अध्यात्म या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. मोजक्या शब्दात अध्यात्म मांडता येणे अवघड आहे. तसेच अध्यात्म हे जगायचे असते. अनुभवायचे असते. जो अध्यात्म जगतो, त्याला मोक्ष प्राप्ती होते हे निश्चित !
श्रीमती कल्पना धर्माधिकारी
स्नेह पँरेडाईज, सुयोग हाईटस,
घर नं. ६, कोथरूड, पौड रोड, पुणे ४११०३८.
गेले दिड वर्षाहून अधिक काळ कोरोनाने संपूर्ण जगाला भयग्रस्त करून सोडले आहे. आजकाल त्यावरील लस आल्याने थोडाफार दिलासा सर्वसामान्य माणसांना मिळाला आहे. पण तो शरीराच्या स्वास्थ्यासाठी…पण या कोरोनाने जे मानसिक स्वास्थ्य बिघडवून टाकले आहे त्यासाठी अध्यात्माचे महत्व निश्चितच महत्त्वाचे आहे. कारण अध्यात्म मानसिक स्वाथ्य टिकवण्यासाठी, मानसिक बळ वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचे काम करतेय. जणू मेंदूचे हे टॉनिक आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. यामधून जी मानसिक शक्ती मिळते ती कोरोना प्रसंगातून शांतपणे बाहेर पडण्याचे. तसेच त्याला समर्थपणे तोंड देण्याचे मानसिक बळ देतेय.
अध्यात्म म्हणजे एक प्रकारची आपापल्या परमेश्वराची उपासनाच ! उपासनेचा मोठा आश्रयू l असे समर्थांनी म्हटलेच आहे. माणसाला उपासनेचा खूप आधार असतो. सातत्याने पावलागणिक प्रत्येक गोष्टीत उपासनेची माणसांना गरज पडते. भगवंताच्या उपासनेतील सातत्य माणसाला मानसिक बळ देते.
आध्यात्मिक प्रक्रिया…
अध्यात्म आणि मानसिक स्वास्थ्य यांचा अगदी जवळचा संबंध आहे. “अधी आत्म” म्हणजे स्वत:कडे पाहणे. अर्थातच स्वत:कडे पाहण्यात आत्मपरीक्षण आपोआपच येते. यातूनच आपल्या जगण्याचा खोलवर दडलेला अर्थ काय याचा विचार सुरु होतो आणि मग एक “पूर्णत्वा”ची आस निर्माण होते. आपल्या दैनंदिन आयुष्यापेक्षा त्यातल्या अनेक ऐहिक गोष्टीपेक्षा मोठे काहीतरी, परिपूर्ण असलेले, खोलवर अर्थ प्राप्त करून देणारे आयुष्यात काही आहे याची जाणीव निर्माण होते. सध्याच्या कोरोनाच्या वातावरणामध्ये ही जाणीव फार महत्वपूर्ण ठरतेय. आपल्या अवतीभोवतीच्या जगात काय अर्थ दडला आहे, त्याचा वेध घेऊन त्यात आपले म्हणजे मानवाचे स्थान काय, कार्य काय हे शोधून काढण्याची एक आंतरिक इच्छा प्रत्येक मानवात असते. ही प्रक्रिया म्हणजे आध्यात्मिकता ! कोरोनामुळे जो माणसाला स्वत:च्या अंतरंगात डोकावण्यासाठी वेळ मिळाला आहे. यामध्ये ही प्रक्रिया महत्वाचे काम करीत आहे.
अध्यात्म या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. मोजक्या शब्दात अध्यात्म मांडता येणे अवघड आहे. तसेच अध्यात्म हे जगायचे असते. अनुभवायचे असते. जो अध्यात्म जगतो, त्याला मोक्ष प्राप्ती होते हे निश्चित ! असे अध्यात्म जगणे म्हणजे नेमके काय ? तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे जे कार्य करतो, ते सर्व मनापासून करावे. प्रामाणिकपणे करावे, नि:स्वार्थ भावाने करावे, इतरांच्या कल्याणासाठी करावे. याला म्हणतात अध्यात्म जगणे !
अध्यात्म जगलेले देवदूत
स्वत:साठी तर सगळेच जगतात. पण आपल्यापैकी असे काहीजण असे आहेत जे इतरांसाठीही आपल्या सेवा पुरवितात. आपल्या कमाईतील काही भाग खर्च करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करतात. याला परमार्थही म्हणता येईल. अध्यात्म आणि परमार्थ यात फारसा फरक जाणवत नाही. सध्याच्या कोरोनामय वातावरणात जगभरातील हॉस्पिटलमध्ये अहोरात्र काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी, रुग्णवाहिकेसारखी सेवा पुरविणारे, अत्यावश्यक सेवा पुरविणारे ही सर्व अध्यात्म आणि परमार्थाची उत्तम उदाहरणे आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, आपल्या घरादारापासून, कुटुंबापासून लांब राहून सातत्याने ही सेवा देणारी मंडळी अध्यात्माचे बाळकडू प्यायलेलीच म्हणावी लागतील. यामध्ये नि:स्वार्थ भावाने, स्वत:चे जीव धोक्यात घालून, स्वत:चे कर्तव्य पार पाडून या लोकांनी केलेल्या समाजसेवेला “अध्यात्म जगलेले देवदूत” असेच म्हणावे लागेल.
कोरोनाने शिकवले अध्यात्म
आपल्यात जे चेतनातत्व असते ते जाणून घेणे, त्याचे मनन करणे आणि त्याचे दर्शन करणे अर्थात स्वत:च्या बाबतीत जाणून घेणे वा आत्मप्रज्ञ होणे म्हणजेही अध्यात्म होय. गीतेच्या आठव्या अध्यायामध्ये अध्यात्माचा अर्थ दिसून येतो. त्यात स्वत:चे स्वरूप अर्थात जीवात्मा एक अंश हे मनुष्यातही असतोच. त्याची अनुभूती अनेकदा अनेक प्रसंगी आपण सर्व घेत असतो. कधीकधी या परमात्म्याचा अंश हळू हळू लोप पावतो आणि मग निराशा येते. क्षणिक संबंध, एखादी वस्तू यांना आपण जवळ करतो. त्यावेळी सतत आपल्याबरोबर असणाऱ्या शरीरालाही आपण सवयीचे गुलाम बनवितो आणि हिच बाब आपल्याला अध्यात्मापासून दूर नेत नैराश्याच्या खाईत ढकलत असते. पण जेव्हा कोरोनासारख्या संकटामुळे हे सत्य आपल्या लक्षात येते तेव्हा आपण आयुष्याच्या अशा वळणावर येऊन थांबलेले असतो, जेथे आता कशाचीही आस राहिलेली नसते. मूलभूत गरजा लक्षात येतात. सर्व प्रकारचा हव्यास तिथेच थांबतो. फक्त आरोग्यपूर्ण “जगणे” एव्हढीच आशा शिल्लक राहते. सर्व भौतिक लागणाऱ्या अनेक गोष्टी निरस वाटू लागतात. एवढेच नाही तर आपण आजवर केलेली अनेक प्रकारची चैन किती फोल होती हेही ध्यानात येऊ लागते….. आणि हेच अध्यात्म आपणा सर्वांना कोरोनाने शिकवलेय.
मानसिक शांतासाठीच…
अध्यात्म आणि धर्म या गोष्टी समान नाहीत. अध्यात्म आणि धर्म हे दोन्ही संस्कृतीचाच एक भाग आहेत. मानवापेक्षा श्रेष्ठ असा देव, अशी शक्ती किंवा “कोणीतरी” असते हे अध्यात्मिक माणूस बहुतेक मानतो. पण तरीही आध्यात्मिक व्यक्ती आस्तिक आणि नास्तिक दोन्हीही असू शकतात. धर्म माणसाला जगण्याचा मार्ग दाखवतो. पण खूप वेळा आध्यात्मिकतेला कर्मकांडाचे बंधन नाही. असे असले तरी धार्मिकता, धर्मश्रद्धा आणि आध्यात्मिकता हातात हात घालूनच चालतात. सध्याच्या कोरोनामय वातावरणात वेगवेगळ्या जपाचे, वेगवेगळ्या सामुदायिक पोथीचे वाचन, निरूपण ऐकणे असे अनेक कार्यक्रम घेतले जातात. मनाची शांती मिळवण्यासाठी व रिकामा वेळ सत्कारणी लागण्यासाठी अनेक लोक यात सहभागी होताना दिसून येतात. यातूनच या प्रकारच्या उपासनांची आवडही वाढत जात आहे.
स्व चा शोध…
अध्यात्माकडे ओढा असलेले धार्मिकसुध्दा असतात. धार्मिक ग्रंथाचे वाचन, निरूपण, त्यांच्या अर्थाविषयी चर्चा, जप, नामस्मरण यातून मन शांत करणे, ध्यानधारणेतून मन:शक्ती वाढवणे अशा वेगवेगळ्या पद्धतीनी “स्व”चा शोध घेतला जातो. कोरोनाच्या या वातावरणामुळे हा शोध घेण्याचे काम अत्यंत वेगाने वाढलेले दिसून येतेय. शेवटी संघर्षमय जीवनात मन:शांती मिळवणे अधिकाधिक गरजेचे सर्वानाच वाटू लागले आहे. सभोवताली कोरोनाच्या वातावरणामुळे मनांत निर्माण होणाऱ्या चिंता, आप्तस्वकीयांचे दुर्दैवी मृत्यू अशा आपत्तीनंतर मनावर होणारा आघात या सर्वांचा यशस्वीपणे सामना करताना इतर अनेक गोष्टीप्रमाणे आध्यात्मिक दृष्टीकोनाचा खूप फायदा होताना सर्वत्र दिसून आले आहे. आत्तापर्यतच्या विविध शास्त्रीय संशोधनातून हे लक्षात आले आहे एखादे संकट आले की परिस्थितीला दोष देत बसले की मन निराश होते, पण “देवाला बहुधा या प्रसंगातून मला काही शिकवायचे आहे” किंवा “देव जे करतो ते भल्याकरताच” असे म्हणणाऱ्या व्यक्तीला पटकन निराशा येत नाही. अध्यात्माकडे कल असलेली व्यक्ती या संकटाचा सामना करताना मानसिकरित्या खचून जाताना दिसत नाही. माणसाचे मन आणि शारीरिक तब्येत याचा अगदी जवळचा सबंध आहे. मन शांत असले की शरीर आपोआपच स्वस्थ राहते. त्यामुळे व्यक्तीचे कोरोनासारख्या रोगांपासून शारीरिक – मानसिक संरक्षण होताना दिसून येत आहे. औषध आपले काम करतेच. पण त्याबरोबर अध्यात्मामुळे मिळणारी ही मानसिक शक्ती पूरक ठरतेय.
वर्तमानात जगण्याची शिकवण
सध्याच्या कोरोनामय वातावरणात सामूहिकतेची भावना आणि एकमेकांना मिळणारा मानसिक आधार महत्वाचा ठरला आहे. स्वत:कडे बघण्याची सवय झाली आहे. तसेच वर्तमानात जगण्याची शिकवणही या अध्यात्माने दिली आहे. त्याचा उपयोग मानसिक स्वास्थ्य वाढीसाठी चांगला झाला. या आध्यात्मिक वाढलेल्या मनोवृतीतून समाधान, क्षमाशीलता आणि प्रेम वृद्धिगत झालेलेही दिसून येत आहे. प्रार्थनेतही अंतर्मुख करण्याचे, लीनता निर्माण करण्याची, विनम्र भाव निर्माण करण्याची शक्ती असते हे कळून आले आहे. एकत्रितपणे होणारे भजन, ईशस्तुती, प्रवचन या सगळ्यातून अमाप मन:शांती मिळत आहे. आपल्या संतसाहित्यातही आध्यात्मिक दृष्टीकोन दिसून येतो. समर्थ रामदासांनी तर “मनाचे श्लोक”च लिहिलेत. आपले दु:ख आणि चिंता कमी करण्यासाठी स्वत:पलीकडचा व्यापक विचार करण्याचा सल्ला ते देतात, म्हणून तर ते म्हणतात,
मना मानसी दु:ख आणू नको रे l
मना सर्वथा शोक चिंता नको रे l
विवेके देहेबुद्धी सोडून द्यावी l
विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी….ll
अशावेळी येणारी अध्यात्म – अनुभूती स्वत:चा शोध घ्यायला लावणारी असते. अशी अनुभूती मनाला उभारी देते. भविष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करते आणि अर्थातच मानसिक स्वास्थ्यासाठी ते उपयोगी ठरते. सध्याच्या कोरोनामय वातावरणात हे अध्यात्म एक मानसिक उपचार म्हणून संजीवनीप्रमाणे उपयोगीही ठरत आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.