॥ शेतीचा हालअहवाल ॥
हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीचे फारच नेमके मूल्यमापन न्यायमूर्ती बखले यांच्या या विधानात आपणाला पहावयास मिळते. गाथा रचणाऱ्या कवींचे शेतकऱ्यांच्या दुःख दारिद्र्याकडं किती बारीक लक्ष होतं ते अनेक गाथातून आपल्याला कळतं. ‘शेतकरी कर्जात जन्मतो, कर्ज डोक्यावर घेऊन जगतो आणि पाठीमागं कर्ज ठेवूनच मरतो’ हे शेतकऱ्यांविषयीचं सनातन सत्य एका गाथेत सांगितलेलं आहे.
इंद्रजीत भालेराव
याआधी आपण मौर्यकालीन म्हणजे बुद्धकालीन शेतीचा विचार केला. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर दख्खनच्या पठारावर शुंग, कण्व आणि सातवाहन घराण्यांनी राज्य केलं. त्यातले सातवाहन हे आपल्या महाराष्ट्रातल्या पैठणचे होते. इसवीसनाआधीची काही शतकं आणि पुढची काही शतकं सातवाहनांनी मध्य भारतावर सत्ता गाजवली. त्यांच्या काळात इथं शेतीची अवस्था काय होती ? ते आता आपण पाहणार आहोत. उत्तर भारतातून आपण प्रथमच मध्य भारतात येत आहोत. कारण याआधीची सर्व शेतीसंस्कृती उत्तर भारतात विकसित झालेली होती. याआधीच्या सर्व लेखातून आपण त्याच शेतीचा विचार केला. नंतर ही शेतीसंस्कृती दक्षिण भारताकडं सरकत गेली. इथून पुढं आपण दक्षिण भारतातल्या शेतीचा विचार करणार आहोत. आणि प्रथमच आपण संस्कृत भाषेच्याही बाहेर पडणार आहोत. ते कसे ? तेच आता आपण पाहणार आहोत.
गाथा सप्तशती हा ग्रंथ पैठणचा राजा हाल सातवाहन याने संकलित केलेला आहे. पैठणच्या गोदावरी नदीच्या परिसरात म्हटली जाणारी ही प्राचीन शेतकरी लोकगीतं आहेत. ती कुणा एकानं लिहिलेली नाहीत. ती लोकांनी लिहिलेली आहेत. जे लोक तेव्हा जे जीवन जगत होते आणि विरंगुळ्याच्या वेळी तेच जीवन गाण्यात गुंफून म्हणत होते, ती सगळी गाणी राजाने संकलित केलेली आहेत. प्रत्यक्षात संकलित केलेल्या एक कोटी गाण्यातून निवड केलेली ही सातशे निवडक गाणी आहेत. म्हणून या ग्रंथाचं नाव प्राकृतात सत्तसई आणि मराठीत सप्तशती असं आहे. इतिहासानं ज्यांच्या जगण्याची नोंद कधीच केली नाही, अशा सामान्य माणसांच्या कष्टकरी जगण्याची नोंद या गाण्यांनी घेतलेली आहे.
यात आणखी विशेष नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे हे काम एका राजानं केलेलं आहे. राजाच्या दरबारात राजाचंच गुणवर्णन कवींनी करावं अशी प्रथा असलेल्या काळात एक राजाच स्वतः सामान्यांच्या जगण्याची नोंद करणारा ग्रंथ संकलित करतोय, हे त्याचं मोठेपण आणि इतिहासातलं त्याचं वेगळेपण आहे. ज्या काळात केवळ संस्कृत भाषेलाच प्रतिष्ठा होती त्या काळात महाराष्ट्री प्राकृतातल्या या काव्याला एवढं महत्त्व दिलं म्हणून राजा हाल सातवाहन हा तेव्हा विद्वानांच्या हेटाळणीचा विषय ठरलेला होता. पण या ग्रंथाची लोकप्रियता लक्षात घेऊन नंतर त्याच लोकांनी हाल राजाने संकलित केलेली ही गाणी संस्कृतमध्ये अनुवादित केली. पुढं ती देशभर गाजली. बाणासारख्या श्रेष्ठ संस्कृत विद्वानाने नंतर त्याची जाहीर स्तुती केली. नंतरच्या काळात जगातल्या अनेक भाषांमध्ये या ग्रंथाचा अनुवाद होऊन हाल सातवाहन जागतिक कीर्तीचा धनी ठरला, जरी सुरुवातीला त्याची हेटाळणी झालेली होती.
ज्या महाराष्ट्रातल्या लोकजीवनाचं हे लोककाव्य होतं त्या महाराष्ट्रातल्या पुढे विकसित झालेल्या मराठी भाषेत मात्र खूपच उशिरा त्याचं कौतुक झालं. स्वातंत्र्यपूर्व काळात काही विद्वानांनी या ग्रंथाचा त्रोटक परिचय करून देणारे जुजबी लेख लिहिले होते. पण या ग्रंथाचे समग्र संशोधन, मराठी अनुवाद आणि सविस्तर परिचय करून देणारा पहिला महाग्रंथ मराठीत प्रकाशित झाला तो स्वातंत्र्योत्तर काळात १९५६ साली. स. आ. जोगळेकरांनी हे अद्वितीय काम करून ठेवलेलं आहे. त्याची नवी आवृत्ती अलीकडेच पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे. जोगळेकरांनी या ग्रंथाला लिहिलेली पाचशे पानांची प्रस्तावना हा अनेक अर्थाने एक विक्रमच आहे.
सातवाहनाने ही गाणी संकलित केली तो काळ इसवीसनाचे पहिले शतक आहे. म्हणजे आज पासून दोन हजार वर्षांपूर्वी त्याने ही गाणी संकलित केलेली आहेत. त्यापूर्वी चारपाचशे वर्षे तरी ती गाणी समाजात प्रचलित असावीत. म्हणजे या गाण्यातून आलेले समाजजीवन दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीचे आहे. हा सगळा कालखंड सातवाहन राजघराण्याच्या सत्तेचा आहे. इसवीसन पूर्व २३० ते इसवीसनानंतर २३० असा हा ४६० वर्षांचा कालखंड सातवाहनांच्या अधिपत्याखालचा कालखंड आहे. त्याकाळी महाराष्ट्र सुखी आणि समृद्ध असावा असं वाटतं. सातवाहन वंशाच्याच शालिवाहन या राजाने शकाची निर्मिती केलेली आहे. ज्या हाल राजाने या गाथांचे संकलन केले तो हाल सातवाहन वंशातला सतरावा वंशज होता. सातवाहनांचे राज्य लोकाभिमुख असावे असे या ग्रंथावरून वाटते. स्वतःच्या घराण्याचा इतिहास लिहून ठेवण्याऐवजी सामान्यांच्या जगण्याची गाथा राजा स्वतःच संकलित करतो आहे, ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते.
संस्कृत आणि प्रादेशिक भाषांच्या मधला काळ हा प्रामुख्याने प्राकृत भाषांचा काळ आहे. या काळात पाली, अर्धमागधी, शौरसेनी, पैशाची आणि महाराष्ट्री अशा काही प्राकृत भाषा भारतात प्रचलित होत्या. पाली आणि अर्धमागधी या प्राकृत भाषांना बौद्ध आणि जैन धर्मांनी आश्रय दिल्यामुळे त्या ग्रंथरूपात शिल्लक राहिल्या. महाराष्ट्री प्राकृत मात्र केवळ गाथा सप्तशती या एका ग्रंथामुळेच अजूनही शिल्लक आहे. कुठल्याही धर्माने पुरस्कृत न केलेली ही भाषा या एका ग्रंथाने तोलून धरलेली आहे. महाराष्ट्री प्राकृतात आणखी काही ग्रंथांची निर्मिती झाली असावी पण दोन हजार वर्षानंतरही शिल्लक राहिला तो मात्र केवळ ‘गाथा सप्तशती’ हा एकमेव ग्रंथ. त्याची कीर्ती उत्तरोत्तर वाढतेच आहे. आज तर जगातल्या सर्व प्रमुख भाषांमध्ये या ग्रंथाचा अनुवाद झालेला आहे. आपणाला म्हणजे मराठी भाषिकांना या ग्रंथाचा परिचय झाला तो मुळात इंग्रजी भाषेतूनच.
महाराष्ट्री प्राकृतातल्या मूळ गाथा या शेतकऱ्याचं साधंसुधं जीवन चित्रीत करणाऱ्याच होत्या. पण त्या जेव्हा संस्कृतमध्ये गेल्या तेव्हा संस्कृत भाषेच्या प्रकृतीप्रमाणे प्रत्येक गाथेला शृंगारिक अर्थ चिकटवला गेला. गाथामधील साध्या वृत्तीवर शृंगाराचा आरोप झालेला पाहून राजारामशास्त्री भागवत खवळून विचारतात, ‘शृंगारची कावीळ झालेल्या अलंकारिकांनी जी भलतीच वाट दाखवली त्याच वाटेने प्राकृत ग्रंथावर संस्कृत टीका करणारे भट्ट व शास्त्री डोळे मिटून चालत राहिले, ही अंधपरंपरा दांडगी नव्हे काय ?’
राजाराम शास्त्री भागवतांचे हे वाक्य म्हणजे मला माझ्याच मनातले बोल वाटतात. मी जेव्हा प्रथम या गाथा वाचल्या तेव्हा प्रत्येक गाथेला लावलेला शृंगारिक अर्थ वाचून माझ्या मनाला खटकले होते. हे सगळे शृंगारिक संदर्भ ओढून ताणून आणल्यासारखे वाटत होते. कष्टकऱ्यांच्या पिळदार शरीराकडे पाहून मनात विकृत भाव यावा तशीच या विद्वानांची गत झालेली दिसते. राजारामशास्त्रींचे वरील विधान वाचून आपणाला जे वाटते ते योग्यच आहे, याची मला खात्री पटली. पण पुढं राजाराम शास्त्रींच्याच नातीने, विदुषी दुर्गाबाई भागवत यांनीही, शृंगारिकांचीच तरफदारी केल्याचं त्यांच्या ‘संस्कृतीसंचित’ या पुस्तकात वाचलं आणि मला फार वाईट वाटलं.
जोगळेकरांनी संपादित आणि अनुवादित केलेल्या गाथा सप्तशती या ग्रंथाला न्यायमूर्ती विद्यासागर सदाशिव बखले यांनी पुरस्कार लिहिताना जे मत व्यक्त केलं ते मला अत्यंत महत्त्वाचे वाटतं. ते त्यांच्याच भाषेत इथं मुद्दाम देत आहे. त्यात गाथा सप्तशतीची अनेक वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेली आहेत. ते म्हणतात,
“त्याकाळी इतिहास म्हणजे राजांच्या पराक्रमाचे वर्णन अशी महाराष्ट्राची समजूत नव्हती. राजांच्या प्रासादात व लीलांतच काव्य संभवते असा महाराष्ट्रीयनांचा समज नव्हता. ग्रामीण जनतेतही घरोघरी खरे प्रासादिक काव्य आढळते, अशी त्यांची निष्ठा होती. हे महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य मानले पाहिजे. अन्य प्राकृत भाषेत किंवा अन्य प्रदेशात असे प्रयत्न झालेलेच नाहीत. ग्रामीण जनतेच्या जीवनावर त्यांच्याच भाषेत रचलेला असा ‘गाथा सप्तशती’ हा एकमेव ग्रंथ आहे. भारतातील संस्कृत पंडितांच्या प्रशंसेचा हव्यास न बाळगता, राजकुलांच्या विक्रमांचे वर्णन करण्याचा स्वार्थमूलक उपक्रम टाळून, शेतावर राबणाऱ्या आणि रानावनात राहणाऱ्या ग्रामीण व अन्य जनतेवर आपली काव्यप्रतिभा केंद्रित करणारे कवी महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत. गाथा सप्तशतीचा संपादक हाल सातवाहन हा राजा होता. त्याने स्वतः व त्याच्या पदरी असलेल्या कवींनी या संग्रहात समाविष्ट झालेल्या गाथा लिहिल्या असतील. कदाचित ग्रामीण जनतेत प्रचलित असलेल्या गाथांवर थोडाबहुत संस्कार करून त्याने त्या संकलित केलेल्या असतील. कशीही असो, त्याचा महाराष्ट्री प्राकृताबद्दल अभिमान आणि ग्रामीण जनतेच्या जीवनाबद्दलची आस्था या गाथातून पदोपदी प्रत्ययास येते. सातवाहनांच्या संस्कृत भाषेच्या अज्ञानाची आणि प्राकृत भाषांच्या पुरस्कारांची पंडितांनी पदोपदी कुचेष्टा केलेली आहे. संस्कृत काव्याला सर्वस्वी अपरिचित असे एक क्षेत्र हाल सातवाहनाने कवींना उपलब्ध करून दिले याचे श्रेय सर्वस्वी महाराष्ट्रीयत्वालाच आहे.”
हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीचे फारच नेमके मूल्यमापन न्यायमूर्ती बखले यांच्या या विधानात आपणाला पहावयास मिळते. गाथा रचणाऱ्या कवींचे शेतकऱ्यांच्या दुःख दारिद्र्याकडं किती बारीक लक्ष होतं ते अनेक गाथातून आपल्याला कळतं. ‘शेतकरी कर्जात जन्मतो, कर्ज डोक्यावर घेऊन जगतो आणि पाठीमागं कर्ज ठेवूनच मरतो’ हे शेतकऱ्यांविषयीचं सनातन सत्य एका गाथेत सांगितलेलं आहे.
‘ज्याच्या मुखावरील भाव कधीही पालटत नाहीत व जो दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जातो, असा दृढ स्नेह ठेवणारा सत्पुरुष विरळा. विलोपार्जित कर्जाप्रमाणे अशा स्नेहाचा वारसा पुत्राकडेही येतो.’ (गा. क्र. ११३)
हा त्या गाथेचा अर्थ सर्वकाही सांगून जाणारा आहे. इथे मुद्दाम मी स. आ. जोगळेकरांनी दिलेला गद्यातला अर्थ त्यांच्याच शब्दात दिलेला आहे. पुढेही मी तसेच करणार आहे. कारण मूळ गाथा आणि त्यांची महाराष्ट्री प्राकृत भाषा आपणाला मुळीच समजणार नाही. आणि ज्या लोकांनी त्या गाथांचं आजच्या मराठीत पद्य रूपांतर केलेलं आहे त्यात नेमका अर्थ हरवलेला आहे. म्हणून मी जोगळेकरांनी केलेलं मराठी रूपांतरीत गद्य इथं देत आहे. कारण इथं आपणाला त्यातल्या काव्य आणि अलंकारापेक्षाही शेतकरी वास्तवाकडं जास्त लक्ष वेधायचं आहे. शेतकरी दारिद्र्याचं वर्णन करणाऱ्या गाथा तर काळीज पिळवटून टाकणाऱ्या आहेत. त्यातली कल्पकता आणि काव्यात्मकता वाखाणण्यासारखी आहे. त्याची ही काही उदाहरणे,
“गरीब कुटुंबात कपड्याची सुद्धा इतकी दूर्दशा व ओढाताण होते की ती असह्य झाल्यामुळे धुवून वाळत घातल्यावर बिचारा दशातून गळणाऱ्या पाण्याच्या रूपाने अश्रू गाळत असतो. (गा. क्र. १८) माहेरची माणसं थाटमाट करून आली तर गृहिणी त्याजवर रागावते. कारण तिच्या नवऱ्याला आपल्या उच्च कुलाचा अभिमान आहे आणि विपन्नावस्था आलेली असली तरी तिला त्याच्या अभिमानाचे रक्षण करावयाचे आहे. (गा. क्र. ३८) दरिद्री कुटुंबातल्या वधूने घरची परिस्थिती जाणून डोहाळे कुणाला सांगितले नाहीत. कानावर पडलेल्या भाऊबंधांच्या दुर्वचनाप्रमाणे तेही हृदयातच जिरवून टाकले. (गा. क्र.२९० ) पती दरिद्री असला व कुरूप असला तरी तो जसजसा म्हातारा होत जातो तसतसा कुलीन पत्नीला तो अधिकच प्रिय होतो. (गा. क्र. २९३) दुर्गतीला गेलेल्या कुटुंबातील गर्भिणी गृहिणीला कुणी विचारले की तुला कसले डोहाळे लागले आहेत ? तर ती फक्त पाणी मागते आणि पतीची विपन्नावस्था प्रकट होऊ देत नाही. (गा. क्र. ४७२) दारिद्र्य असले तरी पती स्वाधीन असण्यातच स्त्रीची श्रीमंती असते पण पती स्वाधीन नाही आणि पृथ्वीची श्रीमंती आहे तरीही ते दारिद्र्यच. (गा. क्र. ५१५) आपल्याला कधी मिळेल अशी कल्पनाही नव्हती, असे नवीन रंगीत लुगडे शेतकऱ्याच्या सुनेला मिळाले त्यामुळे ती इतकी फुगली की, ती अंगाने सडपातळ होती व गावातले रस्ते रुंद होते, तरी ती त्यात मावेनाशी झाली. (गा. क्र. २४१) धुम्ररहित अग्निगोलासारखे लकाकणारे आपल्या शामल पत्नीचे स्तन पाहताच गरीब शेतकऱ्याने ऐन हिवाळ्यात आपली उबदार पांघुरणे देऊन त्यांच्या मोबदल्यात बैल खरेदी केले (गा. क्र. २३८) रानात मुक्काम होता तेव्हा ओंडक्याच्या धागिने व खेड्यात आला तेव्हा गवताच्या शेकोटीने पथिकाचे थंडीपासून रक्षण केले. आता तो या नगरात आला आहे. आतापर्यंत तो आपल्या तडाक्यातून सुटल्यामुळे रागावलेली थंडी त्याला त्रस्त करीत आहे. (गा. क्र. ७७) मामी गावातल्या वडाखालच्या एकाच विहिरीचे पाणी उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने पाळीपाळीने मिळते. (गा. क्र. २९४) हिवाळा सुरू झालेला आहे तरी त्याच्यापाशी एकच वस्त्र आहे. तेही जीर्ण व मळकट झालेले आहे. शिवाय त्याच्या विरलेल्या तंतूंना सेणामातीचा वास येत आहे. यावरून दिसते आहे की, तो दरिद्री असला पाहिजे. (गा. क्र. ३२९ ) रखरखीत गवतातून जाताना त्याच्या अंगावर ओरखडे उठले. हिवाळ्यात पहाटे आचमनासाठी घेतलेल्या पाण्याने हात ओले करून त्याने रखरखीत झालेले आपले अंग मऊ केले. (गा. क्र. ३३०) पूर्वी कधीही न दिसलेला तळ्याचा तळ यंदाच्या उन्हाळ्याच्या कडकपणामुळे उघडा पडला आहे. त्यात नेहमी पुष्कळ चिखल असे. आता तोही वाळत आलेला असून मासे व कासवे तडफडत आहेत. हा काळाचा प्रभाव आहे. (गा. क्र. ४१४ ) उन्हाळ्यातल्या दुपारच्या कडक उन्हाने तापलेले अरण्यातील वृक्ष जणू त्यावरील कीटकांच्या अतिकर्कश स्वरांच्या रूपाने आक्रोश करीत आहेत. (गा. क्र. ४९४)”
दारिद्र्य आणि गरिबीविषयी इतके सर्वांगीण चिंतन आणि इतके सर्वांगीण दर्शन आपणाला आधुनिक कवितेतही पहावयास मिळणार नाही. दारिद्र्य भोगल्याशिवाय आणि आतून अनुभवल्याशिवाय त्याचा इतका प्रत्येयकारी अविष्कार शक्यच नाही, हे आपण सहज समजू शकतो. दुष्काळाचे आणि पाणीटंचाईचेही चित्रण इथे आलेले आहे. गरीबीत आपले डोहाळे पूर्ण होणार नाहीत म्हणून ती गरोदर स्त्री आपले डोहाळे कुणाला सांगतच नाही. आणि फार कुणी जवळच्या माणसाने प्रेमाने विचारले तर फक्त पाणी मागते, हे वाचले की आपले काळीज पिळवटून आल्याशिवाय राहत नाही. किती सूचक आणि कमी शब्दात गाथाकार गरिबी आणि दारिद्र्याचा प्रत्यय आणून देतात, हे पाहिले म्हणजे त्यांच्या प्रतिभेची चुणूक आपल्या लक्षात येते. उब देणारी पत्नी सोबतीला आल्यावर थंडीत पांघरायची सगळी पांघरूनं विकून तो कुणबीकीसाठी बैल विकत घेतो. यातला सूचक शृंगार आणि कुणबीकीचे महत्व या दोन्ही गोष्टी आपल्या अंगावर रोमांच उभे केल्याशिवाय राहत नाहीत. वाळत घातलेल्या कापडांच्या फाटक्या चिंध्यातून गळणारे पाणी म्हणजे साक्षात दारिद्र्याचेच आश्रू अशी कल्पना जेव्हा गाथाकार मांडतो, तेव्हा वाचक आतून हलल्याशिवाय राहत नाही.
अंगभर पुरेसे कपडे नसल्यामुळे शेतात राबतांना कपड्याऐवजी फाटणार्या शरीरावर आलेली रखरख घालवण्यासाठी ज्याच्याजवळ तेलही नाही असा शेतकरी पाणी लावूनच त्वचा मऊ करण्याचा प्रयत्न करतोय, हे वाचताना आपल्या मनावर ओरखडे उमटल्याशिवाय राहात नाहीत. उन्हाळ्यात बाभूळबनातल्या रानकिड्यांची किरकिर म्हणजे ऊन्हाविरुद्ध केलेला आक्रोश होय, असे गाथाकार म्हणतो, तेव्हा माझ्यासारख्याला बाभूळबनातलं उन्हातलं बालपण आठवल्याशिवाय रहात नाही. रानावनातला माणूस शहरात येतो, तेव्हा थंडी देखील त्याला उघडं पाडून त्याचा सूड घेतल्याशिवाय राहत नाही, असं वर्णन एका गाथेत वाचताना, शहर-गावातील आजची दरीच आपल्या नजरेसमोर येते. तेव्हा तर ही दरी आजच्या इतकी असह्य नव्हती. पण ती दरी अस्तित्वात होती हे या गाथेवरून आपल्या सहज लक्षात येते. गरीब शेतकऱ्याच्या मुलीला अलभ्य कपड्याचा, म्हणजे नव्या रंगीत लुगड्याचा, लाभ झाल्यावर तिचं रस्ताभरून ठुमकत राहणं हे तिच्या अभावग्रस्ततेचं प्रतीक म्हणावं लागतं. अशा कितीतरी दारिद्र्याच्या तऱ्हा इथे दिसतात.
आता काही पिकांच्या संदर्भातल्या गाथा आपण पाहूयात. तसे पुष्कळच पिकांचे संदर्भ सप्तशतीतल्या गाथांमधून येतात. त्यातल्या काही निवडक पिकांसंदर्भातल्या काही निवडक गाथा आपण पाहूयात. सुरुवातीला कापसाच्या संदर्भातली गाथा,
कपाशीच्या शेतात पेरणी सुरू करण्यापूर्वी नांगराची पूजा करताना मनोराथाच्या आवेगामुळे शेतकऱ्याच्या स्त्रीचा हात थरथरतो. (गा. क्र. १६५ )
या गाथेलाही संस्कृत अनुवादात शृंगारिक अर्थच चिकटवण्यात आलेला आहे. पुढं चालून वाढलेल्या कापसाच्या पिकात आपण आपल्या धन्यासोबत शृंगार करू, हा तिचा मनोरथ, असा अर्थ काढण्यात आला. पण शेतकरी स्त्रीला काय केवळ शृंगाराचेच मनोरथ असतात काय ? दुसरे काही मनोरथच नसतातच काय ? खरं तर कामाच्या रामरगाड्यात त्यांना कधी कधी शृंगाराची आठवणही येत नाही, रात्री कधी झोप लागून जाते तेही कळत नाही, अशा अर्थाची ३२४ क्रमांकाची एक गाथा आहेच. तरीही वरील गाथेतल्या मनोरथाला पुनःपुन्हा शृंगारिकच अर्थ कुणी देणार असेल तर राजारामशास्त्री भागवत म्हणतात तशी केवळ शृंगाराची कावीळच त्याला झालेली असावी, असे समजायला हरकत नाही. आता साळीचा संदर्भ असलेल्या काही गाथा आपण पाहूयात. साळीचे पीक तेव्हा जास्त प्रमाणात घेतले जात असावे. कारण साळीचे संदर्भ असलेल्या गाथांचे प्रमाण गाथा सप्तशतीमध्ये सर्वाधिक आहे. त्यातल्या या काही प्रतिनिधिक गाथा,
“चिखलाने माखलेले, पाण्याने भरलेले, गुडघ्याएवढे वाढलेले साळीचे शेत शेतकऱ्याला पोटच्या पोराप्रमाणे प्रिय वाटते. कारण पोटच्या पोराचेही अंग चिखलाने माखलेले असते, ते दुधावर वाढत असते, आणि गुडघ्यावर रांगत असते. (गा. क्र. ५६७) शरद ऋतूतले शुभ्र चांदणे काढलेल्या नव्या तांदळासारखे स्वच्छ दिसते. धान्याची समृद्धी झाल्यामुळे अशा चांदण्या रात्री गरीबसुद्धा स्वच्छंदाने गाणे गातात (गा. क्र. ६८९) गेल्यासाली साळीच्या शेताची राखण करणाऱ्या स्त्रीची पावले पाण्याच्या प्रवाहाच्या अवरोधामुळे वाकडी पडली. चालू हंगामात शेतकरी त्या अर्धवट उमटलेल्या तिरप्या आकृती नांगराने ओढलेल्या रेघांनी पुसून टाकतो. (गा. क्र. ६९०) वृषभा तू कोणालाही नकळत आडमार्गाने येऊन तांदूळ खातोस. आज मात्र तू परत जा. कारण मालक शेतावर राखणीला आहे. (गा. क्र. ९५२) साळीचे शेत पिकून पांढरे झाले म्हणून मान खाली घालून का रडतेय ? नटीने मुखाला हरिद्राच्या रंग लावून सज्ज व्हावे, त्याप्रमाणे तागाचे शेत नटले आहे म्हणून ?. (गा. क्र. ९) साळीच्या लोंब्यावरून दवाचे तुषार ठिबकत आहेत. परिणतावस्थेत आल्यानंतर दुष्टांची संगत भोगावी लागणार या भीतीने जणू त्यांनी माना खाली घातल्या आहेत. त्यांच्या अंगावर काटा आला आहे. आणि त्या अश्रू ढाळीत आहेत. (गा. क्र. ५६८)”
साळीच्या शेतावरच्या या गाथा वाचल्या की साळीच्या पिकावर इतक्या सुंदर कविता अख्या मराठी कवितेत पाहायला मिळत नाहीत. कोणताही शेतकरी शेतातल्या पिकावर जीवापाड माया करत असतो. पोटच्या पोरापेक्षाही जास्त जीव तो शेताला लावत असतो. इथल्या एका गाथेत गाथाकार तेच सांगतोय. शेतातल्या साळीच्या पिकाची आणि लेकराची तुलना करून तो हे दाखवून देतोय. समृद्ध पीक शेतात डोलू लागलं की गरीब माणसंही कशी आनंदाने डोलू लागतात, नाचू लागतात तेही एका गाथेत सांगितलेलं आहे. साळीच्या शेतात नांगर चालवताना शेतकरी किती बारकाव्याने काय काय करत असतो ते एका गाथेत सांगितलेलं आहे. तसंच पिकात घुसून नासाडी करणाऱ्या अडदांड बैलाला इशारा देणारा शेतकरीही एका गाथेत पाहायला मिळतो. पीक निघून जाताना शेतकरी उदास होतच असतो. पण दुसऱ्या पिकाची आसही त्याला उमेद वाढवायला पुरेशी असते. तीही एका गाथेत वाचायला मिळते. तर पुढे चालून उखळ आणि मुसळ या दृष्टांशी आपला संपर्क येणार म्हणून शेतात उभी असलेली साळ दवाच्या रूपात आज रडते आहे, अशी ही एक सुंदर कल्पना एका गाथेत वाचायला मिळते. या गाथेतील ही कल्पना वाचली की आपणाला, ‘पाहीसनी रे लोकाचे येवहार खोटे नाटे । तवा बोरी बाभईच्या आले अंगावर काटे’ या बहिणाबाई चौधरी यांच्या ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत.
एका गाथेत एक शेतकरी शेतात नांगरीत आहे. त्याची नवी नवरी त्याचं जेवण घेऊन येताना दिसल्यावर तो आऊत सोडतो. पण गडबडीत त्याने जुवाचं जोतं सोडण्याऐवजी बैलाची येसन सोडली आहे. (गा. क्र. ६९२) इथंही संस्कृत भाष्यकार त्याला श्रृंगाराचा संदर्भ जोडतात. पण भुकेने व्याकुळ झाल्यामुळेही असं होऊ शकतं, हे त्यांच्या लक्षात येत नाही.
एका गाथेत शेतातल्या बुजगावण्याला आपला पुरुष समजून मिठी मारणारी स्त्री येते. कारण बुजगावण्याला घरातल्याच पुरुषाचे कपडे घातलेले असतात. त्यामुळे अशी गफलत होऊ शकते (गा. क्र. ७४५) एका गाथेत एका बायको मेलेल्या शेतकऱ्याच्या मुलाला आपलं घर म्हणजे जणू काही धन काढून नेलेला खड्डा झालेलं आहे असं वाटतं (गा. क्र. ३७३)
जमीन कितीही खडकाळ असली तरी, नांगरणी करणारे हात बळकट असतील, तर ठिणग्या पडल्या तरी ती कसली जातेच. असंही गा. क्र. ७८९ मध्ये पाहायला मिळते. तर जमीन नांगरताना झालेल्या श्रमामुळे रात्री गाढ झोपेच्या स्वाधीन झालेला शेतकरीही एका गाथेत (गा. क्र. ३२४) पाहायला मिळतो. उन्हानं सुकलेलं आणि उंदरांनी कुरतडलेलं तिळाचं शेत पाहून दुःखी झालेली शेतकरी स्त्री गा. क्र. ७६३ मध्ये दिसते. नवरा बाहेरगावी गेलेला, सासू वेडी झालेली, राखणदार कुत्राही मरून गेलेला. अशा अवस्थेत रेड्यांनी रानात मांडलेला उच्छाद पाहून उद्वीग्न झालेली शेतकरी स्त्री गा. क्र. ५४९ मध्ये दिसते.
माहेराहून परत येताना पारध्याच्या स्त्रीला हत्तीने मांडलेल्या उच्छादाच्या खुणा दिसतात. तेव्हा तिला आपण विधवा झाल्याची शंका येते. कारण आपला नवरा जिवंत असताना हत्ती असा उच्छाद मांडू शकत नाही, याची तिला खात्री असते. (गा. क्र. १२१) धनुष्य छिलीत बसलेली, छिलके आभाळात उडालेली आणि काही ठिकाणी उत्तान रूपातली पारधी स्त्री काही गाथांमधून पाहायला मिळते. या गाथांमधील पारधीन पाहिली की भ. मा. परसवाळे यांच्या पारधीन कवितेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. परसवाळे यांच्या या कवितेवर त्या गाथांचा पुष्कळच प्रभाव पडलेला दिसतो. प्रवासाला गेलेला पती अनेक गाथांतून पाहायला मिळतो. पण भाष्यकार समजतात तसा हा पती युद्धावर किंवा व्यापारासाठीच बाहेर गेलेला असेल, असे काही नाही. तो पोट भरण्यासाठीही बाहेर पडू शकतो. कारण काही प्रवाशाच्या पत्नी पडझड झालेले घर आणि मुलांना सावरताना मेटाकुटीला आलेल्या दिसतात (गा. क्र. १७०)
जांभळाला पाहून दूर पळणारे, भुंगा चावलेले माकड एका गाथेत (गा. क्र. ५३१) येते. कारण त्याला जांभूळ भुंग्यासारखेच दिसते. खाजकुयरीमुळं परेशान झालेलं माकड पानातून लोंबकळणारा माकडीचा केसाळ हात पाहूनही घाबरतं. (गा. क्र. ५३२) तर मोहरीचा पाला खाल्लेलं पोट पिटीत या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणारं आणि सारखं खोकणारं माकडही एका गाथेत पाहायला मिळतं.
पाटलाच्या मृत्यूनंतर त्याचा लहान मुलगा गावाचे संरक्षण कसे करेल ? अशी चिंता वाटणाऱ्या गावकऱ्यांचे तो असे संरक्षण करतो की गावकरी आश्चर्यचकित होतात (गा. क्र. ६२८) तर एका गाथेत मृत्यूशय्येवर पडलेल्या पाटलांनी आपल्या पुत्राला मोठ्या कष्टाने अखेरचा संदेश दिला की, माझ्या नावामुळे तुला लाज येणार नाही असे वर्तन ठेव, असेही वाचायला मिळते. (गा. क्र. ६३४)
एकुणातच शेती आणि शेतकरी यांच्या विषयी गाथा सप्तशतीमध्ये पुष्कळच वाचायला मिळते. एवढेच की त्यावर चढलेला काळाचा सेवाळ बाजूला करावा लागतो. मी वर दाखवली ती गाथांची केवळ झलक आहे. जिज्ञासूंनी मूळ ग्रंथ अवश्य पहावा.
संदर्भ
१. हाल सातवाहनाची गाथा सप्तशती – संपादक स. आ. जोगळेकर, पद्मगंधा प्रकाशन, पुणे (२०१२)
२. संस्कृतीसंचित – दुर्गा भागवत, शब्द पब्लिकेशन्स, मुंबई (२०१५)
३. तिफनसाज – इंद्रजीत भालेराव, मनोविकास प्रकाशन, पुणे (२००८)
४. सेफालिका – सं. अरविंद मंगळूरकर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई (१९८४)
५. महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण – डॉ. श्री. व्यं. केतकर, पद्मगंधा प्रकाशन, पुणे (२०१२)
६. रसिक महाराष्ट्र – डॉ. रा. गो. चोथे, प्रा. शे. रा. चोथे, नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.