बालसाहित्य आणि त्यातही बालकविता लिहिण्यासाठी बालकांच्या भावविश्वाशी एकरूपच व्हावे लागते. ज्याला ते जमते तोच उत्तम बालसाहित्यिक होऊ शकतो. बालकांची भाषा देखील अवगत असावी लागते. कवी हबीब भंडारे बालकांच्या भाषेनिशी बालकांच्या भावविश्वाला भिडतात.
डॉ कैलास दौंड, मोबाईल – 9850608611
kailasdaund@gmail.com
कवी हबीब भंडारे यांचे नाव आजच्या मराठी कवितेच्या प्रांतात परिचित आहे. जगणं विकणाऱ्या माणसाच्या कविता, मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं असे महत्त्वाचे कविता संग्रह त्यांच्या नावावर आहेत. महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार देखील त्यांच्या कवितासंग्रहाला मिळालेला आहे. अशा कवीने ‘निळे निळे आभाळाचे डोळे’ हा बालकवितासंग्रह प्रकाशित करून बाल साहित्याच्या प्रांतातही पदार्पण केलेले आहे. ही गोष्ट बालसाहित्यासाठी पोषक म्हटली पाहिजे.
‘निळे निळे आभाळाचे डोळे’ या बालकविता संग्रहामध्ये एकूण ४४बालकविता आहेत. पहिलीच कविता आहे ‘चिंच’. त्यातील या ओळी-
‘चिंच जर का खाई
दुसरा कोणी
तोंडाला सुटते
चुळूचुळ पाणी.’
त्यातूनअशी बालसुलभ, प्रांजल भावना हबीब भंडारे व्यक्त करतात.
त्यावेळी ही बालकविता बालकांना आपली वाटल्यास नवल ते काय! असे सहजपणे वाटून जाते. पिंपळाच्या झाडाखाली, डोंगराच्या आड, गुलाबांच्या बागेत, माईच्या कुशीत दडलेलं गाणं शोधून काढण्याचा हा कवी प्रयत्न करतो. देव हा बालसुलभ मनासाठी स्वतःच्या आईसारखा असतो. हे ते अगदी बेमालूमपणे ‘देवा’ देवा तू कसा?’ या कवितेतून उलगडतात.
बालसाहित्य आणि त्यातही बालकविता लिहिण्यासाठी बालकांच्या भावविश्वाशी एकरूपच व्हावे लागते. ज्याला ते जमते तोच उत्तम बालसाहित्यिक होऊ शकतो. बालकांची भाषा देखील अवगत असावी लागते. कवी हबीब भंडारे बालकांच्या भाषेनिशी बालकांच्या भावविश्वाला भिडतात. ‘चांदोबा’ बालकवितेत ते चांदोबाशी गप्पा मारणारा लहानगा त्याच्या बोबड्या बोलाने चांदोबाला झाडावर झोका बांधायला सांगतो. तर ‘खाऊ’ कवितेतील ताई आपल्या छोट्या भावाला म्हणजे बाल्याला ‘तू लाडका आहेस’ वगैरे गोड बोलून त्याचा सगळा खाऊ खाऊन टाकते आणि नंतर त्याला नावे ठेवते हे अगदी बालविश्वासी वास्तविक वाटावे असेच आहे. ‘आभालं’ ही आणखी एक बोबड्याबोलातील कविता. पावसाळी निसर्गरूप पाहून आपल्या आईशी सुंदर संवाद साधत म्हणतो कवितेतील बालक म्हणतो, ‘आई आई बघ ना हे आभालं.’
या कविता वाचतांना भाषिक प्रयोगामूळे ‘बोबड्या’ भारूडा सारखी दृष्यात्मकतेचाही अनुभव येतो.
एकेकाळी मातीत खेळणे हा जणू बालकांचा हक्कच होता. मातीचे निसर्गतः आकर्षण लहान मुलांना असतेच. माती सर्जनाची प्रेरणा ही देते याची जाणीव करून देणारी ‘हिरवी माती’ ही कविता देखील या संग्रहात आहे. शेताशिवारातील सकाळ ही किशोरवयीन मुलांना सुंदर निसर्गानुभव देणारी संस्कारशील कविता अगदी मोठ्यांनाही भुरळ घालील अशीच आहे. तिचा शेवट पहा-
‘कामानेच काम मिळते
बोले एक मजूर बाई
जीव लावल्यानेच परत येतात
दूर गेलेल्या गाई’
‘पाऊस म्हणजेच सुखाचं गाणं’ ही कविता देखील अशीच सुंदर कविता आहे. पावसामुळेच निसर्ग बहरतो आणि जीवन फुलारतं.
‘शेतकरी कामगारांची
उल्लासित मनं,
एक एक थेंब पावसाचा
झेलतात आनंदानं पानं’
या ओळीतून कवीची बांधिलकी कुणाशी आहे याची कल्पना येते. ताजी टवटवीत सकाळ आरोग्यपूर्ण दिनचर्येची महती गाते आणि ‘उन्हाळी सुट्टी’ या कवितेत छंद जोपासत काळजी घ्यायला सांगितली जाते.
आजच्या विज्ञान युगात प्रगतीच्या वाटेने चालताना बुवाबाजीपासून दूर राहायला देखील कवी कवितेतून सांगतो. जागतिकीकरणाच्या काळातही पायवाटेचे आकर्षण असतेच हे ‘पायवाटा’ या कवितेतून समोर येते. ‘जशी भरदार कणसाजवळ पाखरे येतात तशी माणसाजवळ माणसे यावीत’ त्यासाठी नम्रता, ज्येष्ठाचा मान राखणे ,संकटात मदतीला धावणे, इमानदारी सांभाळणे आदी गुणांचा परिपोष आपल्यात व्हायला हवा हे ‘माणूस होणं महत्त्वाचं’ या कवितेत कवी सहजतेने सांगतो. ‘गावातली माणुसकी’ तर इतकी सुंदर की ते देशाचं, विश्वाचं प्रतीमान व्हावं. कारण ‘आपण सारे एक आहोत’ ही भावनाच तितकी विशाल नि सुंदर आहे.
‘म्याॅंव म्याॅंव माऊ’, ‘भेळ’ , ‘ट्रिंग ट्रिंग सायकलवाला’, ‘एक होती परी’, ‘ मागणं असं पदरात दे’ अशा कविता बालवाचकांना पुन्हा पुन्हा वाचाव्याशा आणि घोकाव्याशा वाटतील. तर
‘झुंजुमुंजू पहाट’ सारख्या कविता उर्जा देणाऱ्या ठरतील. या कवितासंग्रहाचे शीर्षक देखील याच कवितेतून घेतलेले आहे. पाऊस, दवबिंदू , घुंगरमाळेसारखी वाजणारी बाभळीची शेंग, चंद्राचं घर, पाखराचे उत्साही पंख, शेतीतून पिकांना जाणारे पाणी आणि शरीरावर उमटलेलं घामाचा चांदणे या कवितेत भेटून जाते. ‘दवबिंदूंचं निर्मळ सोनं’, ‘ ‘घामाची पेरणी’ , ‘सुगीचं हिरवं गाणं’ ,’ मायबाप दैवत आपले’ यासारख्या कविता किशोर आणि कुमारवयीन मुलांना खूप भावतील.
सध्या मोठ्या प्रमाणावर बालसाहित्य आणि त्यातही बालकविता लिहिली जाते मात्र त्यातून बालकांच्या हाती काय लागते? असा जेव्हा प्रश्न उभा ठाकतो तेव्हा लय, ताल, स्वर, भाषिक विकास, भावनिक विकास अशी काही उत्तरे समोर येतात. त्याचबरोबर निसर्गाशी एकरूपता, पर्यावरण विषयक प्रश्नांची प्राथमिक जाणीव याचाही त्यामध्ये समावेश करता येतो. ‘झाड जीवाचे मित्र’ ही अशीच एक पर्यावरण भान देणारी छानदार कविता आहे. ‘निळे निळे आभाळाचे डोळे’ मधील बालकविता ही कवीने प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे बालकांबरोबरच, किशोर आणि कुमार वयातील मुलांनाही साद घालणारी आहे.
‘निळे निळे आभाळाचे डोळे’ या संग्रहातील कविता बालवाचकांच्या नक्कीच पसंतीस उतरतील कारण वाचनीयता आणि सहजता या बालकवितांचा विशेष आहे. संपूर्णपणे रंगीत छपाई असलेल्या या संग्रहातील प्रत्येक कवितेसाठी सरदार जाधव यांनी आशयानुरूप सुंदर चित्रे दिली आहेत. त्यांनीच रेखाटलेले मुखपृष्ठही आकर्षक आहे.
डॉ कैलास दौंड
पुस्तकाचे नाव – निळे निळे आभाळाचे डोळे – बालकविता संग्रह
कवी – हबीब भंडारे
प्रकाशक – कैलाश पब्लिकेशन्स ,छत्रपती संभाजीनगर
पृष्ठे – ६४ मूल्य -१८० ₹
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.