कोरोना काळात सर्वाधिक बिकट परिस्थिती होती ती देहविक्री करणाऱ्या महिलांची. मात्र आपल्यातील माणुसकी जागृत ठेवत देहविक्री करणाऱ्या महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्या जॉन डिसोजा यांनी या काळात आपली संवेदनशीलता जागृत ठेवत या महिलांसाठी मदतीचा हात पुढे केला, त्यातून अनेक जणींचा जीवही वाचला !
✍️ अजय कांडर
कोरोनाने थैमान घातलेल्या काळात देहविक्री करणाऱ्या भागामध्ये फिरणे हे धोकादायकच होते. परंतु आमचे मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते मित्र जॉन डिसोजा यांची या काळातील संवेदनशीलता कमालीची होती. त्यांनी मुंबईतील देहविक्री करणाऱ्या भागातील महिलांसाठी याच काळात आधार देण्याचे मोठे काम केले. कामाठीपुरा, पिला हाऊस, गिरगाव परिसर, नवलकर लेन, कॅनडा ब्रिज अशा जिथे जिथे मोठ्या भागात देहविक्री व्यवसाय चालतो तो सर्व भाग अक्षरशः पिंजून काढला आणि तेथील अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे व्याकूळ झालेल्या महिलांना मोठ्या प्रमाणात मदत केली.
दुर्दैवाने अशी मदत उभारता उभारता जॉन यांना कोरोनाने अखेर गाठलेच आणि सर्व दक्षता घेऊनही त्यांचे त्यात निधन झाले! खरंतर जॉन यांची आणि माझी भेट काही वर्षांपूर्वी गोव्यात झाली होती. पणजी कला अकादमी परिसरात मी फिरत असताना जॉनही तिथे होते. एकत्र गप्पा मारता मारता एकमेकाची चौकशी केली गेली. विचार जुळले आणि एकमेकांचा संपर्क होत राहिला. मुंबईत गेल्यावर अधून मधून जॉन यांची दादरला भेट व्हायची. मुंबई ग्रंथ संग्रहालयाच्या समोरच्या चहाच्या टपरीवर एकत्र बऱ्याच वेळा चहा प्यायचो. फोर्ट किंवा दादर परिसरात जास्त वेळ जाणारे काम असेल तर मुंबईत दूर नातेवाईकांकडे मुक्काम करण्यापेक्षा मुंबई ग्रंथ संग्रहालयाच्या निवासी रूममध्ये मुक्काम करणे सोप पडत. म्हणून मग मी तिथे थांबायचो.
या सगळ्यामुळे जॉन यांची भेटही दादर येथे सहज होऊन जायची. काही वर्षा पूर्वीची घटना असेल. कोकणातील एक वयोवृद्ध लेखकांच्या ग्रंथाचे प्रकाशन मंगेश पाडगावकर, मधु मंगेश कर्णिक उर्मिला पवार आणि मी अशा सर्वांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्य मंदिरच्या मिनी थिएटर मध्ये होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मुंबई ग्रंथ संग्रहालयाच्या त्या समोरच्या चहाच्या टपरीवर जॉन आणि मी भेटायचे ठरले. तिथे भेटल्यावर चहा पिता पिता समोरच्या रस्त्यावर लक्ष गेले. तर एका महिलेबरोबर दोन-तीन तरुण हुज्जत घालत होते. त्यांची पुढे मोठ्याने बाचाबाची होऊ लागली.
प्रसंगी एखादा तरुण तिच्यावर हात उचलत होता. मला ते बघून कसतरी वाटलं. जॉन पुढे सरसावले. त्याने त्या तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडे घेऊन जाईन अशी त्या तरुणांना धमकी दिली. प्रकरण शांत झाल्यावर ते पुन्हा माझ्याकडे आले. मी त्यांना म्हटलं चांगल धाडस आहे तुमच्यात. तर ते हसत म्हणाले यात धाडस कसल? हे रोजच काम आहे. मी म्हटलं रोजचं काम म्हणजे? तर ते म्हणाले मी देहविक्री करणाऱ्या महिलांच्या न्याय हक्कासाठी, आरोग्यासाठी काम करतो. समोरची महिलाही देहविक्री करणारी महिला होती. त्यांच्या या उद्गगाराने मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघत राहिलो. त्यावेळी माझ्या मनात एक विचार येऊन गेला, माणसं अनेक वर्ष भेटत राहिली तरी त्यांचा चांगुलपणा पूर्णत: आपल्याला कळतोच असं नाही. मग मी उत्सुकतेपोटी जॉन यांच्याकडून त्यांच्या या कामाविषयीची सविस्तर माहिती समजून घेतली.
जॉन यांचे काम समजून घेतल्यावर मी थक्क झालो. ते या कामाकडे कसे वळले याबद्दल माझ्या मनात उत्सुकता होती. त्यासंदर्भात विचारल्यावर ते म्हणाले, येशूची मर्जी. माझा जन्मच कामाठीपुरामध्ये एका छोट्या चाळीत झाला. आमचं मुळगाव मला माहित नाही. कारण आमच्या अनेक पिढ्या मुंबईतच गेल्या.आमच्या चाळीत वेगवेगळ्या जाती धर्माचा समाज गुण्यागोविंदाने नांदत होता. सर्व धर्माचे सण आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन साजरे करायचो. नाताळला आमच्या घरी चाळीतील सर्व लोक यायचे. मी गणपतीच्या मिरवणूकी मध्ये नाचायचो. ईद दिवशी ताबूद मिरवणुकीतही सहभागी व्हायचो. या मिरवणुकी मधला अजून एक एकमेकांना जोडणारा दुवा होता तो म्हणजे या भागातील मोठ्या प्रमाणात असलेल्या वेश्या वस्ती मधील मुले – बायका मिरवणुकीत सहज मिसळून जायच्या. या भागात त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी होते. ते सर्व धर्माच्या सणाला चंदा मागायला प्रत्येकाच्या घरी जायचे. आणि चाळीतील सर्व लोक कोणतीही नापसंती व्यक्त करता त्यांना चंदा द्यायची. असे एक निर्मळ वातावरण आमच्या चाळीत होते. त्यावेळी आता सारखी कामाठीपुरा येथे मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ नसायची. त्यामुळे जवळपासची सगळीच माणसे एकमेकाला चेऱ्याने ओळखायची.
बालपणी आमच्या चाळीच्या पाठीमागे जी देहविक्री करणारी महिलांची वस्ती होती तेथील मुलं रस्त्यावर खेळायला यायची. आम्हीही तिथे त्यांच्या सोबत एकत्रच खेळायचो. त्यामुळे कधीतरी वेश्यावस्ती मधील बाल मित्रांसोबत त्या वस्तीत जाणं येणं व्हायचं. आमच्या घरच्या लोकांनीही त्या वस्तीत जायला आम्हाला कधी विरोध केला नाही. किंवा ती बदनाम वस्ती आहे असं काही मनावर बिंबवलं नाही.एके दिवशी आम्ही मुलं देहविक्री करणाऱ्या वस्तीच्या समोरील रस्त्यावर खेळत असताना समोर येणाऱ्या वाहनाने मला धडक दिली आणि मी जाग्यावरच पडलो. डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला. रक्तस्राव झाला. तेव्हा तेथील देहविक्री करणाऱ्या महिला मला उचलून जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. त्यातून वेळीच उपचार माझ्यावर होऊ शकले म्हणून माझा जीव वाचला. या सगळ्यातून लहानपणापासून मनात या महिलांविषयी एक प्रकारे आस्था निर्माण झाली.त्यातून मी त्यांच्या प्रश्नांकडे वळलो! शेवटी याच जॉन भाईं यांनी करोना काळात आपली संवेदनशीलता जागृत ठेवत देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी मदतीचा हात पुढे केला, त्यातून अनेक जणींचा जीवही वाचला!
✍️ – अजय कांडर
लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत – ९४०४३९५१५५
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.