“उत्सव! लोकशाहीचा…”
दोन दिवस प्रचंड ताण सहन करावा लागला. अर्थात इतरांना फारसं देणं घेणं नसतं. कामच आहे त्यांच पगार घेतात ते…. सरकारकडून.
पण बरं वाटतं कोणी काही जरी म्हटलं तर लोकशाही उत्सवात शिक्षक, नोकरशहा व पोलिसांच स्थान खूप महत्त्वाच आहे. हे या प्रक्रियेत जाणवत.
अगदी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट इतर साहित्य ताब्यात मिळाल्यावर तर जबाबदारी खूपच वाढते. मग गाव कोणत मिळेल? शाळा कशी मिळेल? मतदान किती असेल? जेवायची सोय होईल का? एक ना ना प्रश्न??? आदल्या दिवशी रात्रभर जागे… सकाळी मॉकपोल लवकर घ्यायचंय…. काहीजण तोंडात तोबरा भरून,
“अय सायब??मतदान प्रतिनिधी म्हणून आलूय”.
हो! बसा.ते ही नम्रपणे बोलायचं. पहाटे उठून गार पाण्याने आंघोळ करायची. मशीन जोडून मॉकपोल होईपर्यंत धाकधूक…. सगळेच कर्मचारी तणावात असतात. या काळात नोकरीची फार भीती वाटते. एकदा सी.आर.सी. करून मशीन सील करून तयार करेपर्यंत, जीवात जीव नसतो. मतदान खोलीत नारळ वाढवायला नटून थटून येणाऱ्या स्त्रिया बघून कधी तरी थोडसं बरं वाटतं लोकशाहीवर नितांत श्रद्धा, व प्रेम आदर आहे लोकांच्या मनात…..????? (महागड्या गाड्या, करोडोंची संपत्ती, शैक्षणिक संस्था, कन्स्ट्रक्शन उद्योग, घराणेशाही, परदेशी वाऱ्या त्या ताणतणावातही डोळ्यासमोरून जातात.
“आवरा की सायब लवकर सात वाजलय” पुन्हा पट्टी सील ए वर बी की बी वर??? सकाळच्या हवेत ही घाम फुटतो. काही चुकलं तर नसेल??सी. यु. वरच टोटल बटन दाबून झिरो आला की मग जरा बरं वाटतं.पुन्हा आवाज “आव सायब झाल का न्हाय?? आवरा की लवकर..”.
पुन्हा एकदा त्याच्याकडे शांत नजरेने बघायचं. मोठ्या आवाजात काही बोलावं म्हटलं तर??? दिवसभर,
“सायब ऑब्जेक्शन हाय आमचं”. रुमालान घाम पुसायचा.. एकदाच मतदान सुरळीत सुरू. पण चहा घेतला का?? याची चौकशी नाही कोण करत. एखादा शिपाई मात्र धडपडत असतो.गर्दी वाढत जाते काही अंध अपंग त्यांची अवस्था बघवत नाही. पण त्यांचं मत करण्यासाठी जीवापाड धडपडणारे कार्यकर्ते. काल तर असं वाटत होतं की 75 वर्षे वयाच्यावर असणाऱ्या आजी-आजोबांनीच लोकशाही जिवंत ठेवली आहे. 90 पार करणाऱ्या मतदारांना सही करावयाची असते. बरं वाटतं बघून.. नातवाला आजी आजोबाच मतदान करायची घाई.सुनेला सासूच मतदान करावयाची घाई. पण त्या थकलेल्यांना मात्र स्वतः मतदान करायचं असतं. उपेक्षित घटकातील लोक झाडून मतदान करतात. ज्यांचं पोट भरलय त्यांना फारशी गरज नसते. काही जण तर तमतच येतात. काहीजण आपली संख्या दाखवायला ग्रुपन येतात. पण जबाबदारीने मतदान करणारे पहिले की समाधान वाटतं. घटनेंन सर्वांना मतदानाचा समान अधिकार दिलाय. दोन ते तीन टक्के लोक असे आहेत की त्यांना कुठेतरी बटन दाबायचं असतं एवढच माहीत.. तीन चार टक्के असे आहेत की चित्रावर नाहीतर, रेड लाइट वर बटन म्हणून बराच वेळ दाबत राहतात. काहीच कळत नाही. थकलेल्या, धाप लागलेल्या माणसांचा अंगठा नोंदवही वर जबरदस्तीन उठवताना वाईट वाटतं. असं वाटतं फक्त मता दिवशी थकलेल्यांचं कौतुक?? होतं. अठरा वर्षावरील एका तरुणीला एका तरुणाला सहज विचारलं “वोटिंग केलं??”
‘हो!’
” लोकशाही म्हणजे काय रे”. नाही सांगता आलं “काय करतेस?”
” एमबीए करते.”
राजकीय पक्षांचा प्रचार क्षणोक्षणी दिसला. पण मतदानाला न्यावयाचा पुरावा, मशीनवर मत कस द्यायचं.याची जाहिरात दिसली नाही. लोकांना डावा हात लवकर समजत नाही. तर्जनीनं बटन दाबावयाच्या ऐवजी अंगठा उठवायचा प्रयत्न करतात. खरंतर वोटिंग प्रक्रिया घरोघरी जाऊन समजावून द्यायला हवी. पण??? (लोकांना फार शहाणं करू नये हे ही खरं. समजा उद्या खरंच लोक शहाणे झाले तर????) दिवसभराच्या रांगा प्रचंड काम, ताण तरीही बरं वाटतं उद्याच्या समृद्ध भारतासाठी भावी पिढीसाठी शिक्षण, आरोग्य,सार्वजनिक सेवा समता, न्यायासाठी लोक मतदान करतात. समाधान वाटतं. पण दिवसभर झोपा काढुन एखादा तरुण सहाला येतो.
“सायब आजून एक मिनिट बाकी हाय?” तेव्हा प्रचंड राग येतो. कितीही त्रास होऊ दे मतदान 80% च्या वर व्हावं असं वाटत अखंड भारताच्या भवितव्याची ही निवडणूक. मटणाच्या घबळाक पाण्यासाठी कुणी आपलं मत विकू नये असं वाटतं. आता शांत वाटतं. क्लोज बटन दाबलं की तणाव दूर होतो. आता पुन्हा पॅकिंग कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, लिफाफे जमा करताना पुन्हा ताण, बरेच जण गोंधळतात. त्रासतात. पेट्या जमा करावयाला रात्रीचे बारा एक वाजतात. थोडं खाऊन पुन्हा आपल्या घरट्याकड परतायचं. 40 तासाचा ताण संपलेला असतो. अंधाऱ्या रात्री, पहाटे मिळेल त्या वाहनांन धावपळ करत परतायचं. कारण उद्याचा सूर्य घेऊन येणार असतो लोकशाहीसाठी नवी सोनेरी किरणे….
रवि राजमाने
संपर्क – 7709999860
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.