कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ.ज्योती जाधव यांची विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. प्रभारी कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी यांनी प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ. जाधव यांची नियुक्ती केली.
दरम्यान, प्रभारी प्र-कुलगुरू पदासाठी त्यांच्या नावाची शिफारस गुरूवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेत केली. व्यवस्थापन परिषदेनेही त्यास संमती दिली. प्रभारी कुलगुरू प्रा.गोसावी यांनी डॉ. जाधव यांना प्रभारी प्र-कुलगुरूपदी नियुक्ती केल्याविषयी पत्र दिले. तसेच, विद्यापीठ प्रशासनाकडून याबाबत मा. कुलपती कार्यालयाला कळविण्यात आले.
प्रा.डॉ.ज्योती जाधव ह्या जागतिक आघाडीच्या शास्त्रज्ञांमध्ये समाविष्ट असलेल्या ज्येष्ठ संशोधक आहेत. त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले आहे. शिवाजी विद्यापीठात नियमित प्र-कुलगुरू नियुक्त होईपर्यंत त्यांचा प्रभारी प्र-कुलगुरूपदाचा कार्यकाल राहणार आहे.
दरम्यान, प्रभारी कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. ज्योती जाधव यांचे अभिनंदन व स्वागत केले.
डॉ. विजय कुंभार यांची नवोपक्रम परिषदेसाठी निवड
शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागाचे वरिष्ठ सहयोगी संशोधक डॉ. विजय कुंभार यांची भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तसेच प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालयामार्फत आयोजित ‘उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम परिषदे’साठी (२०२५) ‘युवा विज्ञान आणि तंत्रज्ञान लीडर’ म्हणून निवड झाली आहे. येत्या ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे ही राष्ट्रीय परिषद होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
ऊर्जा साठवणूक क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधनाच्या आधारे डॉ. कुंभार यांची परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांनी उच्च-कार्यक्षमता असलेली ‘अति-धारित्र’ आणि ‘जस्त-आयन घट’ यांच्या विकासावर आपले संशोधन केंद्रित केले आहे. त्यांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेण्यात आली असून, त्यांना जपान सरकारची प्रतिष्ठेची ‘जेएसपीएस फेलोशिप’ मिळाली आहे. त्यांनी दक्षिण कोरिया येथेही संशोधन कार्य केले असून, त्यांचे पन्नासहून अधिक शोधनिबंध नामांकित आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
नवोपक्रम परिषदेच्या माध्यमातून कुंभार यांना ‘विकसित भारत २०४७’ च्या तांत्रिक रूपरेषेला आकार देण्यासाठी नोबेल पुरस्कार विजेते, जागतिक तज्ञ आणि देशातील शीर्ष धोरणकर्त्यांशी संवाद साधण्याची अनोखी संधी लाभणार आहे. प्रयोगशाळेतील नवकल्पनांना शाश्वत विकासासाठी प्रत्यक्ष व्यावहारिक उपयोगांमध्ये रूपांतरित करण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. डॉ. कुंभार यांच्या या यशाबद्दल प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी अभिनंदन केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
