पाहताच क्षणी प्रेमात पडावं…असं कुठं असतंय काय ? तर होय..! कोकणातल्या देवराईवर, हिरवाईवर अन् इथल्या निसर्ग सौंदर्यावर पाहताक्षणी प्रेमाची सुखद अनुभुती मिळते.
– प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गनगरीतील कुडाळ तालुक्यातील अणाव गावी यशकथांसाठी काल भेट दिली. गावातून बाहेर पडून ओरोसकडे निघताना काही अंतरावर भात लावणीच्या मनोहारी दृश्याने भुरळ घातली. याच लावणीत लांडोरद्वय मुक्तपणे संचार करत होती. निसर्गाचा हा अप्रतिम क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्याची चाहूल लागताच ते मागे फिरले.
उंचच-उंच माड आणि पायाशी अंथरलेला हिरवाकंच शालूच म्हणावा ! एखाद्या नववधूच्या अंगावर शोभून दिसावा अगदी तसा. सुतारपक्ष्यांची जोडी माडावर बसलेली. मध्येच एखादी खार शीर्षासन करत उतरलेली. जोडीला अन्य पक्ष्यांचा केवळ ध्वनी. दिवाळीचे अभंग्य स्नान झाल्याप्रमाणे ओसरलेल्या पावसानंतर हे सगळं दृश्य भासत होतं. मांत्रिकाने वश करावं आणि आपण मोहित होऊन त्यात हरवून जावं..अगदी मंत्रमुग्ध..तसाच हा काहीसा कालचा क्षण होता.!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.