‘ विदर्भात आठवडाभर ढगाळ वातावरणाची शक्यता ‘
सोमवार ( दि.६ मे ) पासून पुढील आठवडाभर म्हणजे सोमवार ( दि.१३ मे) पर्यन्त संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड अश्या १९ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.
उर्वरित महाराष्ट्रातील मुंबईसह कोकण तसेच खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली अश्या १७ जिल्ह्यात मात्र ढगाळ वातावरणाची शक्यता नाही.
रात्रीचा उकाडा –
खान्देशसहित संपूर्ण मध्य-महाराष्ट्र, व मराठवाड्यातील १८ जिल्ह्यात आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे मंगळवार (दि.७ मे पर्यन्त) रात्रीचा असह्य उकाडा जाणवेल.
उष्णतेची लाट सदृश स्थिती-
महाराष्ट्रातील संपूर्ण विदर्भ व खान्देश तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड अश्या २३ जिल्ह्यात आजपासुन पुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार (दि. ९ मे ) पर्यन्त दुपारचे कमाल तापमान भाग बदलत ४० ते ४२ तसेच ४२ ते ४५ अंश सेल्सिअस दरम्यान राहून ह्या ठिकाणी उष्णतेच्या लाट सदृश्य स्थिती जाणवेल, असे वाटते.
मागील महिन्यातील आढावा अवकाळीचा-
गेल्या संपूर्ण एप्रिल महिन्यात विशेषतः महिन्याच्या उत्तर्धातील शेवटच्या काही दिवसातील माध्यमे व इतरांद्वारे अवकाळीबाबत दिल्या गेलेल्या अंदाजातील कथनी आणि प्रत्यक्षातील निसर्गातील घडणी पाहता ऐन रब्बी पीक काढणीच्या काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे इशारे घाबरवणारेच ठरलेत, असे वाटते. थोडक्यात शेतकऱ्यांनीही आता ह्यापुढे अश्या बातम्यांची नोंद ठेवुन मागोवा घेणे गरजेचे ठरु लागले आहे, असे वाटते. कारण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा अवकाळीबाबतची अशीच ओरड ऐकू येईल. ठिक आहे, कि आता, पीक काढणीचा काळ उरकलाय, पण ही घाबरवणी काही थांबत नाही, असेच वाटतेय सध्या काय सांगायचे ते सांगू देत, पण, त्या बातम्या अवश्य अभ्यासाव्यात. असे वाटते.
माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.