या भागात भटकंती करताना या अपघाताचे अनेक वेगवेगळे अनुभव येथील वृध्दांनी सांगितले. या घटनेनंतर चक्क ५९ वर्षांनंतर येथे काही पुरावे सापडतात का ? हे मला पाहायचे होते. व विमानाचे पार्ट ५९ वर्षांनंतरही अस्तित्वात असु शकतील का ? याचा स्वतः अनुभव घ्यायचा होता.
रमेश खरमाळे, माजी सैनिक खोडद
8390008370
42,375 hits
१७ नोव्हेंबर २०१७ साली दौंड्या डोंगर माथ्यावर जाण्यासाठी जुन्नरहुन निघालो होतो ते पण एकटाच. अनेक ठिकाणी शक्यतो कुणीही सोबतीला न मिळाल्याने भटकंतीचा तसा जुना अनुभव सोबतीला यावेळी होताच. मी जेव्हा जुन्नर तालुक्यात २०१३ पासून भटकंतीला सुरूवात केली तेव्हा भटकंतीला सोबतीला कुणी यायला तयार नसायचे. हे रिकामटेकडे उद्योग कोण करणार ही धारणा त्यावेळी खूप होती. मग काय एकला चलो रे हे ठरलेले असायचे. कधी कुणी संगत केलीच तर ती भटकंती पूर्ण न करताच माघारी परतावे लागायचे. कारण चालणारा दमछाक झाली की माघारी जाऊ म्हणायचा. असं दोन तीन वेळा घडले. शेवटी एकट्यानेच भटकंती करायचा निर्णय तेव्हा पासूनच मी घेतलेला. तेव्हापासून जी एकट्याचने भटकंती करायची सवय झाली ती आजतागायत चालूच राहिली. त्यामुळे एकट्याने भटकंती करायची म्हटले तरी काही विशेष वाटतं नसे. अगदी आत्ता नंतरच्या काळात तर अनेक डोंगरावरची सायकल भटकंती एकट्यानेच केली.
तेव्हा निमगिरी किल्ल्याच्या पश्चिमेकडुन दौंड्या डोंगर चढायला मी सुरुवात केली होती. विशेष कारणही तसेच होते. जुन्नर तालुक्यातील निमगिरी येथील दौंड्या डोंगरवर ७ जुलै १९६२ रोजी मध्यरात्री इटालियन एअरलाईन्सचे डग्लस डीसी- ८-४३ हे विमान जुन्नर शहराच्या पश्चिमेस ४० कि.मी अंतरावरील आदिवासी दुर्गम डोंगराळ जंगलयुक्त भागातील निमगिरी गावातील ‘दौंड्या’ डोंगराला धडकून कोसळले होते. या भीषण विमान अपघातात विमानातील सर्वच्या सर्व ८५ प्रवाशांसह ९ कर्मचारी असे ९४ जण मृत्युमुखी पडले होते.
प्लाईट ए- २७७१ हे ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि इटलीतील रोम दरम्यान इंटरनॅशनल शेड्यूल पॅसेंजर सेवा होती. डरवीन, सिंगापूर, बॅकॉक, मुंबई, कराची या मार्गे प्रवास होता. बॅकॉकच्या डॉन मॉग आंतरराष्ट्रीय विमान तळावरून निघालेले हे विमान मुंबईतील सांताक्रुझ विमानतळाकडे येत होते. या वेळी मुंबई विमानतळ जवळच्याच अंतरावर आले असताना ३६०० फुट उंचीवर असताना पावसाळी वातावरणात निमगिरी गावाजवळील डोंगरावर दाट जंगलात, चिखलात हे विमान कोसळले होते. ४ रोल्स रॉइस ५०८-१२ कॉनव्हे इंजिन असलेल्या या विमानाने १९६२ मध्येच पहीले उड्डाण केले होते. तर अवघ्या एकूण ९६४ तासांचा प्रवास या विमानाने केला होता.
पुणे व ठाणे जिल्ह्यात सरहद्दीजवळील सह्याद्रीच्या उंच उंच डोंगररांगात जाण्यासाठी कोणताही रस्ता नसलेल्या भागात, दाट जंगलात कोसळलेल्या या विमानापर्यंत तातडीने मदतकार्य पोहचणे हे १९६२ च्या काळात अशक्य कोटीतील गोष्ट होती. जवळचे ठिकाण म्हणजे तालुक्याचे जुन्नर गाव तेथुन ४० कि. मी. अंतरावर होते. या विमान अपघाताच्या मदतकार्यासाठी पुण्यावरून खास सैन्यदलाच्या तुकडीला पाचारण करावे लागले होते. अपघातात कोणीही जिवंत राहीला नसल्याने केवळ मृतदेह आणण्याचेच काम त्यांना करावे लागले. तसेच विमानाचे अवशेष त्यांनी गोळा केले होते.
या विमानाचे अवशेष डोंगर परीसरात पडलेले होते. या विमानातील दोन सिलेंडरपैकी एक सिलेंडर निमगिरी शाळेत घंटा पुर्वी वापरली जात होती व एक सिलेंडर त्या अपघातात फुटल्याने तीचे अस्तित्व संपुष्टात आले होते. ही सिलेंडर कॅलिफोर्निया यू.एस.ए. तील “झीप एरो” या मिसाईल ऑक्सीजन कॉम्पोनंट्स बनविणाऱ्या कंपनीचे हे सिलेंडर होते.
या भागात भटकंती करताना या अपघाताचे अनेक वेगवेगळे अनुभव येथील वृध्दांनी सांगितले. या घटनेनंतर चक्क ५९ वर्षांनंतर येथे काही पुरावे सापडतात का ? हे मला पाहायचे होते. व विमानाचे पार्ट ५९ वर्षांनंतरही अस्तित्वात असु शकतील का ? याचा स्वतः अनुभव घ्यायचा होता. अनेक कठीण भाग चढाई करत दौंड्या डोंगर माथ्यावर पोहोचलो होतो. विमान अपघाताची नक्की कोणती जागा असावी हे माहीत नव्हते व एकटाच असल्याने कुणाला विचारने तर शक्यही नव्हते त्यामुळे खूप भटकंती करावी लागली. तेथील अनेक चढउतार पायदळी तुडवून तुडवून अक्षरशः एका रामेठा वनस्पतीच्या आश्रयाला जाऊन थोडावेळ विसावलो होतो. पाणी पिऊन पाण्याची बाटली बॅगमध्ये ठेवताना जेथून बॅग उचलली तेथेच खाली एक पत्रा निदर्शनास पडला. एवढा आनंद झाला की तेथे अजून फिरल्यावर अजुन एक पत्रा अर्थात विमानाचा पार्ट मिळाला. भटकंतीचे फळ मिळाले होते. झालेली दमछाक विसरून मी निमगिरी कधी गाठली समजले नव्हते. आज त्या भटकंतीला जवळपास ७ वर्ष पूर्ण होताहेत परंतु आठवण मात्र तशीच ताजी आहे.
विमानातील सिलेंडरचा एक पार्ट खटकाळे शाळेत असून एक पार्ट निमगिरीच्या शाळेत आजही शाळेची घंटा म्हणून वापरण्यात येतोय. विमानाचे भटकंती दरम्यान सापडलेले जॉईन पार्ट माझ्या संग्रही ठेवण्यात आले आहेत की जे आजही सन १९६२ चा दौंड्या डोंगर विमान अपघाताची आठवण करून देतात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.