June 19, 2024
Islam Known and Unknown book by Abdul Kadar Mukadam review
Home » इस्लाम समजून घेण्यासाठी उपयुक्त पुस्तक
मुक्त संवाद

इस्लाम समजून घेण्यासाठी उपयुक्त पुस्तक

इस्लाम या धर्माबद्दल जगभरातील बुद्धिवादी विचारवंतांमध्ये तसेच सर्वसाधारण माणसांमध्येही अनेक गैरसमज आहेत. ते गैरसमज दूर होण्यासाठी तसेच इस्लाम धर्म समजून घेण्यासाठी मुस्लीम समाजातील एक पुरोगामी विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांनी एक ग्रंथ लिहिला आहे. ग्रंथाचे नाव आहे ‘इस्लाम-ज्ञात आणि अज्ञात’ हा ग्रंथ लेखकाच्या अनेक वर्षांच्या अभ्यासातून सिद्ध झाला आहे.

अशोक बेंडखळे

इस्लाम धर्माचे प्रेषित महंमद पैगंबर यांच्या जन्मापासून ग्रंथाची सुरुवात होते. त्यानंतर त्यांच्या साक्षात्कारामधून इस्लाम धर्माचा उदय कसा होतो ते विस्ताराने आले आहे. पुढे इस्लामने घडवलेली सामाजिक क्रांती, इस्लामचा अर्थविचार, शरियत (आचारसंहिता), इस्लामी संस्कृती, युद्ध परंपरा, सनातनी परंपरा अशा लेखांमधून खूप वेगळी माहिती समोर येते. मला यातील महिलांचे स्थान, इस्लाम आणि कुटुंब नियोजन तसेच कुराण आणि बुरखा हे तीन लेख खूप महत्त्वाचे वाटतात.

‘जन्म पैगंबराचा आणि इस्लामचा’ या प्रकरणात महंमद पैगंबरांविषयी तसेच इस्लाम धर्माच्या स्थापनेविषयी खूप उपयुक्त माहिती मिळते आणि त्यात पैगंबरांविषयी कुठेच उदात्तीकरण केलेले नाही हे विशेष. मक्केतील कुरैश टोळीत महंमद बाळाचा जन्म झाला (एप्रिल 570). मुलाचे बालपण आई-वडिलांविना शोकात्म झाले. शेळ्या-मेंढ्यांना चरण्यासाठी नेण्याचे काम करीत असताना या मुलाला अथांग अवकाशाचा वेध घेण्याचा छंद जडला. तो मक्केतील खदिजा नावाच्या व्यापारी विधवेकडे नोकरीस लागला. पुढे दोघे विवाहबद्ध झाले. विवाहाने जीवनाला स्थैर्य आले. बिबी खदिजानेही त्यांना शेवटपर्यंत समर्थपणे साथ दिली.

नोकरीच्या निमित्ताने झालेल्या प्रवासात महंमद अब्दुल्ला यांना समाजातील श्रीमंत आणि कष्टकरी यांच्यामधील विरोधाभास दिसला. त्यांनी हिरा पर्वतातील गुहेत साधना सुरू केली आणि इ. स. 610 ला रमझान महिन्याच्या 26 – 27 तारखेला रात्री दैवी साक्षात्कार झाला आणि अल्लाचा पहिला संदेश त्यांच्या तोंडून बाहेर पडला. हाच इस्लामच्या जन्माचा क्षण ठरला. आणि महंमद अल्लाचे पैगंबर (प्रेषित) झाले.

इ. स. 632 मध्ये पैगंबरांचे निधन होईपर्यंत कुराण अवतीर्ण झाले होते; पण ग्रंथरूपात नव्हते आणि मग पैगंबरांच्या तोंडून बाहेर पडलेले श्‍लोक मुखोद्गत असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना एकत्र आणून त्यातून कुराणाचे संकलन करण्यात आले. यात बिबी खदिजा यांचाही मोठा वाटा होता. ‘क्रांतिपर्व’ या प्रकरणात कुराणाचे आध्यात्मिक तत्त्वज्ञान दिले आहे. कुराणात एकूण 114 अध्याय असून, त्यात 6236 श्‍लोक आहेत, असे सांगून पहिल्या अध्यायात सात ओळींचे सात श्‍लोक आहेत आणि त्यात संपूर्ण कुराणाचे आध्यात्मिक तत्त्वज्ञान व जीवनमूल्ये आली आहेत, हे स्पष्ट केले आहे. इस्लामी परंपरेप्रमाणे अल्लाह निराकार; पण सगुण आहे आणि त्यातून आध्यात्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सांगितले आहे. पहिल्या अध्यायात तीन गुणधर्मांचा उल्लेख आहे. ते म्हणजे रब (निर्मिक वा नियंता) रेहमत (करुणा) आणि अदालय (न्याय) हे होते.

महंमद पैगंबरांनी 22 वर्षांच्या काळात (इ. स. 610 ते 632) अरबस्तानातील टोळीवजा समाजात समग्र क्रांती घडवून आणली आणि त्याच्या केंद्रस्थानी शोषित, वंचित माणूस होता. इ. स. 620 ते 632 या 12 वर्षांमध्ये त्यांना नवसमाजासाठी चार युद्धे करावी लागली. पहिल्यात पैगंबरांना माघार घ्यावी लागली. मात्र, नंतरची तीन युद्धे त्यांनी जिंकली. शेवटचे मक्केचे युद्ध तर रक्तहीन संघर्ष होता. श्रीमंत व्यापार्‍यांनी इस्लामचा स्वीकार केला. त्यांना एकेश्‍वरवादाची दीक्षा दिली आणि आध्यात्मिक क्रांती घडवून आणली. त्यातून समता व न्याय या मूल्यांचा एकसंघ समाज निर्माण केला. हे सगळे ‘सामाजिक क्रांती’ या प्रकरणात आले आहे.

समाजातील श्रीमंत व्यापारी आणि गरीब कष्टकरी यांच्यात ताणतणाव होऊन स्फोटक परिस्थिती होऊ नये म्हणून पैगंबरांनी इस्लामच्या आर्थिक विचारांची पायाभरणी केली. त्याचा ऊहापोह ‘इस्लामचा अर्थविचार’ या प्रकरणात येतो. न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी इस्लामने संपत्ती संचय निषिद्ध मानले आणि संपत्तीच्या न्याय्य वाटपासाठी दानधर्म आणि जकात यांना अर्थविचारामध्ये महत्त्वाचे स्थान दिले. यातून पुढे आधुनिक बँकांचा प्रवेश झाला आणि इस्लामी बँकांचा उदय झाला.

इस्लामपूर्व काळात अरबांच्या समाजरचनेचे तीन घटक होते. ते म्हणजे कुटुंब, कुटुंबाचा मिळून कबिला (कौम) आणि कबिल्यांची टोळी. पैगंबरांनी आचारसंहिता (शरियत) आणि न्यायशास्त्र (फिक्) निर्माण करून समाजाला नियम-कायद्याच्या चौकटीत बसवले आणि सुसंस्कृत करण्याचा कसा प्रयत्न केला ते ‘शरियत आणि फिक्’ या प्रकरणात येते. पैगंबरांनी घालून दिलेल्या तत्त्वानुसार इस्लामी न्यायशास्त्राची कुराण, हदीस (पैगंबरीय परंपरा) इज्मा (सहमती) आणि कयास (तर्कसंगत निष्कर्ष) अशी चार साधने मानली जातात. तीही या प्रकरणात विस्ताराने आली आहेत.

प्रेषित पैगंबरांनंतर ‘खलिफा’ संस्था आली. तीन खलिफांच्या कार्यकाळानंतर (इ. स. 661 ते 1171) इस्लामची सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती झाली. इस्लामी विचारवंतांनी ग्रीक भाषेतील ज्ञानभांडार अरबी भाषेत अनुवादित केले. ते पुढे युरोपमध्ये गेले. इस्लामी तत्त्वज्ञानाचा पाया अल-किंदी या तत्त्वचिंतकाने घातला. (इ. स. 870) ही ज्ञानसाधनेची परंपरा अनेक शतके सुरू होती. इस्लामबरोबर भारतात आलेल्या अभ्यासक-संशोधकांनी संस्कृत भाषा शिकून त्यातील समृद्ध ज्ञानभांडार अरबी आणि पर्शियन भाषेत नेले. त्याचबरोबर इस्लामी स्थापत्यकलेचा भारतात प्रवेश होऊन नवी हिंदू-इस्लामी शैली विकसित झाली. त्यातून फतेहपूर सिक्री हे शहर व जगप्रसिद्ध ताजमहल यांची निर्मिती झाली. अशी मौलिक माहिती ‘इस्लामी संस्कृतीची वाटचाल’ या प्रकरणात येते.

‘युद्ध परंपरा आणि जिहाद’ या प्रकरणात इस्लामच्या युद्ध परंपरेची बीजं सांगितली आहेत. कुराणाच्या श्‍लोकात आल्याप्रमाणे पैगंबर मदिनाला गेल्यानंतर मक्केमधील दुर्बल अनुयायांवर अत्याचार झाले. तेव्हा अन्याय, अत्याचाराविरुद्ध युद्ध करणे अल्लाला मान्य आहे, असा उल्लेख येतो. कुरैश टोळीकडून झालेल्या अनेकांच्या हत्त्येनंतर शांतता राखण्यासाठी पैगंबरांनी दहा हजार सहकार्‍यांसह मक्केत येऊन विना रक्तपात शांतता प्रस्थापित केली. (इ. स. 630) जिहादचा अर्थ चुकीच्या पद्धतीने धर्मयुद्धाशी कसा लावला गेला, त्याचे स्पष्टीकरण लेखकाने दिले आहे. चौदाव्या शतकापासून इस्लामी जगतात कुराणाची उदारमतवादी परंपरा संपून नवी उग्रवादी परंपरा आली आणि आक्रमक सनातनीपणा आणि हिंसाचाराचे समर्थन आले. त्यामुळे समाजाला एक प्रकारची खुंटितावस्था आली, हे दिलेले मत महत्त्वाचे आहे.

इस्लाम धर्माबाबत गैरसमज दूर होण्याच्या दृष्टीने या पुस्तकातील महिलांचे स्थान, इस्लाम आणि कुटुंब नियोजन तसेच कुराण आणि बुरखा ही तीन प्रकरणे महत्त्वाची आहेत. महिलांचे स्थान सांगताना लेखक इस्लामने प्रथम स्त्रियांना अनेक हक्क आणि अधिकार दिले, असे प्रतिपादन करतो. या प्रकरणात काही वेगळी माहिती मिळते. ती म्हणजे एका बैठकीत तलाक तीनदा उच्चारून घटस्फोट देणं मुस्लीम कायद्याला मान्य नाही. इस्लामी धर्मशास्त्रात बुरखा पद्धतीचा कुठेही उल्लेख नाही. इस्लामने वडिलांच्या मालमत्तेत स्त्रियांना वारसा हक्क तसेच व्यवसायाचा हक्क दिला आणि मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला. चौदाव्या शतकात उलेमा (धर्मपंडित) संस्था आली आणि स्त्रियांवर बंधने आली. इस्लाम आणि कुटुंब नियोजन या प्रकरणातही विवाह हा पवित्र करार आहे आणि त्याचे पावित्र्य राखले पाहिजे. तसेच दोन मुलांमध्ये दोन वर्षांचे अंतर राखले पाहिजे, असा कुराणाचा आग्रह असून त्याने कुटुंब नियोजनाचाही पुरस्कार केला आहे, असे सांगितले आहे.

पाकिस्तान, जॉर्डन याप्रमाणे अनेक मुस्लीम राष्ट्रांनी कुटुंब नियोजन राष्ट्रीय धोरण स्वीकारले आहे, अशी महत्त्वाची माहिती लेखक देतो. बुरखा पद्धतीविषयी कुराणाच्या श्‍लोकात स्त्रियांनी रूप आणि अलंकार यांचे प्रदर्शन घडवू नये, असे आहे. मात्र, त्यांनी नखशिखांत बुरखा घेऊन आपला देह झाकावा, याला कसलाच आधार नाही. स्त्रियांनी विनयशील वेशभूषा करावी, अशी कुराणाची रास्त अपेक्षा आहे. मात्र, इस्लामी सत्ताधार्‍यांनी आणि धार्मिक नेतृत्वाने रूढी आणि परंपरा धर्माच्या नावाखाली निर्माण केल्या हे यातून लक्षात येते.

प्रस्तावनेत लेखिका संजीवनी खेर यांनी म्हटल्याप्रमाणे केवळ इस्लामबद्दलचे गैरसमज दूर करायला नाही, तर इस्लाम समजून घ्यायला या पुस्तकाचा फार मोठा हातभार लागणार आहे. एकूण खूप अभ्यासातून लिहिलेले हे पुस्तक इस्लाम समजून घ्यायला उपयुक्त ठरणारे आहे.

पुस्तकाचे नाव – इस्लाम-ज्ञात आणि अज्ञात.
लेखक – अब्दुल कादर मुकादम.
प्रकाशन – अक्षर प्रकाशन.
मुखपृष्ठ : सतीश भावसार.
पृष्ठे : 216. मूल्य : 300 रुपये

Related posts

शिक्षित लोकप्रतिनीधी ?

ग्रामीण जीवनाचा समर्थपणे पट उलगडणारा ” उसवण ” कथासंग्रह

कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406