June 18, 2024
every-change-in-the-environment-needs-to-be-taken-seriously
Home » वातावरणात होणारा प्रत्येक बदल गांभिर्याने घेण्याची गरज
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वातावरणात होणारा प्रत्येक बदल गांभिर्याने घेण्याची गरज

नागपूर आणि न्यूयॉर्क!

खरं तर वातावरणात होणारा प्रत्येक बदल गांभिर्याने घ्यायला हवा. गेल्या ४० वर्षांत हिमालयातील १३ टक्के छोट्या नद्या लुप्त झाल्या. बर्फाचे आवरण कमी होऊन तेथे आढळणारी झाडे नष्ट व्हायला सुरुवात झाली. तेथील जैवविविधता हळूहळू समाप्त होऊ लागली. हे आवरण हळूहळू लुप्त होऊ लागेल. बर्फाच्या आवरणामुळे तेथील मातीची आजवर न झालेली मातीची धुप होऊ लागेल.

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

पावसानं दडी मारली म्हणून अख्खा महाराष्ट्र पावसाळ्यातही तहानलेला राहणार, असे वाटत असताना पावसाने पुन्हा सुरुवात केली. हवामान खात्याला दगा देत, नागपूर वगळता सर्वत्र बेतानेच बरसला. पाऊस जोरात येणार, ऑरेंज, येलो अलर्ट सारे चूकीचे ठरवत पाऊस पडत राहिला. मात्र गत आठवड्यात आलेल्या दोन बातम्यांनी लक्ष वेधून घेतले. पर्यावरणविषयक चिंता वाढवणाऱ्य या बातम्या आहेत. त्यातील एक आहे भारत आणि चीनला हादरवणारी. हिमालयाचे तापमान वाढत असल्याची ती बातमी आहे. तर दुसरी जगातील सर्वात प्रगत राष्ट्र मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतील, सुप्रसिद्ध न्यूयॉर्क शहराबद्दल. न्यूयॉर्क शहर लवकरच पाण्याखाली जाणार असल्याची बातमीही धक्का देणारी आहे.

हिमालयाचे तापमान गत काही वर्षात झपाट्याने वाढत आहे. एकविसाव्या शतकात तर हिमालयाच्या तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. हिमालयाच्या पायथ्यापेक्षा वरच्या भागातील तापमान वेगाने वाढत आहे. मानव पर्यावरणाचे नुकसान असेच करत राहिला तर, हिमालयाच्या शिखराचे तापमान एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत २.६ ते ४.६ डिग्री सेल्सियस इतके वाढू शकते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस हिमालयातील वातावरणात बदल होऊ लागला. १९७० नंतर परिस्थिती आणखी बिघडली. तापमानात एका दशकात ०.१६ डिग्री सेल्सियस इतकी वाढ होऊ लागली. सध्या ही तापमान वाढ दुप्पट वेगाने होत आहे. हिमालयाच्या समुद्रसपाटीपासून चार हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर एका दशकात अर्धा डिग्री सेल्सियस तापमान वाढत आहे. याचा परिणाम तेथील संपूर्ण जीवसृष्टीवर होत आहे. हे परिणाम मागील अनेक वर्षांपासून दिसत आहेत. मात्र यांना गांभिर्याने घेण्यात आले नाही.

खरं तर वातावरणात होणारा प्रत्येक बदल गांभिर्याने घ्यायला हवा. गेल्या ४० वर्षांत हिमालयातील १३ टक्के छोट्या नद्या लुप्त झाल्या. बर्फाचे आवरण कमी होऊन तेथे आढळणारी झाडे नष्ट व्हायला सुरुवात झाली. तेथील जैवविविधता हळूहळू समाप्त होऊ लागली. हे आवरण हळूहळू लुप्त होऊ लागेल. बर्फाच्या आवरणामुळे तेथील मातीची आजवर न झालेली मातीची धुप होऊ लागेल. माती सुटी असल्याने आज जे डोंगररांगातून बांधलेल्या रस्त्याच्या कडेला आढळून येतात, त्या दरड कोसळण्याच्या, रस्ते खचण्याच्या घटना सर्वत्रदिसतील. हिमालयाच्या डोंगररांगांची उंची घटेल. तेथील झीज झालेली माती समुद्राच्या तळाशी जाईल. चार हजार मीटर उंचीचे ढीग जर समुद्राच्या तळाशी गेले तर, समुद्राचे पाणी आपोआप वर चढू लागेल. याचे परिणाम आणखी तीव्र होत जातील. तापमान वाढ आणि बर्फाचे वितळणे यांचे समीकरण सम प्रमाणात असते. परिणामी जितके तापमान जास्त असेल तितके बर्फ वेगाने वितळेल.

दुसरी बातमीही तापमान वाढीच्या परिणामाची आहे. ‘अर्थ्स फ्युचर’ या संशोधन पत्रिकेतील मागील महिन्यात एक शोध निबंध प्रसिद्ध झाला आहे. त्यात अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर लवकरच बुडणार असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. न्यूयॉर्कमध्ये अनेक गगनचुंबी इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्यांचे वजन गिगाटन्समध्ये आहे. या इमारतींच्या वजनाने न्यूयॉर्क शहरासह आजूबाजूचा परिसर खचत आहे. दरवर्षी एक ते दोन मिलीमीटरने जमीन खचत आहे. सर्वच देशात समुद्र किनारी शहरे उभारण्याची जणू काही शर्यत लागली आहे. त्यासाठी अनेक गगनचुंबी इमारती उभारण्यात आल्या. न्यूयॉर्क शहरासारखी अवस्था जेथे घनदाट लोकवस्ती, उंच इमारती आहेत, अशा सर्वच शहरांना असणार आहे. न्यूयॉर्क यातील अग्रेसर. या शहराच्या विशेष अभ्यासातून ही बाब उघड झाली इतकेच. समुद्रकिनारी असलेल्या इतर शहरांच्या अभ्यासातही हे आढळू शकेल असे संशोधकांचे मत आहे.

या शोधनिबंधात न्यूयॉर्क शहराला पूराचा मोठा धोका असल्याचेही लिहिले आहे. हा पूराचा धोका तीन कारणामुंळे संभवतो. यातील भूभागाचे खचणे, हे पहिले कारण आहे. भूभाग खचला की शहरातील पावसाच्या पाण्याला जाण्यासाठी बांधलेल्या मार्गीकांचा उतार कमी होईल. शहर आणि समुद्र यांची पातळी कमी होत जाणार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी समुद्राकडे कमी वेगाने जाईल. आणखी एका कारणाने समुद्राची पातळी आणि शहर यातील अंतर कमी होईल. ते कारण म्हणजे, जागतिक तापमान वाढीमुळे बर्फाचे थर वितळून समुद्राची पातळी वाढणार आहे. तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे जागतिक तापमान वाढीमुळे पावसाचे अनिश्चित पद्धतीने येणे असणार आहे. कमी वेळात जास्त पाऊस पडेल. त्यामुळे आजवरच्या जास्तीत जास्त पावसाला गृहीत धरून बांधण्यात आलेली पाणी निचरा करणारी यंत्रणा कूचकामी ठरून पाणी पात्राबाहेर पडेल आणि ते घराघरात घुसेल.

हे निष्कर्ष आणि अंदाज व्यक्त करणारा शोधनिबंध प्रसिद्ध होऊन एक महिना होण्यापूर्वीच, हे प्रत्यक्ष घडले. न्यूयॉर्क शहरात गुरूवारी झालेल्या पावसाने गटाराबाहेर पाणी वाहू लागले. ते घरांमध्ये घुसले. मुंबईत पाऊस जासत झाल्यानंतर आपण ‘मुंबईची तुंबई’ झाली, असे म्हणतो. न्यूयॉर्क शहराची अक्षरश: तशीच अवस्था झालेली दिसले. काही मंडळीनी लगेच ‘पहा, फक्त मुंबईत नाही तर न्यूयॉर्कमध्येही असे घडते’ असे म्हणत आत्मिक समाधान मिळवले. नागपूरबाबतही असेच घडले. २३ ऑगस्टच्या पुण्यनगरीमधील याच सदरातील लेखमालेत ‘नागपूरचा इशारा’ या लेखामध्ये नागपूरमध्ये महापूर का आणि कसा येणार याबाबत लिहिले होते. त्यानंतर एक महिन्यात नागपूरकरांनी पूर अनुभवला. पर्यावरणाचे हे वागणे समजून घेता येते. निसर्ग संकेत देत असतो. मात्र ‘हम नही सुधरेंगे’ हे आमच्या रक्तात इतके भिनले आहे की, आम्ही आजही आपला निसर्गाप्रती व्यवहार बदलत नाही.

आताही आम्ही शहरांना वाढवत आहोत. अभ्यासकांच्या मते, २०५० पर्यंत ७० टक्के लोकसंख्या शहरांमध्ये असेल. ग्रामीण भागाचे अस्तित्व घटणार आहे. शहरांची लोकसंख्या वाढली की ऊर्जेची गरज वाढणार आहे. अर्थातच प्रदूषणाची केंद्रे एकवटतील. शहरात आलेले अनेक लोक शहरात राहून शेतीसुद्धा करतील. त्यासाठी वाहनांचा वापर आणि त्यामुळे प्रदूषण वाढेल. वाढत्या शहरीकरणामुळे आणि भूजलाचा अतिरेकी वापर झाल्याने, मोठ्या आणि अनियंत्रीत वाढणाऱ्या शहरांमुळे, तेथील जमीन खचण्याचे प्रमाण वाढेल. त्यातही शहरांची वाढ ही समुद्रकिनारी होणार आहे. त्यामुळेच अशा किनारपट्टीवर वाढणाऱ्या सर्वच शहरांना न्यूयॉर्कसारखा पूराचा धोका अनुभवावा लागेल.

अर्थातच याचे मूळ आणि महत्त्वाचे कारण जागतिक तापमान वाढ आहे. २०३० पर्यंत आपणास कार्बन डायऑक्साईउचे उत्सर्जन कमी करावे लागेल. ते कमी न केल्यास तापमान वाढ अशा पातळीवर पोहोचलेली असेल की पृथ्वीवरील जीवसृष्टी विनाशाच्या गर्तेत सापडेल. माणूसही अन्य सजीवांप्रमाणे एक सजीव आहे. जीवसृष्टी संपत असताना माणूस कसा राहील!

Related posts

खुरपं : आधुनिक ग्रामीण स्त्रीजीवनाचा आलेख

साखर उद्योगाच्या माहितीचा फायदेशीर ग्रंथ : शरद पवार

पानिपत इथल्या 2 जी इथेनॉल प्रकल्पामुळे प्रदुषण कमी होण्यास मदत

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406