पाच-दहा पैशाची पैज जिंकण्यासाठी तर कहरच, दहा घरची धा जण त्यात आसली तरी शेवटी एखादं उरायचं माझ्यासारखं… पाच पैसे मिळतील म्हणून मी बेडकागत फुगायचा… खरं पैज लावणारा शेवटी त्यात बी छडा काढायचा… पाच पैसेबी मिळायचं नाहीत… फुकटच….
रवींद्र शिवाजी गुरव
9822254047
ब बा बि बी बु बू बे बै बो बौ बॅ बॉ बं बः असली ही बोंबंची बाराखडी…. चौदाखडी नाही तर ही बाराखडीच आज लय आठवणीत याय लागलीया. तेचं कारण म्हंजे शिमगा… म्हणूच तर ही शिमग्याची टिमकी डोचक्यात वाजाय लागलीया हेच नक्की. गावात चार ठिकाणी व्हळी जळायची. दोन सार्वजनिक आणि दोन घरगुती. चव्हाट्याजवळ दांडगी व्हळी. डोंगरातनं सागवानाची व्हळी वाजत गाजत आणायची. ती नाळपाडून व्हळीदेवाजवळ खायची. ते आणलेलं झाड रवतात त्योच व्हळीदेव. त्याला पानं बांधून सजवून रवलेला. व्हळी जळल्याव काही दिवसांनी त्यो तोडतात. त्याचा खुट तसाच ठेवतात. त्यो काढून पुढच्या वर्षी तिथंच व्हळीदेव म्हणून दुसरं झाड रवतात. मामाच्या करंजफेण या गावात सावरीचं झाड रवतात. तिलाच पालवी फुटते. जगते ती. केवढी ही झाड जगवण्याची परंपरा ! कमालच करावी अशी. तिथली गुंडी करंगळीनं कौल लावून उचलायची दांडगी परंपरा. अशा झाड आणि दगडी गुंडीच्या व्हळीदेवाजवळ सांजेला.. व्हय किनट पडायला तिच्या बाजूला गावातल्या चार-दोन बैलगाड्या भरतील एवढ्या शेणींची व्हळी रचायची. दांडगी व्हळी व्हायची. मधी एरंड हुबा करायचा. ती सभूताली बोंबलून आमच्या मनगटांच्या साक्षीनं पेटवायची. दांडगा जाळ. आमच्या घराच्या दाराजवळ यायच्या तिच्या झळा. थंडी, कचरा असं काय बाय वाईट जळून खाक व्हायचं. याच व्हळीच्या जळत्या शेणीच्या निखाऱ्याव हारभूरं भाजून खाईताव. दात घट व्हायचत म्हणं. पडाय-किडायचं बी नाहीत. हिकडं कोकणात नारळ अर्पण करतात.. प्रसंगी फेकतात व्हळीत… व्हय होमात. त्यो भाजून खातात. मी बी खाल्लंत. माझा एक-एक विद्यार्थी मला हेरून आणू देतोय…हां तर तिकडं ती गावतली व्हळी समोर पेटतीया आजबी… पोस्तबी जमा कराल्यात शाहीर गावकरी. रामादा, डॉक्टरमामा, आप्पासाहेब देसाई आण्णा अशी बरीच शाहिरी कला जपणारी माणसं दिसतात. डफावर थाप मारून म्हणतात शाहिरी गाणं…
” झैजं ता गड्या झैजता
खंडीच्या पोळ्या पायजेता,
बाजारला गेलो आणलं गहू
तेच्या केल्या पोळ्या नवू…’ त्यातनं पोस्ताची कोंबडी-कोंबडा शिजायचं. प्रसाद घ्यायला गाव यायचं ते बोंबलून दमलेल्या पोरांच्या रूपानं, पळसाच्या पानाव एक एक तुकडा यायचा वाटणीला. माझ्यासारखा शाकाहारी गडी बघत बसायचा. ती पळसाची पानं आमच्याच घरातली इतरांना वाटलेली असायची. प्रसाद अासला खारकांड आसतोया ते मला तवाच कळलं… ‘तू गुरवाचं…तू खायाचा नाहीस’ हे वाटणाऱ्यानं त्या चाणण्यात रात्रीचं सांगितलंतं तवा. कधी-कधी भांडाणबी व्हायचं नि रस्सा मटणासकट चुलीत जायाचा त्यो कुणाच्यातरी रागासरशी.. “खावा XXX…. तोडून.” त्यो राग म्हणायचा. निघून जायाचा. तीन दगडांची चूल ईजायची.
आणि हो …. दुसरी व्हळी म्हादुबाच्या देवळाजवळ व्हायची ती बारकी. सकाळी आकराच्या ठोक्याला बुरटेमामांच्या नि पाटलांच्या दारात व्हळी जळायची. बोंबमाराय आम्ही आसायचाव भाडोत्री आणल्यागत. त्याचं मानधन म्हणून प्रसादी पुरणाची पोळी, नारळातलं पाणी आणि खोबऱ्याचा तुकडा. पुरून पोळी एरंडाला लटकून व्हळीत जळायची. एखादं पटाईत ती शिताफिनं पळवून न्यायचं. आमची पालखी तेच्या मागं. मागनं आम्हा भाड्यांच्या मांड्या मोडल्या जायच्या. उडी आणली जायाची, तडकी, पालखी, डोली उचलत नाही नाही त्यो रोग आणला जायाचा. गाठ उठिवली जायाची. पटकीचा फोड आणला जायाचा. शेवटीबी मडंबी बशिवलं जायाचं आमचं जितंपणी….. आरं देवाला ठेवायची ती पोळी… मागणं असं आवाज यायचत. कुणाचा पायपोस कुणाला नसायचा, खोबरं, पोळीचा प्रसाद खाल्यालं ध्येनात नाही; खरं शिव्या तेवढ्या धेनी हाईत. अशा शिमग्याला व्हळी पूजन झाल्याव धुळवडीच्या दुसऱ्या दिवशीही व्हळी देवाजवळनं चपला-चपली घालून जायाचं नाही. सायकल किंवा गाडीवर बसूनसबी जायाचं नाही… नेम म्हंजे नेम. का ते ईचारायचं नाही. मग आम्ही राखंचा मांड मारीताव… चव्हाट्याजवळ, म्हादूबा हणमंताच्या देवळाजवळ, थड्याजवळ नाहीतर थेट देसायांच्या माळाला आमचा फुट्टा. असं गावात आठ-दहा फुट्टं. त्या जोराव पै-पावण्यासकट गावकऱ्यालाबी आडवीत व्हताव. त्याच्याकडनं चार-आठ आणे आणि जमलंतर एखादा रुपाया, पाच-पन्नास पैशांची लाच घ्यायचाव आणि द्यायचाव सोडून. व्हायचाव मोकळं.
नाही दिलं तर बोंबलून व्हट सूजवून घ घिताव. समोरच्याचं कान किर्रर करीताव. शिव्या दिवून ईदरणी, ईचकणी करीताव, काय सांगायचं राव एक-एक लाखाची शिवी. ‘लाकडाव लाकूड बाव्याचं चिकाट…… खालती पोळी वरती पोळी…. आमच्या गावाला चिकून्या पिकल्या…. खालती गोट्या वरती गोट्या….. आज पोळी उद्या नळी… दगडाव दगोड कोचिचा…’ एक काय दोन शिवी राव… हे ऐकून ते कटाळून द्यायचं पैसे आणि जायचं पुढं. परत तिथं जाऊनबी आडकायचं दुसऱ्या वाटमारीकरणाऱ्या फुट्यात. तेलाबी झक मारली आणि ह्या हुबल्याक गावात आलो असं व्हयाचं…. ‘आरं ये लेकानू, तिथं मागं त्यासनी दिल्यात की.. तुमासनी आणि कुठलं… पैसं काय झाडाला लागल्यात व्हय काय कुठनं काढायचं हाईत व्हय….?’
‘मग.. तेंचं त्यासनी. आमाला नगो व्हय. काय नाही. पैसे दिल्याशिवाय सोडायचं नाही रे… काठी धरा रे घट… हाईत.. हाईत रे खिशात पैसे. काढा.. काढा…’ कंचं काय बोलतय ते कळायचं नाही. ‘हेच्या बाईला हेच्या…’ तेबी आंगाव यायचं. झक मारीत पैसे टेकवून जायाचं. त्याशिवाय गत्यंतरच नसायची तेला. मग परत येताना तेनं दिलेलं पैसेच हा गेटपास आसायचा. त्योबी बिनधास्त यायचा गडी हालत डुलत. तसाच रूबाबात जायाचा…. ‘जाऊ द्या रे ह्यासनी. मगाशी दिल्यात लेकानू’ कोणतरी म्हणायचं. आमचं काठी, दोरीचं गेट आटूकमटूक वर जायाचं. शिमग्यात आमचा हाच धंदा… त्या धंद्यातनं जमलेली कमाई वाटून घिताव. नाहीतर गोळ्या, फुटानं, बिस्कुटं खाईताव. जर कुणी नॉन स्टॉप बोंबलायची पैज लावली तर ठो.. ठो.. व्हट फुटून रगात ईस्तवर न थांबता बोंबलताव. आसलं आरबाट बोंबलताच की ऐन शिमग्या-बिमग्यातच काय तेच्या मागं-म्होरंबी कुणीतरी खरोखरचं मेलं-बिलं तरबी तेचा पत्ता लागायचा नाही. म्हंजे शिमगा खरा की खोटा तेच कळायचं नाही. इतकं परवून शिमग्याचं सुख घेणं सुरू.
पाच-दहा पैशाची पैज जिंकण्यासाठी तर कहरच, दहा घरची धा जण त्यात आसली तरी शेवटी एखादं उरायचं माझ्यासारखं… पाच पैसे मिळतील म्हणून मी बेडकागत फुगायचा… खरं पैज लावणारा शेवटी त्यात बी छडा काढायचा… पाच पैसेबी मिळायचं नाहीत… फुकटच…. उदारीव बोंबालनं व्हायचं. हेटवून जाईतो… आजून तसंच हेटावल्यालं त्वांड घिवून बसलोय, पैज लावणारं थोरलं दादं हुडिकतोय…. मोगळातनं …
शाळेच्या मैदानात… दोन खोल्यांच्या मदी… माळाला… मांडाव… गावतच नाहीत ते गडी… तेंचीबी तिच तरा आगोदर झालीती ती बापडी पुढच्यासनी हुडिकत्यात. बसल्यात तीबी बोंबलत आमच्यावानी….ठो… ठो…
राब- राबत्या लमाण बायकांची लोकगीतं ऐकत… तेंचं नाचणं बघत… लाकडी भवरा फिरल्यागत… अशा या आठवणीतल्या व्हळीत अमंगळ ते सारं जळलं. शिव्या, शेणी, कचरा आणि अशात मंगळही मागं पडलं. नकावडं आसताना चं हे चित्र. त्या रात्रीत व्हळीची सोंगं निघायचीत. ती काढताना चाळ घालून गल्लीतनं पळणारी पोरं बैल, नवरा-नवरी, शेणीची दुरडी, मजेशीर नावं घेणं अशी खोटी सोंगंबी नदरं पडायचीत. बोटाव मोजाय येतील एवढे पैसे मजा करून जमायचं. पैशासकट यातलं काय राहिलय आता गावात? माणूसच पळालाय हातात प्वॉट घेऊन. चाकरमानी होऊन. दूर देश-विदेशात, सवड मिळाली हो… दिली तर आठवणी घेऊन परतण्यासाठी… नाहीतर त्याच आठवणीवर जगण्यासाठी.
प्रदूषणमुक्त होळी बघत. पर्यावरण जपत… आग, वणव्यावर नियंत्रण मिळवत… होळीची पोळी, नारळ, शेणी, लाकडं, पैसा- आडका.. असं काय-बाय जे गरजुंना आवश्यक ते दान करूया म्हणत. नवा विचार रूजवत… नव्या विचारासाठी ही बोंबंची बाराखडी ठो… ठो… मांडली या मांडावर…. स्पीच थेरपी… तोंड- मनगटाचा व्यायाम व्हावा म्हणून… एक-एक टिकावा… जगणं लांबचा पल्ला गाठीत म्होरं व्हावं म्हणून.. दाठलेला दुःखी कंठ मोकळा करीत…. आनंदाची पालखी वाहत… भोई होत… पालखीसवे नाचत… परस्परांची गळाभेट घेत…. मिरवत…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.