ललित साहित्यात बंजारा संस्कृती ही शिव्यांची संस्कृती असल्याचे म्हटले आहे. भुजंग मेश्राम यांच्या “उलगुलान’ काव्यसंग्रहातील कवितांत तसा उल्लेखही आहे. संशोधकांनी यावर कोणते मत मांडले आहे? बंजारा समाजात कोणत्या शिव्या प्रचलित आहेत? वाचा सविस्तर…
-राजेंद्र कृष्णराव घोरपडे
बंजारा संस्कृती, त्यातील साहित्य, दंतकथा, लोकगीते, लोकनृत्य, लोकनाट्य, उखाणे, म्हणी इतकेच काय; या समाजातील शिव्या काय आहेत, यावर बरेच संशोधन झाले आहे. या संशोधनाने या समाजातील चालीरीती, परंपरा यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ललित साहित्यात तर बंजारा संस्कृतीला शिव्यांची संस्कृती असे म्हटले आहे. भुजंग मेश्राम यांच्या “उलगुलान’ काव्यसंग्रहातील कवितांत तसा उल्लेखही सापडतो. बंजारा समाजाचे अभ्यासक प्रा. भाऊसाहेब राठोड यांनी शोधनिबंध सादर केला आहे. यामध्ये त्यांनी या सर्व बाबींवर प्रकाश टाकला आहे.
संशोधकांच्या मते, बंजारा समाजामध्ये इतर समाजांप्रमाणेच शिव्या देण्याची पद्धत आहे. होळीच्या सणाला तर अतिबीभत्स शिव्या देण्याची प्रथा आहे. दैनंदिन व्यवहारातही शिव्यांचा वापर होतो. यामध्ये साणो (शहाण्या), साळ्या (मेहुण्या), हेलरे तारी (हात्तेच्या), थूत्तारी याडीन् (हात्तेच्या मायला) अशा शिव्यांचा समावेश होतो. तसे इतर समाजातही अशाच पद्धतीच्या शिव्यांचा वापर दैनंदिन जीवनात होतो. यामुळे संशोधकांनी बंजारा संस्कृतीला शिव्यांची संस्कृती म्हणण्यावर आक्षेप नोंदविला आहे. शिव्यांची संस्कृती म्हणणे अन्यायाचे होईल, असे संशोधकांना वाटते. प्रा. राठोड यांनी बंजारा लोकसाहित्य संकलित केले आहे. हे करताना त्यांना बंजारा बोलीत अशा शिव्या पुरातन काळापासून वापरल्या जात होत्या असा कोणताही पुरावा किंवा खुणा आढळल्या नाहीत. म्हणजेच या शिव्या अन्य भाषातून अनुकरणातून आल्याचे दिसते.
शिवी हे शापाचेच रूप
संशोधकांच्या मते, शिवी हे शापाचेच रूप आहे. बंजारा भाषेत शिवी या शब्दाला गाळी म्हटले जाते. हा शब्द संस्कृतमधील गाली यापासून आला आहे. बंजारा भाषेत शियासराप असाही शब्दप्रयोग केला जातो. तो शिव्याश्राप या शब्दाचे अपभ्रंशरूप असल्याचे आढळते. बंजारा भाषेतील काही शिव्या या शापसदृश आहेत. त्यात समोरच्याचा मानभंग, अप्रतिष्ठा, अकल्याण असा हेतू असतो. त्यात लैंगिक अश्लीलता निश्चितच नसते.
बंजारा समाजातील विविध प्रकारच्या शिव्या अशा –
शापसदृश शिव्या –
तारो सत्यानाश व्हेजाव
तारे पुतेन रांध
तारेमा विचडो पड
तापर बुंबडी पड
व्यंगदर्शक सौम्य स्वरुपाच्या शिव्या –
जसे निकाड्या (बिन दाढीमिशाचा)
गलवाणीसे मुंडेरो (गुळवणीसारख्या तोंडाचा)
संशोधकांची शिव्यांबाबतची मते –
- तारो सत्यानाश व्हेजाव म्हणजे तुझा सत्यानाश होवो. बंजारा समाज हा सत्यप्रिय, सत्याला महत्त्व देणारा, सत्यवचनी असा आहे. लोकसाहित्यात या संदर्भातील दाखले मिळतात. यावरूनच सत्याचा नाश होवो, अशी ही शिवी निर्माण झाली आहे. सत्याचा नाश म्हणजे बेअब्रू, खोटारडा, पत नसलेला, दरिद्री, अनारोग्य, अवदशा अशा अर्थाने आहे.
- तारे पुतेन रांध म्हणजे तुझ्या पुत्राला शिजविलं असा अर्थ आहे. संशोधकांच्या मते, मराठीत अशा पद्धतीची पर्यायी शिवी नाही. ही शिवी बंजारा समाजात कोठून आली, यावर संशोधनाकांनी दोन मते मांडली आहेत. बंजारा समाज हा मूळचा राजस्थान, मेवाड, नेमाड भागाकडचा आहे. नेमाडमध्ये आदिवासी लोकांत नरमांस भक्षण करण्याची पद्धत होती असे उल्लेख सापडतात. यातून ही शिवी आल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. बंजारा समाजात मातीच्या हंडीमध्ये मांस शिजवण्याची प्रथा होती. अशा या मांसाहारी समाजाला रागभावना व्यक्त करण्यासाठी अति प्रेमाच्या, कुलदीपक, वंशवर्धिष्णू पुत्राला रांधण्याची कल्पना सुचणे स्वाभाविक आहे, अशी दुसरी शक्यता संशोधकांनी मांडली आहे.
- “तारेमा विचडो पड’ म्हणजे तुझ्यात विरह पडो किंवा तुला विरह घडो असा या शिवीचा अर्थ आहे. संशोधकांच्या मते, बंजारा समाजामध्ये सधवेला “जलम जोडा कोसन जायदं’ म्हणजे “जन्मजोडा कडीला जावो’ किंवा “जोडा जन्माला जावो’ असा आशीर्वाद देतात. या आशीर्वादाच्या नेमकी उलट ही शिवी आहे. तसेच बंजारा समाजातील “पेलो जोडा, सोनेरी तोडा’ म्हणजे “पहिला जोडा सोन्याचा तोडा’ या म्हणीची नेमकी उलटी प्रतिक्रिया म्हणजे ही शिवी आहे.
- “तापर बुंबडी पड’ म्हणजे तुझ्यावर बोंब पडो अशी ही शिवी आहे. बंजारा समाजात होळीचा कालखंड सोडता इतर वेळी बोंब मारणे निषिद्ध मानले जाते. संकटग्रस्त व्यक्ती मदत त्वरेने मिळावी यासाठी बोंब मारतो. अशी बोंब मारण्याची वेळ तुझ्यावर येवो, असा अर्थ या शिवीतून सूचित होतो, असे संशोधकांचे मत आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.