आयुर्वेदिक डॉक्टर शेतकरी पटवतोय देशी वाणांचे आरोग्यदायी महत्त्व सध्याच्या संकरित पीकजातींच्या युगात देशी जातींच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे; मात्र आपला आयुर्वेदिक वैद्यकीय व्यवसाय सांभाळत कोल्हापूर जिल्ह्यातील परिते (ता. करवीर) येथील डॉ. सूर्याजी गणपत पाटील यांनी मात्र भात पिकाच्या देशी जातींच्या संवर्धनाचा वसा जपला आहे. दररोजच्या आहारातही ते याच भातवाणांचा वापर करतात. उत्तम आरोग्यासाठी अशा जातींची जपणूक गरजेची असल्याचा संदेश आपल्या कार्यातून त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
राजेंद्र घोरपडे
सन 1985 मध्ये आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. सूर्याजी पाटील यांनी परिते येथे व्यवसायास सुरवात केली. त्यांची वडिलोपार्जित 13 एकर शेती आहे. शालेय जीवनापासूनच वडिलांसोबत ते शेतीकामे करायचे. ऐन दहावी बोर्डाच्या परीक्षेवेळी उसाला खताची मात्रा देऊन अकरा वाजता पेपर देण्यासाठी त्यांना जावे लागले होते. आवडीमुळेच शेतीकामांचे कष्टही त्यांना जाणवले नाहीत. पुढे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.
सध्याच्या धकाधकीच्या आणि महागाईच्या जीवनात स्वार्थ साधण्याच्या मागेच मानव लागला आहे. यामुळे तो माणुसकी हरवून बसला आहे. शिक्षण घ्यायचे आणि अमाप पैसा कमविण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या योजायच्या, हाच व्यवसाय झाला आहे. चांगले काय, गरज कशाची आहे, याचा विचारच मानव विसरून गेला आहे. याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होत आहे. उतारवयात तो विविध व्याधींनी ग्रस्त होत आहे. केवळ योग्य आहार नसल्याने त्याची मानसिकता बदलली आहे. हेच तत्त्वज्ञान डॉ. सूर्याजी यांनी ओळखून जीवनात बदल करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. अध्यात्माची जोड त्यांच्या विचारांना मिळाली आहे. पंढरीची माघातील वारी ते न चुकता करतात. जीवनातील चांगल्याचा स्वीकार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शेतीतही तसे बदल त्यांनी सुरू केले आहेत.
देशी वाणांचे संवर्धन…
रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमिनींचा पोत खराब होत चालला आहे. अन्नपदार्थांची सात्त्विकता कमी होत आहे. रासायनिक कीडनाशकांचे अंश पिकांमध्ये, पर्यायाने अन्नात राहात असल्याने त्याचा अनिष्ट परिणाम आरोग्यावर होत आहे. यामुळे भावी काळात देशी वाणांच्या संवर्धनाची आवश्यकता भासणार आहे. हे विचारात घेऊनच डॉ. सूर्याजी यांनी भाताच्या पारंपरिक देशी जाती जतन करण्याचा निर्णय घेतला.
वाणांचा शोध…
पूर्वी डॉ. सूर्याजी यांच्या घरी भाताच्या पारंपरिक देशी जातीच लावल्या जात. लहानपणी देशी वाणांची गोडी चाखलेल्या डॉ. सूर्याजी यांना संकरित वाण बेचव वाटू लागले. त्यांनी जुन्या जाती शोधून लागवड करण्याचे ठरवले. जिल्ह्याच्या दुर्गम भागांचा दौरा केला. दुर्मिळ जाती हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच शेतकरी लागवड करतात, हे लक्षात आले. आजरा भागात “काळी गजरी अन् काळा जिरगा’, गिरगावमध्ये “जोंधळा जिरगा’, भादवण (ता. आजरा)मध्ये “चंपाकळी’ या जाती मिळविल्या. काळ्या जिरगा वाण अनेक ठिकाणी अगदी बंगळूरला जाऊन शोधले. तेथे मोठ्या आकाराचा हा वाण मिळाला. काळी गजरी वाणही मिळाले. या सर्वांचे संवर्धनही त्यांनी केले आहे.
सेंद्रिय पद्धतीनेच लागवड
भाताच्या देशी वाणांची लागवड सेंद्रिय पद्धतीने करावी लागते, अन्यथा त्यांचा पौष्टिकपणा राहात नाही, असे प्रयोगानंतर डॉ. सूर्याजींना आढळले. दरवर्षी दीड – दोन एकरांवर ते देशी वाण लावतात. त्यांना खत देताना लेंडी खतासाठी 15 दिवस बकरी शेतात बसवितात. 400 ते 500 बकऱ्यांच्या कळपास दिवसाला 300 रुपये खर्च येतो. 500 किलो गांडूळ खत, प्रति ट्रॉली 400 रुपये दराने 50 ते 60 गाड्या शेणखत शेतात मिसळतात. सेंद्रिय खतावर साधारणपणे 10 ते 15 हजार रुपये खर्च होतात. देशी बियाणे घेतलेल्या शेतात काढणीनंतर ऊस घेतला जातो, तो निडव्यापर्यंत ठेवतात. रासायनिक खतांचा अत्यल्प वापर होतो. एकरी 60 ते 70 टनांपर्यंत एकरी उत्पादन मिळते. चौथ्या वर्षी पुन्हा लेंडी खत, सेंद्रिय खत, गांडूळ खत देऊन शेतात पुन्हा देशी भात लावला जातो.
औषधी भात म्हणूनच ओळख
काळी गजरी, काळा जिरगा, हावळा, जोंधळा जिरगा या जाती “औषधी भात’ म्हणूनच परिचित आहेत. क्षयरोगी, अशक्तपणा असणाऱ्यांना, बाळंतिणीस पत देण्यासाठी, दीर्घ मुदतीच्या आजारी रुग्णांना या जातींचा तांदूळ उपयुक्त आहे. या जातींत विविध जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शिअम यांचे प्रमाण अन्य वाणांपेक्षा अधिक आहे. हा भात पचनास हलका, शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे. त्यात साखरेचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह आदी विकार असणाऱ्यांना हा भात उपयुक्त आहे.
उत्पादकता कमी तरीही…
देशी वाणांची उत्पादकता कमी आहे. सेंद्रीय पद्धतीने भात लागवड करुन एकरात 12 ते 14 क्विंटल उत्पादन डॉ. सुर्याजी काढतात. आज या भातास 60 ते 70 रुपये किलो इतका भाव आहे. याचा विचार करता संकरित बियाण्याच्या तुलनेत याची लागवड फायदेशीर ठरते. घरगुती वापरसाठीच डॉ. सुर्याजी देशी भाताची लागवड करतात. पण बाजारभावाचा विचार केला तर या भाताच्या जाती फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी याचा विचार करावा. असे डॉ. सुर्याजी यांना वाटते.
भारतात मोठी जैवविविधता आहे. पिकांच्या 160 देशी प्रजाती आहेत. संकरित वाणांसाठीही जंगली वाणांची गरज भासते. असे 340 जंगली वाण भारतात आहेत. अलीकडे या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. स्थानिक वाणांचे उत्पादन कमी असल्याने त्यांची लागवड शेतकरी करत नाहीत. झपाट्याने बदलणाऱ्या जगात स्थानिक वाणांचे संवर्धन करणाऱ्या डॉ. सूर्याजी पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांनी हा आदर्श घेऊन काही क्षेत्रावर पारंपरिक वाणांचे संवर्धन करण्याची गरज आहे.
डॉ. मधुकर बाचूळकर
वनस्पतिशास्त्र तज्ज्ञ
संपर्क –
डॉ. सूर्याजी गणपत पाटील – 9423800588
परिते, ता. करवीर, जि. कोल्हापूर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.