शांत बसून मन एकाग्र करायला हवे. मनाची एकाग्रता वाढली की विचारशक्ती वाढते. मनाला चांगल्या कामाची सवय लागते. चांगले विचार मनात घोळू लागतात. साहजिकच मन प्रसन्न होते. आध्यात्मिक ग्रंथाच्या पारायणाने मनाला सतविचारांची सवय लागते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
सांगे श्रवणीं ऐकावे ठेलें । की नेत्रींचें तेज गेलें ।
हें नासारंध्र बुझाले । परिमळु नेघे ।। ५५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा
ओवीचा अर्थ – सांग, कानानी ऐकणे बंद झाले आहे काय ? अथवा डोळ्यातील पाहाण्याचे सामर्थ्य गेले आहे काय ? या नाकपुड्या बुजून वास घेईनाशा झाल्या आहेत काय ?
धकाधकीच्या जीवनामुळे माणसांची झोपच उडाली आहे. यामुळे अनेक विकार, विकृती मानवामध्ये दिसून येऊ लागल्या आहेत. लहरीपणा, चिडचिडेपणा वाढत चालला आहे. अती आवाजामुळे, ध्वनी प्रदूषणामुळे श्रवणशक्ती कमी होताना आढळत आहे. डोळ्यांना विश्रांती न मिळाल्याने अंधत्व येण्याचे प्रमाणही वाढत आहे. दुर्गंधीमुळे सुगंधाचा वासही नाकाला झोंबू लागला आहे. बदलत्या जीवनशैलीचा हा परिणाम आहे.
वाढते प्रदुषण मनुष्याचे आरोग्य बिघडवत आहे याकडे लक्ष दिले जात नाही. पूर्वीच्या काळी गावाकडे पाटाचे पाणी थेट पिता येत होते. पण आता हे पाणी पिण्या योग्य राहीलेले नाही. अशी अवस्था कशामुळे झाली याकडे पाहण्यासच लोकांना वेळ राहीला नाही. निसर्गातील सौंदर्य आपण ओरबाडून खाऊ लागल्यावर निसर्ग कसा राहील. याचा विचार करायला नको का ? यासाठी कर्म कशा पद्धतीने व कसे करायला हवे यावर चिंतन मनन होणे गरजेचे आहे.
नियोजनच कोलमडल्याने हे प्रकार वाढत आहेत. पूर्वीच्याकाळी हे विकार उतारवयात होत असत पण ऐन तारुण्यात वृद्धत्वाच्या विकारांचा सामना नव्यापिढीला करावा लागत आहे. यावर औषध उपचारांचाही परिणाम फारसा दिसून येत नाही. मनाची शांतीच मनुष्य हरवून बसला आहे. यावर उपाय आपल्या संस्कृतीत सांगितले आहेत. पण पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे त्याला हे साधेसोपे उपायही समजेनासे झाले आहेत. अशाने मनाला शांती मिळते. समाधान मिळते. हेच मुळात पटेनासे झाले आहे.
पैशाने सर्व खरेदी करता येते याच भ्रमात मनुष्य वावरत आहे. मनःशांती ही पैशाने विकत मिळत नाही. ती आपल्याला मिळवावी लागते. योगा, व्यायाम यामुळेही क्षणिक मनःशांती लाभते. ताजेतवाने होता येते. पण कायमस्वरूपी मनःशांती मिळवायची असेल तर त्यासाठी आपण नियोजनबद्ध जीवनशैली आत्मसात करावी लागते. नियोजनाला जीवनात खूप महत्त्व आहे. या नियोजनात काही काळ हा मनाला विश्रांतीसाठी द्यावा लागतो.
दररोज तासभर मनाला शांतीसाठी अध्यात्मात मन रमवायला हवे. त्याचा अभ्यास करायला हवा. त्यामध्ये सांगितलेले साधनेचे उपाय योजायला हवेत. साधनेने मनाचा थकवा दूर होतो. मनाला नवी उभारी मिळते. मनातील विचार शांत होतात. मन प्रसन्न होते. यासाठी साधना ही आवश्यक आहे. कमीत कमी पाच मिनिटे तरी साधना करायला हवी. पण यासाठी मानवाला वेळच नाही.
शांत बसून मन एकाग्र करायला हवे. मनाची एकाग्रता वाढली की विचारशक्ती वाढते. मनाला चांगल्या कामाची सवय लागते. चांगले विचार मनात घोळू लागतात. साहजिकच मन प्रसन्न होते. आध्यात्मिक ग्रंथाच्या पारायणाने मनाला सतविचारांची सवय लागते. हळूहळू मन त्यामध्ये रमू लागते. शांत झोप लागते. यामुळे होणाऱ्या विकारावर हा एकमेव उपाय आहे. याचा विचार करायला हवा. औषधाने जे साध्य होत नाही ते यामुळे निश्चितच साध्य होते. यासाठी प्रयत्न करायला हवा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.