गुजरात रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांनी केले संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे गुजरात सरकारच्या रोजगार मेळाव्याला संबोधित केले. मेळाव्याला संबोधित करताना, रोजगार मेळावा गुजरातमध्ये दुसऱ्यांदा होत आहे हे निदर्शनास आणून पंतप्रधानांनी तरुणांना सातत्याने संधी उपलब्ध करून देण्याच्या आणि देशाच्या विकासात त्यांच्या क्षमतेचा उपयोग करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला. केंद्र सरकार आणि एनडीएशासित राज्य सरकारचे सर्व विभाग जास्तीत जास्त नोकऱ्या देण्यासाठी निरंतर काम करत आहेत याबद्दल पंतप्रधानांनी संतोष व्यक्त केला. पंतप्रधानांनी माहिती दिली कि केंद्र सरकार व्यतिरिक्त, 14 एनडीए शासित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सातत्याने रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. नवीन जबाबदारी स्वीकारणारे तरुण हे अमृत काळातील संकल्प साध्य करण्यासाठी पूर्ण समर्पण आणि निष्ठेने योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण भरती प्रक्रियेत पारदर्शकता
गेल्या 5 वर्षात 1.5 लाखाहून अधिक तरुणांना राज्य सरकारी नोकऱ्या मिळाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली, तर 18 लाख तरुणांना रोजगार विनिमय केंद्रांद्वारे विविध क्षेत्रात नोकरी मिळाली. ते पुढे म्हणाले की गुजरात सरकारने भर्ती वेळापत्रक तयार करून निर्धारित वेळेत भर्ती प्रक्रिया पूर्ण केली. यावर्षी राज्य सरकारमध्ये 25 हजारांहून अधिक तरुणांना नोकऱ्या देण्याची तयारी सुरू असल्याचे नमूद करून विविध डिजिटल प्लॅटफॉर्म, मोबाइल अॅप्स आणि वेब पोर्टल्स विकसित करून तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण भर्ती प्रक्रिया पारदर्शक करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
कौशल्य विकासावर सरकारचा भर
तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या सध्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकत पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांद्वारे रोजगार वृद्धी, उत्पादनाला चालना देणे आणि स्वयंरोजगारासाठी देशात अनुकूल वातावरण तयार करण्यावर लक्ष केंद्रित करून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीसाठी ठोस धोरण पंतप्रधानांनी अधोरेखित केले. नोकऱ्यांच्या बदलत्या स्वरूपानुसार तरुणांसाठी आर्थिक सहाय्याची हमी आणि कौशल्य विकासावर सरकार भर देत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात 10 लाख कोटी रुपयांची तरतूद
“जेव्हा विकासाची चाके गतीमान असतात, तेव्हा प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतात”, असे पंतप्रधान म्हणाले. देशातील पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान तसेच इतर क्षेत्रातील विकास प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 1.25 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सध्या केवळ गुजरातमध्येच सुरू आहेत आणि पायाभूत सुविधांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 10 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दाहोदमध्ये रेल्वे इंजिनचा कारखाना
“जगभरातील तज्ञांना असा विश्वास वाटतो, की येत्या काही वर्षात भारत जगातील उत्पादनांचे सर्वात मोठे केंद्र बनेल,” असे पंतप्रधान म्हणाले. देशातील युवा, देशात क्रांती घडवतील, असेही त्यांनी अधोरेखित केले. गुजरातच्या दाहोद इथे 20 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक करुन रेल्वे इंजिन कारखाना उभारला जास्त आहे, त्याबद्दल त्यांनी संगितले तसेच, नजीकच्या भविष्यात भारत सेमीकंडक्टर निर्मितीचे मोठे केंद्र बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देशात 90 हजार पेक्षा अधिक स्टार्ट अप्स कार्यरत
“केंद्र सरकारच्या विकासाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे, आज देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे.” असे पंतप्रधान म्हणाले. धोरणात्मक पातळीवर जे महत्वाचे बदल घडवण्यात आले त्यामुळे देशात अशी व्यवस्था निर्माण झाली आहे, जिथे स्टार्ट अप्सना प्रोत्साहन दिले जात आहे. आज देशात 90 हजार पेक्षा अधिक स्टार्ट अप्स कार्यरत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून, एकीकडे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत,तर
दुसरीकडे लक्षावधी युवकांना स्वयंरोजगारासाठी देखील प्रेरणा दिली जात आहे. “केंद्र सरकार, युवकांना, कोणतीही बँक हमी न घेता, वित्तीय सहाय्य करत आहे.” असे सांगत पंतप्रधानांनी मुद्रा योजना आणि स्टॅंड अप इंडिया योजनांविषयी माहिती दिली. आज लक्षावधी महिला, बचत गटांच्या माध्यमातून भक्कमपणे आपल्या पायांवर उभ्या आहेत, एवढेच नाही तर, त्या कोट्यवधी लोकांना आर्थिक सहाय्यही करत आहेत, असेही, पंतप्रधान म्हणाले.
दुर्बल घटकांना समान संधी
देशात निर्माण होत असलेल्या नवनव्या संधींसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करायला हवे आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. भारतात आज जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होण्याची क्षमता आहे, असेही त्यांनी सांगितले. कौशल्य विकास योजनांचा लाभ समाजातील सर्व वर्गांना व्हायला हवा, या सरकारच्या प्रयत्नांना अधोरेखित करतांना ते म्हणाले, की यामुळे प्रत्येक क्षेत्रातील दलित, वंचित, आदिवासी आणि महिला अशा दुर्बल घटकांना समान संधी मिळू शकतील.
30 कौशल्य भारत आंतरराष्ट्रीय केंद्रे
“देशातील युवकांच्या कौशल्य विकासाला प्राधान्य दिले जात आहे.” असे सांगत, प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत 30 कौशल्य भारत आंतरराष्ट्रीय केंद्रे स्थापन करण्यात येतील , अशी माहिती त्यांनी दिली. इथे युवकांना नव्या युगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यांनी पीएम विश्वकर्मा योजनेचा देखील उल्लेख केला ज्यात लहान कारागिरांना प्रशिक्षण दिले जाईल जेणेकरून लहान उद्योगांत असलेल्या लोकांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्यासठी मार्ग मोकळा होईल. नोकऱ्यांच्या बदलत्या स्वरूपानुसार युवकांना तयार करण्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची भूमिका अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की गुजरातमध्ये आयटीआयच्या जागांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. “गुजरातमधल्या जवळपास 600 आयटीआयमधून जवळपास 2 लाख विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे,” मोदी म्हणाले. आयटीआयमधून नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
नोकरीच्या अनेक संधी
स्वातंत्र्यानंतर अनेक दशके दुर्लक्षित राहिलेली नोकऱ्या निर्माण करण्याची प्रत्येक संधी विकसित करण्यावर सरकारचा भर आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या वर्षीच्या अर्थसंकल्पात प्रत्येक राज्यात 50 पर्यटन स्थळे आणि केवडिया – अतानगर च्या धर्तीवर एकता मॉल विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे, याची त्यांनी माहिती दिली. या मॉलमध्ये देशाच्या प्रत्येक भागातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन दिले जाईल. एकलव्य विद्यालयांत जवळपास 40 हजार शिक्षकांची भरती करण्याची देखील तरतूद करण्यात आली आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
जर सरकारी नोकरी मिळवणे हेच, युवकांचे अंतिम लक्ष्य असेल , तर त्यांचा वैयक्तिक व्यक्तिमत्व विकास खुंटून जाईल असा इशारा त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी दिला. युवकांचे परिश्रम आणि समर्पण यामुळेच, ते आज इथवर आले आहेत, असे सांगत, कायम नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द त्यांना कायम प्रगती करण्यात मदत करेल. कर्मयोगी भारत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असलेले विविध ऑनलाईन अभ्यासक्रम शिकावेत, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. “तुमची नेमणूक कुठेही झाली, तरीही आपली कौशल्ये वाढवण्यावर विशेष भर द्या. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला उत्तम प्रशिक्षण मिळावे, असा आमचा प्रयत्न आहे.” असे पंतप्रधान म्हणाले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.