April 25, 2025
Atul Pethe’s take on Ajay Kandar’s Hatti Ilo poem, reflecting on contemporary political unrest.
Home » अतुल पेठे यांनी ‘हत्ती इलो ‘ दीर्घ कवितेची घेतलेली नोंद !
मुक्त संवाद

अतुल पेठे यांनी ‘हत्ती इलो ‘ दीर्घ कवितेची घेतलेली नोंद !

आजच्या राजकीय उन्मादाच्या संदर्भाने विख्यात रंगकर्मी अतुल पेठे यांनी साहित्यिक अजय कांडर यांच्या ‘हत्ती इलो ‘ दीर्घ कवितेची घेतलेली ही नोंद!

‘कोकणात उन्मत्त हत्तीचा घुडगूस’ ही नित्याची घटना आहे. काही वर्षांपूर्वी कोकणात दोडामार्ग इथे हत्ती घुसले होते. ते बेभान झाले होते. कोकणच्या लोकांना त्यांनी त्रस्त केले. जगणे नकोसे झाले इतके छळले. या घटनेवर कणकवली येथे राहाणारा कवी अजय कांडर यांनी ‘हत्ती इलो’ ही दीर्घ कविता लिहिली. खरं तर कणकवलीत नाटक करायला गेलो असता अजयला मी नाटक लिहायला सांगितले होते पण अजयने दीर्घ कविता लिहिली. ही कविता म्हणजे रूपक आहे. उन्मत्त हत्तीचे, दडपशाहीचे आणि भेदरलेल्या जनतेचे ! ही कविता विलक्षण आहे.

हत्ती हा प्राणी आपल्या सर्वांच्या जगण्यात अनेक रूपके घेऊन येतो. श्री चक्रधर स्वामींची ‘सात आंधळे आणि हत्ती’ ही थोर रूपक लीळा आहे. यात हत्ती आपल्या डोळ्यात न मावणारी जगण्याची भव्यता घेऊन येतो. संपूर्ण हत्ती जसा कळत नाही तसेच आयुष्याचेही आकलन होत नाही. आपले सारे आयुष्य अस्तित्वाचा अर्थ शोधण्यात जाते. सरतेशेवटी जे हाती लागते तो कवडसा असतो. हा त्याचा गाभा.

हत्ती हा मुख्य व्यक्तीरेखा असलेली कादंबऱ्या आणि नाटकेही कमी नाहीत. मला तर माझ्यावर लहानपणी पाहिलेल्या नानासाहेब शिरगोपीकर यांच्या ‘शाब्बास बिरबल शाब्बास’ या नाटकामधल्या झुलत्या हत्तीने गारूड केले होते. हा हत्ती नंतर भेटला मोहित टाकळकर यांच्या ‘गजब कहाणी’ या नाटकात ! जोसे सारामागो या पोर्तुगीज लेखकाची ही मूळ कादंबरी. तिचे नाट्यरूपांतर प्रदीप वैद्य यांनी केले होते. त्यातील गीतांजली कुलकर्णी आणि नचिकेत पूर्णपात्रेचा अभिनय आणि मोहितचे सौंदर्यवादी दिग्दर्शन न विसरता येण्यासारखे आहे.

आता हा हत्ती रंगमंचावर परत पाहिला. गोव्याचा तरुण दिग्दर्शक केतन जाधव दिग्दर्शित आणि वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान निर्मित ‘इलो’ या नाटकात हा अवतरला आहे. या नाटकाचे प्रथम नाव ‘हत्ती घूस रेडा गेंडा’ असे होते. ते जास्त समर्पक होते असे माझे मत. या नाटकाचे लेखक तरुण नाटककार योगेश्वर बेंद्रे असून त्यांनी या नाटकाला सीरियन नाटककार सादालाह वानौस यांच्या ‘The Elephant, Oh King of the Time’ या नाटकाचा आधार आहे असे सांगितले. मला मात्र हे नाटक कवी अजय कांडर यांच्या कवितेच्या अधिक जवळ असणारे वाटले, किंवा असे म्हणू की दोन्हींचा उत्तम संगम यात आहे. या नाटकात उन्मत्त हत्तीनी मांडलेला छळवाद येतो. अंकुश नसलेले आजचे राज्यकर्ते आणि विवेक हरवलेली आजची समाजस्थिती याचे भेदक दर्शन या निमित्ते होते.

केतनकडे स्वतःचे राजकीय तीव्र नाट्यविधान आहे. केतनच्या नाटकात गोवेकर संस्कृती आणि संगीत येते. मला त्याचे वैशिष्ट्य हे वाटले की त्याच्या जवळ आगळीवेगळी कल्पनाशक्ती आहे. नाटकाला कल्पनाशक्तीचीच सर्वात जास्त गरज असते. ती केतनजवळ आहे याचे दर्शन ‘इलो’ मध्येही होते. या नाटकात त्याने दाखवलेला हत्ती मी आता कधीही विसरू शकत नाही. तो काय आहे ते लोकांनी अनुभवावे म्हणून इथे सांगत नाही. हे नाटक महत्वाचे आहे. त्यावर अधिक वेळ घालवून कसून तालमी झाल्यास नटसंच आणि पर्यायाने हे नाटक प्रभावी होईल. गावोगावी याचे प्रयोग होतील इतके ते सशक्त आहे.

रोज जितके सहज विघातक दिसते तितकेच प्रयत्नपूर्वक नीट पाहिले तर, तुलनेने कमी असेल पण,विधायकही दिसू शकते हा माझा अनुभव. हत्तीच्या लीळांचे असे दर्शन घडवणाऱ्या या नाटकवाल्या मित्रांना धन्यवाद.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading