April 27, 2025
IQAir 2025 report highlights India's fifth position in global air pollution rankings, emphasizing urgent need for action.
Home » हवा प्रदूषणात भारताची स्थिती चिंताजनकच !
विशेष संपादकीय

हवा प्रदूषणात भारताची स्थिती चिंताजनकच !

विशेष आर्थिक लेख

स्वित्झर्लंडस्थित आयक्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात भारताचा पाचवा क्रमांक आहे. छाड, बांगलादेश, पाकिस्तान व डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो हे जगभरातील पहिले चार सर्वाधिक प्रदूषण असलेले देश आहेत. त्या खालोखाल भारताचा नंबर लागत असला तरी आजच्या घडीला आपल्या देशातील हवेचे प्रदूषण चिंताजनक आहे. भगीरथ प्रयत्न करून त्यावर मात करण्याची आवश्यकता आहे. अहवालाच्या निमित्ताने या समस्येचे केलेले विवेचन…

प्रा. नंदकुमार काकिर्डे

हवेची गुणवत्ता मोजण्याची उपकरणे तयार करणाऱ्या स्वित्झर्लंडमधील आय क्यू एअर या कंपनीने 2024 या वर्षाचा जागतिक हवा प्रदूषण अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्याचबरोबर इंग्लंड मधील ‘अवर वर्ड इन डेटा’ या ऑक्सफर्ड विद्यापीठाची संबंधित असलेल्या संस्थेनेही जागतिक हवा प्रदूषणा बाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. आजच्या घडीला दरवर्षी काही लाख व्यक्ती, प्राणी व पक्षी हवेच्या प्रदूषणाने मृत्यू पावतात. जगामध्ये सर्वात प्रदूषित असलेला देश छाड हा आहे. त्यानंतर बांगलादेश व पाकिस्तान यांचा क्रमांक लागतो. भारतापाठोपाठ ताजिकिस्तान, नेपाळ, युगांडा, रेवांडा, बुरुंडी, नायजेरिया व इंडोनेशिया या देशांचा उल्लेख सर्वाधिक हवेचे प्रदूषण असलेले देश म्हणून या अहवालात केला गेला आहे. हे सर्व विकसनशील देश आहेत.

भारतातील वायु प्रदूषण अहवालाचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की आपली स्थिती खूप चिंताजनक होताना दिसत आहे. भारतात दरवर्षी सुमारे 15 लाख मृत्यू केवळ वायू प्रदूषणामुळे होतात. विविध उद्योगांमुळे हवेचे प्रदूषण सातत्याने वाढत असते. वाहतूक क्षेत्र,औद्योगिक क्षेत्र, कोळशापासून वीज निर्मिती, कृषी क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, देशभरातील कचरा, जहाज उद्योग, स्थानिक व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवा क्षेत्र व रसायने म्हणजे सॉल्व्हन्टस या प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. सॉल्व्हन्ट्समध्ये विविध रंग उत्पादन कंपन्या, स्वच्छतेसाठी वापरली जाणारी उत्पादने आणि केमिकल उत्पादन प्रकल्प यामुळे प्रदूषणात भर पडते.

भारताची राजधानी दिल्ली हे शहर तर सर्वाधिक प्रदूषण निर्माण करणारे शहर आहे. अर्थात भारतातील सर्व शहरे व ग्रामीण भागांमध्येही प्रदूषणाचे प्रमाण जागतिक आरोग्य संस्थेने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक तत्वांपेक्षा जास्त आहे. एका अर्थाने भारतातील वायु प्रदूषण ही महत्त्वाची वाढती चिंता असून त्याचा प्रतिकूल परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर व त्यांच्या कल्याणकारी योजनांवर होताना दिसत आहे. गेल्या काही दशकातील वेगाने वाढणारे शहरीकरण, औद्योगीकरण व लोकसंख्या वाढीमुळे प्रदूषकांचे उत्सर्जन सातत्याने वाढत असून त्यामुळे हवेची गुणवत्ता सातत्याने खराब होताना दिसत आहे. बायोमास म्हणजे वनस्पती व प्राणी तसेच इतर जैविक पदार्थांचे रूपांतरण करून तयार केलेले इंधन व कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू असे जीवाश्म इंधन याचा मर्यादे बाहेर जाऊन केलेला वापर हे प्रदूषणाचे प्रमुख अन्य स्त्रोत आहेत.

वायु प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांमध्ये श्वसनाच्या समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत. त्यामध्ये खराब हवेच्या संपर्कात आल्याने दमा व क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सी ओ पी डी) यासारख्या श्वसनाच्या समस्या उद्भवल्याची आकडेवारी मोठी आहे. त्याचप्रमाणे हृदय व रक्तवाहिन्या संदर्भातील रोगांमध्ये व्यापक प्रमाणावर वाढ झालेली असून नागरिकांच्या रक्तवाहिन्या संबंधी रोगांचा धोका गेल्या काही वर्षात वाढलेला आहे.

हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूटने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भारतात अकरा लाखापेक्षा जास्त अकाली मृत्यू होत असून त्याला वायू प्रदूषण कारणीभूत आहे. दिल्ली खालोखाल मुंबई, कोलकत्ता, बंगलोर व पुण्यासारख्या शहरांमध्येही वायू प्रदूषणाचे प्रमाण निकषांपेक्षा जास्त आहे. या वायू प्रदूषणाचा सर्वात मोठा धोका लहान मुले, वृद्ध नागरिक आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने आजारी असलेले नागरिक वायू प्रदूषणाच्या प्रतिकूल परिणामांना जास्त संवेदनशील असल्याने त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण वाढलेले दिसते. हवेचे प्रदूषण जास्त वाढण्यासाठी सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, ब्लॅक कार्बन, मिथेन, अमोनिया यांचा मोठा वाटा आहे. वाहनांचे उत्सर्जन,औद्योगिक प्रक्रिया, शेतकऱ्यांनी पिके जाळल्याने हवेची गुणवत्ता कमी होते.

तसेच कोळशावर चालणारे वीज प्रकल्प, देशातील प्रत्येक शहरात व ग्रामीण भागात कचऱ्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रिया व बायोमास जाळल्यामुळे शहरी, निमग्रामीण भागात प्रदूषण होताना दिसत आहे. यामुळे मानवी आरोग्याला हानी पोहोचवणारे प्रदूषक उत्सर्जित होतात. अनेक वेळा थेट प्रदूषण किंवा पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) म्हणजे कण प्रदूषण हवेत आढळणारे घन कण व द्रव बिंदू यांचे मिश्रण होय. त्याची होणारी अपरिमित निर्मिती तसेच ओझोन निर्मिती यामुळे हवेचे प्रदूषण जास्त होताना दिसते. या अहवालातील आकडेवारीनुसार 2021 या वर्षात जगभरात 80 लाख मृत्यू केवळ हवेच्या प्रदूषणामुळे झालेले होते.

एकंदरीत हवेच्या प्रदूषणाच्या बाबतीत आपल्याकडे उच्च स्तरावरून व्यापक प्रमाणावर उपाययोजना केल्या जात असूनही अनेक शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण मार्गदर्शक मापदंडापेक्षा जास्त आहे. पुणे व राजकोट यासारख्या शहरांमध्ये वाहने व बांधकाम प्रदूषणामुळे संपूर्ण शहर प्रदूषित झाल्याची भावना तेथे कोठेही प्रवास करताना आढळते. यामध्ये उपाययोजना म्हणून स्वच्छ ऊर्जा किंवा हरित अक्षय ऊर्जा निर्मिती व आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर महत्त्वाचे आहे. त्यात सौर, पवन ऊर्जा हे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. विद्युत वाहनांचा वाढता वापर त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचप्रमाणे कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक यंत्रणा वापरणे, ऊर्जा कार्यक्षम घर व उद्योग बनवणे व कचरा व्यवस्थापनामध्ये व्यापक सुधारणा करणे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

जगातील अनेक देशांनी त्यांचे हवेचे प्रदूषण अशा उपाययोजनांद्वारे लक्षणीय रित्या कमी केलेले आहे. वापरात नसताना दिवे बंद करणे, कमी वीज वापर करणे किंवा ऊर्जा बचत करणारे फ्लोरोसंट दिवे वापरणे, नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे त्यांचा पुनर्वापर वाढवणे, पर्यावरणासाठी प्लास्टिक उत्पादनांचा वापर हानिकारक ठरत असल्याने त्याचा वापर कमी करणे, जंगलातील आगी, धूम्रपानाच्या सवयीमुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होते, हवेची गुणवत्ता बिघडते व आरोग्याला हानी पोहोचते. याबाबत समाजामध्ये आजही आवश्यक तेवढी जागरूकता निर्माण झालेली नाही. उलट पक्षी तरुण वर्ग व युवतींमध्ये धुम्रपानाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

वातानुकूलित यंत्रणांच्या ऐवजी पंख्यांचा वापर वाढवला पाहिजे. सण व लग्न समारंभामध्ये फटाक्यांचा होणारा वापर हा वायू प्रदूषणाच्या सर्वात मोठ्या कारणांपैकी एक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशात वनीकरणाची सर्वत्र अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे याबाबतचे कायदे केंद्र व राज्य शासनाने केलेले आहेत पण त्याची अंमलबजावणी मात्र गंभीरपणे केली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच हवेच्या प्रदूषणाबाबतीत भारताची स्थिती चिंताजनक होत असून आपण वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर आपल्या पुढील पिढ्यांचे भवितव्य आपणच धोक्यात आणत आहोत. यासाठी गांभीर्याने राष्ट्रीय मोहीम राबवली गेली पाहिजे.

(लेखक पुणे स्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!