्ट्राचा पराभव होऊन पारतंत्र्य आले अशी मांडणी केली होती. वारकरी म्हणजे अडाण्यांचा, शूद्रांचा समूह ही भावना बळकट झाली होती. हा चुकीचा पूर्वग्रह बदलण्यासाठी गं. बा. सरदार व बा. रं. सुंठणकर यांनी मोठे कार्य केले आहे. विशेषतः बा. रं. सुंठणकर यांचे लिखाण संत मंडळींमुळे स्वराज्य संकल्पनेला कशी चालना मिळाली यावर प्रकाश टाकते.

संत साहित्याची अध्यात्मिक समीक्षा विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्यातही ज्ञानेश्वर व ज्ञानेश्वरी यांना केंद्रस्थानी ठेवून चर्चा केली जाते. परंतू बहुजन समाजातील श्रमिक वर्गातून पुढे येऊन संतमंडळींनी जे वाडःमयीन कार्य केले, त्याची समीक्षा अभावानेच आढळते. १२ व्या शतकातील यादव साम्राज्याची वाताहत त्याचबरोबर पडलेले प्रचंड दुष्काळ, दुष्काळात झालेली बलुतेदार, कारागीर व शेतकरी यांची वाताहत, कठोर बनलेली चातुवर्ण्य व्यवस्था या अवस्थेत याच श्रमिक वर्गातून कवितेची निर्मिती कशी झाली असावी याची सामाजिक चिकित्सा मराठी साहित्यात आढळत नाही.

संत ज्ञानेश्वरांनी तत्कालीन शेतीच्या उद्धस्ततेचे वर्णन करताना म्हटले आहे `उखिते करी येती जाती, गायीचे नव्हते कोणी` उखितेकरी म्हणजे खंडाने शेती करणारे भटके, स्थलांतरीत. शेती हा बलुतेदारी पद्धतीत समाजाचा कणा असतो. शेतकरी उद्धस्त झाली की शेतकऱ्याने दिलेल्या बैत्यावर जगणारा कारागीर समूह आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचतो. कवी रघुवीर सहाय यांनी म्हटले आहे की, `आत्महत्या का एक पर्याय है, कविता लिखना.` कवितेमुळे विपरित अवस्थेत जगण्याचे बळ मिळते. कवितेतून आत्मस्वर प्रकट होतो. परिस्थितीला प्रश्न विचारण्याची शक्ती निर्माण होते. ती शक्ती प्रत्यक्ष परमेश्वरालाही प्रश्न विचारू लागते. जेंव्हा ही वैयक्तिक साहित्य निर्मिती संघटित होते तेंव्हा त्याचे रूपांतर परिवर्तन चळवळीत होते. परिस्थितीशरण व परमेश्वरशरण अवस्थेतून बाहेर पडून कवी परमेश्वराला, समाजाला व स्वतःलाही प्रश्न विचारू लागतो. संतांचे वाडःमय या टप्प्यावर भक्ती वाडःमय न राहता विद्रोही वाडःमय बनते. ही चळवळ आपल्या सामाजिक व आर्थिक परिस्थिती मागील  कारणे शोधू लागते. ती विश्वकारणांचा शोध घेण्याऐवजी स्वतःचा शोधू घेवू पहाते. म्हणूनच नामदेव म्हणतात,

पतितपावन नाम ऐकूनी आलो मी दारा,
पतितपावन नव्हेस म्हणूनी जातो माघारा

जनाबाई तर त्यापुढे जावून म्हणते,

अरे विठ्या, अरे विठ्या
मूळ मायेच्या कारट्या

अर्थातच परमेश्वरामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत तर त्यासाठी ज्ञान प्राप्ती हे परिस्थिती बदलण्यासाठी गरजेची आहे आणि ज्ञान प्रसार हे वारकरी चळवळीचे प्रमुख उद्दिष्ट ठरते. मग संत नामदेव घोषणा करतात,

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लागू जगी ।।

वारकरी संतांची परंपरा एकाच वेळेस आत्मशोध, ज्ञानशोध व आत्मप्रतिष्ठा या तीन आयामामध्ये प्रगट होत रहाते. जवळजवळ चार शतके महाराष्ट्राच्या समाज मानसावर या चळवळीचा परिणाम होताना दिसतो. शद्बांच्या अधिकारापासून किंवा ज्ञानाच्या अधिकारापासून सुरू झालेली ही चळवळ तुकारामापर्यंत पोहोचताना विद्रोही वाडःमयीन लढाईचे सूत्र प्रस्थापित करते. ईश्वर प्राप्तीसाठी ज्ञान या पारंपरिक दृष्टीकोनापासून सुरू झालेली ही चळवळ ज्ञान म्हणजेच इश्वर व शद्ब हेच हत्यार या घोषणेपर्यंत पोहोचलेली दिसते. म्हणून संत तुकाराम बहुजन विद्रोहाचा जाहीरनामाच घोषित करतात.
ते म्हणतात,
आम्हा घरी धन शब्दांचिच रत्ने ।    
शब्दांचिच शस्त्रे यत्ने करू ।।
शब्दाचि आमुच्या, जी तीचे जीवन ।
शब्हे वाहू धन, जनलोका ।।
तुका म्हणे शब्दांचा हा देव ।
शब्देचि इश्वर पूजा करू ।।

संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्राला स्त्री स्वातंत्र्य, समता, बंधुता, विषमतेविरूद्ध विद्रोह, श्रम प्रतिष्ठा, ज्ञान पिपासा, ज्ञान मीमांसा व मानवतावाद ही मूल्ये दिलेली आहेत. त्यामुळे संतांचे वाडःमय हे निवृत्तीपर नसून प्रवृत्तीपर आहे. त्यामध्ये आधुनिक मानवतावादी मूल्यांंचा जयघोष दिसतोच, पण भगवान बुध्द, भगवान महावीर, कबीर व बसवण्णा यांच्याही तत्त्वांचा उदघोष आहे. ज्ञानेश्वरांसह सर्व संताना मनुस्मृतीप्रणित वर्णव्यवस्थेचे व जातीभेदाचे तीव्र चटके सहन करावे लागले तरीही त्यांची भाषा द्वेष किंवा वैराकडे झुकत नाही. संन्यास मार्गाकडे जात नाही तर ती प्रेम मार्गाकडे वाटचाल करते. किंबहुना मानवमात्राविषयी आत्यंतिक प्रेम हाच संत वाडःमयाचा मूलाधार आहे. वैराने वैर वाढत जाते, द्वेषातून विग्रह वाढतो. म्हणून द्वेषारहित मानवांचा क्रियाशील समूह सुमारे चार शतके समाजामध्ये सज्जनशक्ती वाढवून समन्वय निर्माण करतो. म्हणून ज्ञानेश्वर पसायदानामध्ये `भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे` अशी प्रार्थना करतात तर तुकाराम म्हणतात, `कोणाही जीवाचा न घडो मत्सर, मर्म सर्वेश्वर पूजनाचे` या भाषेत वारकऱ्यांचे तत्त्वज्ञान सांगतात.

डाॅ. महावीर अक्कोळे यांनी आपल्या पुस्तकात जवळजवळ २७ संतांच्या बद्दल आणि संत नसलेल्या पण मानव जातीला महान तत्त्वज्ञान देणाऱ्या तिघा महामानवांच्या वचनांबद्दल सह-अनुभूतीने भावनात्मक आत्मीयता ठेवून लिखाण केलेले आहे. त्यामुळेच या लिखाणामध्ये बुद्धिवाद्यांची तर्ककर्कश कोरडी मांडणी दिसत नाही किंवा अध्यात्मिक भोळसटपणाही आढळून येत नाही. लेखक अतीव प्रेमाने संतांविषयीचे आकलन मांडतात. यातील लेख स्वतंत्रपणे वेगवेगळ्या वेळेस लिहिले असले तरी त्यात सलग एक धागा दिसून येतो. तो धागा भावनाशील पण बुद्धिवादी मानवतावादाचा धागा आहे. त्यामुळेच मोक्ष, परमार्थ, इश्वरप्राप्ती या विषयात हे विवेचन गुंतुन पडत नाही. तर ते उदात्त मानवी मूल्यांना घेऊन पुढे जाते. सर्वसाधारणपणे लेखक कोणत्यातरी मार्गाचे अनुयायी असतात. त्यामुळे आपल्या प्रिय पंथाच्या पलिकडील पंथांना आपल्या विवेचनात स्थान देत नाहीत. पण इथे लेखक स्वतः पुरोगामी समन्वयवादी परंपरेचा पाईक असल्याने वारकरी संतांबरोबरच जैन, बौद्ध परंपरेबद्दलही आत्मीयतेने लििहत रहातो. हेच या पुस्तकाचे बलस्थान आहे, असे म्हणावे लागेल. लेखकाने पुरूष संतांबरोबरच पाच स्त्री संतांविषयीदेखील जिव्हाळ्याने लिहिले आहे. अगदी ग्रंथाचे शीर्षकही जनाबाईच्या अभंगातूनच घेतले आहे.

संतांचा तो संग, नव्हे भलतैसा । पालटावी दश तात्काळिक ।।
माणसाची मनोकायिक दशा बदलणे हेच सर्व संतांचे प्रमुख कार्य होते. याचेच सूचन या ग्रंथनामातून होते. संत तुकारामांनी देखील संतांचे लक्षण सांगताना म्हटले आहे,
आपणांसारिखे करिती तात्काळ । नाही काळवेळ तया लागी ।।
संत ज्ञानेश्वरांपासून तुकारामापर्यंत, तिरूवल्लूवरांपासून सुफी संत  तसेच कबीरांपर्यंतचा प्रचंड पट लेखकाने या पुस्तकात पेलला आहे. ज्ञानेश्वरापूर्वीचे महाकवी पुष्पदंत किंवा तामिळ महाकवी तिरूवल्लूवर यांचा मराठी वाचकांना कदाचित प्रथमच परिचय होईल. लिंगायत संत मन्मथ स्वामी, बसवण्णा, महानुभाव संत चक्रधर, महदंबा यांच्याविषयीचे लिखाण लेखकाचे वाचन व आकलनाचा विस्तृत परीघ दर्शविते. या संंबंध पुस्तकात संतांचे आकलन ही मध्यवर्ती संकल्पना आहे. फक्त अपवाद आहे तो रामदासांचा. कदाचित इथल्या अभिजन वर्गाने रामदासांना संत म्हटल्यामुळे त्यांचा अंतर्भाव येथे केला असावा. परंतू रामदास उत्तम कवी असले तरी ते संत नाहीत. ते महंत आहेत. तसेच ते वर्णव्यवस्था व ब्राम्हण श्रेष्ठत्व मान्य करणारे आहेत. त्यांची परंपरा वारकऱ्यांची नसून मठांची पालखी, मेण्यांची व विषमतावादी आहे. परंतु या ठिकाणी लेखकाने आपले विवेचन त्यांच्या व्यावहारिक व वाडःमयीन गुणापर्यंत मर्यादित केले आहे.

या पुस्तकाच्या शेवटच्या भागामध्ये परिशिष्टात केलेले; संत परंपरेमध्ये नसले तरी मानवी कल्याणासाठी ज्यांचे विचार, वचने अत्यंत महत्त्वाची मानली जातात, अशा तीन महापुरूषांविषयीचे विवरण अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये भगवान महावीर, तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा बसवण्णांचे विचार मांडलेले आहेत. त्यांच्यामुळे अध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित होण्यास फार मोठी मदत झालेली आहे. त्याची नोंद लेखकाने आवर्जुन घेतली आहे.
एवढा मोठा पट सांभाळताना त्रोटकता अपरिहार्य असते किंवा स्तंभलेखनाची शब्दमर्यादा हा दोष असला तरी हे पुस्तक मराठी वाडःमयामध्ये महत्त्वाची भर घालणारे आहे. लेखकाने यापुढे या प्रत्येक संतांविषयी विस्ताराने लिहून प्रसिद्ध करावे. कारण त्यांच्याकडे तशी क्षमता आहे व विचारवंत, कार्यकर्ता, अभ्यासक व भावनाशील कवी या भूमिकेतून असे समतामार्गी लिखाण त्यांच्याकडून घडावे व त्याचा लाभ समाजिक चळवळींना, लोकाधिष्ठान मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना व्हावा, हीच अपेक्षा.      

पुस्तकाचे नावः संतांचा तो संग नव्हे भलतैसा…
लेखकः डॉ. महावीर अक्कोळे
प्रकाशकः तेजस प्रकाशन, कोल्हापूर 9322939040, 8308858268
पृष्ठेः १६८ किंमतः १५५ रुपये

                                           

Related posts

राष्ट्रसंतांचे पाईक : प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे

प्रगल्भ प्रतिभेचा आविष्कार: आवडलं ते निवडलं

सौभाग्य व ती….

Leave a Comment