September 18, 2024
Need for Science Vision article by Bhakti Jadhav
Home » विज्ञान दृष्टीची गरज
मुक्त संवाद

विज्ञान दृष्टीची गरज

विज्ञान दृष्टीची गरज

अनेक सण-उत्सवात माणसे अंगात देव आला म्हणून नाचतात. त्यामागची भावना-कारणमीमांसा आपण समजून घेत नाही. याला कार्यकरण भाव असे म्हणतात. कार्यमागे-घटनेमागे काय कारण आहे याचा शोध घेणे-विचारपूर्वक त्याचा पाठपुरावा करणे म्हणजे विज्ञानदृष्टी होय.

भक्ती जाधव

सोलापूर
मोबाईल 9518715587

स्वातंत्र्यानंतर भारतात शिक्षणाचा विस्तार झाला. पदवीधरांची संख्या वाढली पण जाणतेपणा वाढला का ? हा खरा प्रश्न आहे. रोजच बातम्यातून असे जाणवते कि आपल्या समाजातही अनेक कालबाह्य रूढी, अंधश्रद्धा घट्ट रुतून बसल्या आहेत. सेवा-श्रद्धा-त्याग-निष्ठा यांचे आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. कोणी कोणावर श्रद्धा ठेवावी याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण अनेकदा माणसे एका टोकाला जातात. श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत कधी होते ते समजत नाही. अशावेळी समाजातील बुवा-बाबांना आयती संधी मिळते. आपल्याला देव प्रसन्न आहे असा दावा करणाऱ्या भोंदू-साधू-भगत यांच्या पायावर डोके ठेवणाऱ्यांची संख्या वाढू लागते. भगतगिरी करणारे अनेकजण चमत्कार दाखवतात. श्रद्धाळू माणसे त्या चमत्काराचा शोध घेत नाहीत हीच खरी अडचण आहे.

रिकाम्या हातातून वस्तू काढणे, मंत्र टाकून सापाचे विष उतरवणे, तोंडात जळता कापूर टाकणे असे अनेक प्रकार आहेत. चमत्कार करणारे अनेकदा रसायनचा वापर करतात, हातचलाखी करतात, दृष्टी भ्रम निर्माण करतात. त्याचा शोध घेणे गरजेचे असते.

माणसे अनेकदा अंधानुकरण करतात, जुन्या रूढींना चिटकून बसतात. आपल्या पूर्वजांच्या काळात विज्ञानाची वाढ झाली नव्हती. आज अनेक शोध लावले जात आहेत, त्यातून अनेक जुन्या कल्पना मागे पडल्या आहेत. खगोलशास्त्र ने आज खूप प्रगती केली आहे. असे असतानाही शनी मंगळ यासारख्या ग्रहांची पीडा दूर करण्यासाठी माणसे शांती करतात. अनेक विधी करतात याचे नवल वाटते.

आपला देश पारतंत्र्यात होता.इंग्रजांनी डलहौसीच्या काळात ठाणे-मुंबई दरम्यान पहिली रेल्वे सुरू केली. प्रचंड आगगाडी पाहून घाबरलेली माणसे, गाडीत बसण्यापूर्वी पूजा करणे, नारळ फोडणे असे प्रकार करीत. पुढच्या काळात दृष्टी बदलली. रेल्वे हे एक प्रचंड वाहन आहे प्रत्येकवेळी गाडीत बसताना त्याची पूजा करण्याची गरज नाही अशी नवी दृष्टी आली. ही नवी दृष्टी म्हणजेच विवेक व विज्ञानाची दृष्टी. सत्य ज्ञानामुळे अंधश्रद्धेचे आत्मविश्वासात रूपांतर होते.

एक काळ असा होता की देवीच्या अवकृपेमुळे देवी रोग होतो असे समजून गावात देवीचा गाढा ओढला जायचा. डॉ. जेन्नर, लुई पाश्चर, डॉ.फ्लेमिंग सारख्या थोर शास्त्रज्ञांनी शोध लावले. लसीचा शोध लागला. देवीचा रोग जगातून नाहीसा झाला. हा इतिहास समजून घ्यावा.

अनेक सण-उत्सवात माणसे अंगात देव आला म्हणून नाचतात. त्यामागची भावना-कारणमीमांसा आपण समजून घेत नाही. याला कार्यकरण भाव असे म्हणतात. कार्यमागे-घटनेमागे काय कारण आहे याचा शोध घेणे-विचारपूर्वक त्याचा पाठपुरावा करणे म्हणजे विज्ञानदृष्टी होय. आपल्याकडे 33 कोटी देवांची संकल्पना आहे. आशा देवांची प्रार्थना करून कोणाला मानसिक समाधान मिळत असेल, इतके देव असूनही आपले अनेक प्रश्न, अनेक समस्या तश्याच आहेत. मूलबाळ व्हावे, पास व्हावे, यश मिळावे यासाठी माणसे नवस करतात. नवसाने हे शक्य होते का ? संत तुकाराम यांनी यावर मार्मिक भाष्य केले आहे,” ऐसें नवस सायसे कन्यापुत्र होती ! तरी का करणे लागे पती?”,असा त्यांचा अभंग आहे. मूल होत नाही, लग्न जमत नाही, कोर्टात यश मिळत नाही म्हणून माणसे देवाला कौल लावतात, ताईत-दोरे यांचा आधार घेतात, हे ज्ञानाचे नाहीतर अज्ञानाचे लक्षण आहे.

विज्ञानाने आपणास फोन-तारायंत्र-टीव्ही-रेडिओ-आधुनिक वाहने दिली, त्यासोबत शोधक बुद्धी दिली, नवी दृष्टी दिली. आपण विज्ञानाची सृष्टी घेतो पण विज्ञानाची दृष्टी घेत नाही, हीच आपल्या मार्गातील अडचण आहे. कालबाह्य रुढींचा त्याग करून, नवदृष्टी अंगीकारल्या शिवाय आपली प्रगती होत नाही. काळ बदलला म्हणजे केवळ तारखा बदलत नाहीत. नवे ज्ञान, नवे तंत्रज्ञान येते. नवे अनुभव येतात. हे आयटी चे युग आहे. माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे, नवे जग गतिमान झाले आहे. गतीचा कायदा पाळा असे बोलले जाते. नव्या युगात नवी दृष्टी आपण आत्मसात केली पाहिजे. ही कालसापेक्ष दृष्टी म्हणजेच विज्ञानदृष्टी आहे. विज्ञान दृष्टीचा अंगीकार हे आपल्या राज्यघटनेने मान्य केले आहे. ते आपले कर्तव्य आहे. अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर पडून विज्ञान दृष्टीचा अंगीकार करण्यासाठी”जादूटोणा विरोधी कायदा” पास झाला आहे. नागरिकांनी त्याचा अंगीकार करावा.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

जीवनाच्या होरपळीतही उन्नतीचा विचार पेलणारा कथासंग्रह : भोगवटा

अण्णा भाऊ साठे आणि माझी मैना

आत्मज्ञानानेच होतो संसारवृक्ष नष्ट

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading