संसारसुद्धा या वृक्षासारखाच आहे. त्यालाही जमिनीत मुळे आहेत तशी वरती हवेतही मुळे आहेत. त्याचीही वाढ या वड-पिंपळासारखीच आहे. पण आत्मज्ञानाची आस धरणारा साधक या संसारात गुरफटत नाही. संसार वृक्षाला आत्मज्ञान प्राप्तीकडे जाणारी ही पारंबी वाढत ठेवतो. संसारवृक्षाची अनित्यता तो जाणतो. म्हणून तो संसार सोडून पळून जात नाही.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
पैं बल्वचेचि महामारी । पिंपळा कां वडाचिया परी ।
जे पारंबियांमाझारीं । डहाळिया असती ।।58।। ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा
ओवीचा अर्थ – झपाट्याने वाढणाऱ्या लव्हाळ्याच्या गवताप्रमाणे (जो आहे), तसाच पिंपळाप्रमाणें अथवा वडाच्या वृक्षाप्रमाणें हा संसारवृक्ष आहे. कारण की, पिंपळाप्रमाणें अथवा वडाप्रमाणे त्याच्या पारंब्यामध्ये डहाळ्या आहेत.
वड आणि पिंपळ हे वृक्ष शाश्वत आहेत. अनंत काळापर्यंत ते जिवंत राहतात. विशेष म्हणजे या झाडाचा विस्तार चौफेर असतो. एकच झाड मोठी जागा व्यापते. या वृक्षाची हवेत तरंगणारी मुळे कालांतराने नव्या खोडात रूपांतरित होतात. या नव्या खोडामुळे झाडाचा विस्तार अधिकच वाढतो. म्हणूनच पूर्वीच्याकाळी या वृक्षांची लागवड केली जात होती. आता हे वृक्ष दुर्मिळ होऊ लागले आहेत. अशा वृक्षांच्या तोडीमुळेच पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. पर्यावरणाचे संवर्धन करायचे असेल तर अशा वृक्षांची लागवड ही गरजेची आहे.
पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढतच जात आहे. जागतिक तापमानवाढ यावर नुसत्या गप्पाच मारल्या जातात. प्रत्यक्षात आवश्यक त्या कृती केल्याच जात नाहीत. तापमानवाढीने गारपीट, अतिवृष्टी, अवेळी पाऊस, दुष्काळ अशा समस्या उद्भवत आहेत. यावर उपाय योजण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन हे गरजेचे आहे. या मोठ्या वृक्षांमुळे परिसरातील तापमानात मोठा फरक पडतो. अशा वृक्षांच्या परिसरात गारवा असतो. अशा थंड ठिकाणी आध्यात्मिक साधना उत्तम होते. या वातावरणात मन प्रसन्न राहते. यासाठीच अनेक थोर संतांनी वड-पिंपळाच्या झाडाखाली साधना करत. गौतम बुद्धांना पिंपळाखाली आत्मज्ञान प्राप्ती झाल्याचेही उल्लेख आहेत.
वडाच्या झाडाची सुवासिनींकडून पूजा केली जाते. हा वृक्ष अनेक वर्षे जिवंत राहतो. तशी आपल्या पतीचीही साथ कायम राहावी, अशी यामागची श्रद्धा आहे. आता वटपौर्णिमेला सुवासिनींना वडाची झाडेही पूजेसाठी शोधावी लागतात, अशी स्थिती आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही आता हे वृक्ष दुर्मिळ झाले आहेत. या वृक्षांचे महत्त्व जाणून घेऊन याची लागवड करणे गरजेचे आहे. रस्त्यांच्या दुतर्फा या वृक्षाची लागवड केली गेली होती. पण आता वाढत्या रस्त्यांच्या रुंदीकरणांमुळे हे दुतर्फा लावलेले वृक्षही नष्ट झाले. असे मोठे वृक्ष आता कोणी लावतही नाही.
एकत्र कुटुंब पद्धती जशी नष्ट होऊ लागली आहे. तसे हे मोठमोठाले विस्तार असणारे वृक्ष जाऊन त्या जागी आता छोटे छोटे वृक्ष उदयास येत आहेत. मोठ्या वृक्षांचे बोन्साय झाले आहे. संसारही आता बोन्साय झाला आहे. पण या वड-पिंपळाच्या वृक्षाप्रमाणे आपला संसार आहे. कुटुंबे छोटी छोटी झाली तरी त्यांचा विस्तार हा वाढतच आहे. पिंपळाला अनेक पारंब्या फुटल्या. तसे ही कुटुंबे तयार झाली आहेत. काही वर्षांनी या पारंबीचाच जसा वृक्ष होतो तसा या कुटुंबाचाही विस्तार वाढत जातो. कुटुंब नियोजनाची वेळ आता आली आहे. हम दो हमारे दो आता हम दो हमारा एक. असे म्हणायची वेळ आली आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता ही परिस्थिती आणखीही बिकट होऊ शकते.
प्रगतीचा वेग पकडण्याच्या मागे आता प्रत्येकजण लागला आहे. त्यानुसार त्याचे नियोजन सुरू आहे. त्यात दूरदृष्टीचा अभाव आहे. त्याला विचार करायला वेळच नाही. प्रगतीचा वेग पकडणे हेच आता माणसाचे आद्य कर्तव्य झाले आहे. ज्याने हा वेग पकडला, तोच या संसारात टिकतो. असे आज मानले जाते. हा वेग पकडता न आल्यास भावीकाळात जगणेही मुश्किल होणार आहे. ही परिस्थितीही सत्य आहे. ग्रामीण भागातील जीवन वाढत्या महागाईमुळे कठीण होत आहे. मोठमोठी राने आता तुकड्या तुकड्यात विभागली गेली आहेत. अशा या तुकड्यातून येणारे उत्पन्न हेही तुटपुंजे आहे. यावर एका घराचा संसार चालवणे शक्य नाही. पर्यायी स्रोत शोधण्याची गरज आहे.
शेतीला जोडधंदे असतील तरच हा व्यवसाय आता टिकणार आहे. उत्पादित मालाच्या मूल्यसंवर्धनाचाही विचार आता शेतकऱ्यांनी करायला हवा. वड-पिंपळाचा वृक्ष प्रत्येक पारंबीचं खोडात रुपांतर करून विस्तार वाढवितो तसा शेतकऱ्यांनी शेतीचा हा विस्तार वाढवत राहायला हवे. तरच हा व्यवसाय फायदेशीर ठरणारा आहे. मुख्य व्यवसायाला पारंब्या फुटल्या तरच हे शक्य होणार आहे. प्रत्येक पारंबी खोडात रूपांतरित झाली तर शेतीचा वृक्ष शाश्वत होईल. पण सध्या तसे होताना दिसत नाही. वृक्षाचा वटवृक्ष उभा करण्याकडे कल दिसून येत नाही.
झपाट्याने प्रगती करताना आवश्यक असणारा धीर आता नव्या पिढीत नाही. ध्येय गाठायचे तर कासवाची चालच चालावी लागते. सशाच्या चालीने ध्येय गाठता येत नाही. हळूहळू पण कामात सातत्य ठेवले तरच ते ध्येय गाठता येते. सातत्य नसेल तर ध्येय मध्येच सोडावे लागते. पारंबी हळूहळू जमिनीच्या दिशेने वाढते. ती जमिनीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तिला हवेतीलच आर्द्रता शोषून घ्यावी लागते. जमिनीत रुजल्यानंतर हवेतील आर्द्रतेची तिला गरज भासत नाही. पण जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी पारंबीला कष्ट करावे लागतात.
उन्हाळ्यात हवेत आर्द्रता नसते. वाढ खुंटते या नैसर्गिक आपत्तींचा सामना तिला करावा लागतो. पण ती ध्येय सोडत नाही. सातत्याने जमिनीपर्यंत पोहोचण्याचे तिचे प्रयत्न सुरू असतात. जीवन जगतानाही याचाच विचार करावा. या वृक्षांचा आदर्श घेऊन जीवन जगायला हवे. शेती ही एक संस्था आहे. या संस्थेचा वटवृक्ष कसा होईल याचा विचार करायला हवा. आध्यात्मिक प्रगती करणाऱ्या साधकासही हाच नियम लागू आहे. साधनेत सातत्य ठेवले तरच साधनेचा वटवृक्ष उभा राहील. सातत्य नसेल तर ध्येय गाठता येत नाही. एकदा जमिनीला पारंबी पोहोचली की मग कितीही कडक उन्हाळा आला तरी वृक्ष सुकणार नाही. आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर मग उन्हाळा, पावसाळा सर्व सारखेच. त्यांचा सामना करण्यासाठी साधक समर्थ असतो. फक्त तेथेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
संसारसुद्धा या वृक्षासारखाच आहे. त्यालाही जमिनीत मुळे आहेत तशी वरती हवेतही मुळे आहेत. त्याचीही वाढ या वड-पिंपळासारखीच आहे. पण आत्मज्ञानाची आस धरणारा साधक या संसारात गुरफटत नाही. संसार वृक्षाला आत्मज्ञान प्राप्तीकडे जाणारी ही पारंबी वाढत ठेवतो. संसारवृक्षाची अनित्यता तो जाणतो. म्हणून तो संसार सोडून पळून जात नाही. मुलांना, बायकोला सोडून तो जात नाही. आत्मज्ञानाकडे जाणारी ही पारंबी त्या संसारवृक्षावरच वाढते. हवेतील आर्द्रता शोषून ती पारंबी वाढते. श्वासावर नियंत्रण मिळवून साधनेत प्रगती साधली जाते. आत्मज्ञानाची जमीन मिळाल्यानंतर हा आत्मज्ञानाचा वटवृक्ष उभा राहतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.