December 4, 2024
What is in Ajit Pawar Mind Sukrut Khandekar article
Home » दादांच्या मनात दडलंय तरी काय ?
सत्ता संघर्ष

दादांच्या मनात दडलंय तरी काय ?

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याचा मतदार कौल देणार आहेत. अजितदादा यांच्या नेतृत्वाचा व संघटन कौशल्याचा कस लागणार आहे. निवडणुकीत अपयश आले, तर ४१ आमदारांचे करिअर संकटात येऊ शकते. पाच वेळा उपमुख्यमंत्री झालेल्या अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा आहे, आता ते माघार घेऊ शकत नाहीत.

डॉ. सुकृत खांडेकर

जुलै २०२३ मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलेच काका शरद पवारांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला आणि ४१ आमदारांना घेऊन महायुतीचा रस्ता पकडला. भाजपच्या सोबतीला जाताच, त्यांना सुरक्षित तर वाटू लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते व संस्थापक शरद पवार हे गेली सहा दशके महाराष्ट्राच्या राजकारणात आघाडीवर आहेत आणि वयाच्या ८४ व्या वर्षीही तेवढ्याच उमेदीने सक्रिय आहेत. बॅ. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाचे ४० आमदार फोडून काँग्रेसमध्ये आणले होते आणि आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना अजितदादांनी राष्ट्रवादीचे ४१ आमदार महायुतीच्या तंबूत नेऊन बसवले.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह हे अजित पवारांच्या गटाला बहाल केले व शरद पवारांना तुतारी हे नवीन चिन्ह दिले. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी आपली ताकद दाखवून दिली. शरद पवारांच्या पक्षाने राज्यात लोकसभेच्या दहा जागा लढवल्या व पक्षाचे आठ खासदार निवडून आले, तर अजितदादांच्या पक्षाने चार जागा लढवल्या पण एकच खासदार विजयी झाला. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष बघायला मिळतो आहे. अजितदादांच्या नेतृत्वाची फार मोठी परीक्षा या निवडणुकीत आहे.

विधानसभेच्या ५२ जागांवर उबाठा सेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि विधानसभेच्या ३७ मतदारसंघांत शरद पवारांचा पक्ष विरुद्ध अजितदादांचा पक्ष अशी थेट लढत होणार आहे. भाजप विरुद्ध उबाठा सेना असा संघर्ष ३० मतदारसंघांत आहे.

मतदार संघ – अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट
बारामती – अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार
मुंब्रा-कळवा – नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड
इंदापूर – दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील
इस्लामपूर – जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील
कागल – हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे
उदगीर – संजय बनसोडे विरुद्ध सुधाकर भालेराव
परळी – धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख
श्रीवर्धन – आदिती तटकरे विरुद्ध अनिल नवघणे
आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील विरुद्ध देवदत्त निकम
दिंडोरी – नरहरी झिरवाळ विरुद्ध सुनीता चारोस्कर
येवला – छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे
अहेरी – धर्मरावबाबा आत्राम विरुद्ध भाग्यश्री आत्राम

गेले काही दिवस अजित पवार हे त्यांनी केलेल्या भाषणांमु‌ळे, माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमुळे आणि रोखठोक केलेल्या वक्तव्यांमुळे प्रकाशझोतात आहेत. देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी राजभवनवर अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेला पहाटेचा शपथविधी संपूर्ण देशात गाजला होता. भिन्न विचारांचे देवेंद्र व अजितदादा हे एकत्र आलेच कसे, त्यांचे सरकार चालणार तरी कसे अशा प्रश्नांनी राज्यात गहजब माजला होता.

स्वत: अजितदादांनीच सांगितले की, २०१९ च्या विधानसभा निकालानंतर दिल्लीत एका उद्योगपतीच्या घरी त्यावेळी आमच्या बैठका झाल्या, या बैठकीला अमित शहा, शरद पवार, प्रफुल पटेल, स्वत: अजितदादा, देवेंद्र फडणवीस, गौतम अदानी उपस्थित होते. सर्व काही निश्चित करण्यात आले. पण नंतर सर्व दोषांचे खापर माझ्यावर फोडण्यात आले. मी सर्व ते निमूटपणे सहन केले व इतरांना सुरक्षित ठेवले…नंतर भाजपबरोबर जाण्यास पवारसाहेबांचा विरोध का होता, हे मला समजले नाही…

अजितदादांनी सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत अदानींचे नाव घेतल्याने ते भाजप व शरद पवारांनाही आवडले नसावे. शहा व शरद पवारांबरोबरच्या बैठकीला अदानी होते असे सांगणे दोन्ही नेत्यांना अडचणीचे ठरेल, असा विचार अजितदादांनी केला नसावा. पण चोवीस तासांत त्यांनी या वक्तव्यापासून घूमजाव केले. आपण अनेक उद्योजकांना नेहमी भेटत असतो पण राजकीय निर्णयांशी त्यांचा संबंध नसतो, असे शरद पवारांनी स्पष्ट केले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण फूट पाडली असे अभिमानाने सांगणारे भाजपचे काही मोठे नेते आहेत. मग मधेच अदानी कुठून आले…

सन २०१९ मध्ये सरकार स्थापनेसाठी उद्योगपती अदानी एवढा का रस घेत होते, भाजपने त्यांना वाटाघाटी करण्यासाठी नेमले होते का, असा खोचक प्रश्नही खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी विचारला. शिंदे सरकार आल्यावर लगेचच हजारो कोटींचे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट अदानींना कसे मिळाले, याची आठवण मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी करून दिली.

महाराष्ट्रातील प्रचार सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक है तो सेफ है अशी घोषणा दिली, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली. या दोन्ही घोषणांवरून महाराष्ट्रात वादंग माजले. बटेंगे तो कटेंगे या घोषणेला महायुतीत राहूनही अजितदादांनी विरोध करण्याचे धाडस दाखवले. महाराष्ट्र हा साधू – संतांचा व शाहू, फुले, आंबेडकरांचा प्रदेश आहे. त्यामुळे इथे बटेंगे तो कटेंगे असले काही अजिबात चालणार नाही. आम्ही त्याचे समर्थन करीत नाही. यूपी, बिहारसारखे इथे उपयोगी नाही… हाच इशारा त्यांनी भाजपला दिला.

अजितदादांचा पक्ष महायुतीत आहे पण त्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे. भाजपबरोबर ते महायुतीत गेले ही एक राजकीय तडजोड आहे. भाजप व अजितदादांनी काही एकत्रपणे निवडणूक लढवली नव्हती की त्यांचा निवडणूक पूर्व समान कार्यक्रम ठरलेला नव्हता. उत्तर प्रदेशात मुलायम सिंग यादव (सपा), मायावती (बसपा) यांना मुख्यमंत्री होताना भाजपने पाठिंबा दिला होता. व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले तेव्हा भाजपने त्यांना पाठिंबा दिला होता. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, तेलुगू देशमचे चंद्राबाबू नायडू किंवा अण्णा द्रमुकच्या जयललिता यांचे पक्ष केंद्रात अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना एनडीए सरकारमध्ये सामील झाले होते. जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारमध्ये भाजप सामील झाली होती. आजही चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार हे एनडीएसोबत आहेत त्यामुळे अन्य पक्षांचा सरकारमध्ये सहभाग ही राजकीय तडजोड असते हे भाजपानेही स्वीकारले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रतन शारदा यांनी एका मुलाखतीत भाजपने अजित पवारांना बरोबर घेण्यात चूक केली असे म्हटले होते. नंतर ऑर्गनायझर व विवेक या संघाच्या मुखपत्रांनी अजित पवारांना बरोबर घेतल्याने भाजपचे नुकसान झाले असा सूर आ‌ळवला होता. स्वत: पंतप्रधान मोदींनी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख भोपाळच्या जाहीर सभेत केल्यानंतर अजित पवार व त्यांचे विधानसभेतील ४१ सवंगडी भाजपसोबत धावत आले. शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसल्यानंतर बाहेर आल्यावर उलटी होते, असे उपहासात्मक भाष्य केले होते. जुन्नरमध्ये भाजपच्या आशाताई बुचके यांनी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. अजितदादांच्या पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी तर सरकारमध्ये राहून सतत अपमान सहन करण्यापेक्षा बाहेर पडलेले चांगले, असे म्हटले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात मोठे अपयश प्राप्त झाल्यावर भाजपने त्याचे खापर अजितदादांवर फोडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीची मते भाजपाला मिळाली नाहीत, असे देवेंद्र यांनीच म्हटले होते.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याचा मतदार कौल देणार आहेत. अजितदादा यांच्या नेतृत्वाचा व संघटन कौशल्याचा कस लागणार आहे. निवडणुकीत अपयश आले, तर ४१ आमदारांचे करिअर संकटात येऊ शकते. पाच वेळा उपमुख्यमंत्री झालेल्या अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा आहे, आता ते माघार घेऊ शकत नाहीत.

हिंदुत्ववादी पक्षांबरोबर राहून पुरोगामी भूमिकेला चिकटून राहणे ही अजितदादांची मोठी कसरत आहे. भाजपाचा विरोध असलेल्या नबाब मलिकांना अजितदादांच्या पक्षाने मानखुर्द-शिवाजीनगरनधून व त्यांची कन्या सना हिला अणुशक्तिनगरमधून उमेदवारी दिली आहे. बिष्णोई टोळीकडून हत्या झालेले माजी आमदार बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशानला अजिदादांनी वांद्रे पूर्वमधून तिकीट दिले आहे. बारामतीत भाजपाच्या कोणाही मोठ्या नेत्याची सभेची गरज नाही, असे त्यांनी म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील पंतप्रधानांच्या शेवटच्या प्रचार सभेलाही स्वत: अजितदादा व त्यांचे उमेदवार मंचावर हजर नव्हते. काकांकडचे परतीचे दोर कापले आहेत आणि महायुतीत तुझं माझं जमेना, अशी अवस्था झाली आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading