सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल या कादंबरीतून कोरोना रोगाच्या भीतीने भयभीत झालेली माणसे, क्वारंटाईन असलेली माणसे यातून कोरोना संकटाची भिषणता तसेच माणसांनी जंगलावर केलेले अतिक्रमण, प्राण्यांची केलेली बेसुमार शिकार याकडेही ही कादंबरी वाचकाचे लक्ष वेधते.
✍🏼 गुलाब बिसेन
“सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल” ही राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त साहित्यिक डाॅ. श्रीकांत पाटील यांची बालकादंबरी. या कादंबरीला २०२१ सालचा महाराष्ट्र शासनाचा बालवाड:मय पुरस्कार मिळाला आहे. कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे लाॅकडाऊन पडून माणसे घरात बंदिस्त झाली. बाजार, व्यापार, वाहतूक सगळं बंद पडलं. रस्ते सुनसान झाले. मानवी वस्त्या निर्जन झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. अशा अभूतपूर्व परिस्थितीत वन्य प्राणी सहलीच्या माध्यमातून मानवी वस्तीचा फेरफटका मारून त्यांच्या नजरेतून ‘सिमेंटच्या जंगलाचे’ अर्थातच ‘मानवी वस्तीचे’ दर्शन वाचकाला ही कादंबरी घडवते.
वन्य प्राण्यांनी समृद्ध अशा वनात प्राण्यांच्या पिलांची शाळा आहे. या शाळेमध्ये नलिनी चित्ते, सहदेव वानरे, विश्वजित वाघ, शोभा काळविटे, गाढव शिपाई असा स्टाफ असून सुजय हत्तीसर शाळेचे मुख्याध्यापक आहेत. या कादंबरीचे कथानक मानवी संवादातून फुलले असल्याने हे सर्व प्राणी एकमेकांशी माणसांप्रमाणे आपापसात बोलतात. या कादंबरीची सुरूवातच शाळेतून होते. वानर पोरे शाळेला दांडी मारून आपल्या पालकांसोबत मानवी वस्तीत जाऊन येतात. मुलांचा हालहवाल जाणून घेण्यासाठी वानरेसर वानरांच्या वस्तीवर जातात. तेव्हा त्यांना मानवी वस्तीतील परिस्थिती वानरांकडून समजते.
निर्मनुष्य रस्ते, मोकळी शिवारे, घरात बंदिस्त जनता,
मास्क वापरा – संसर्ग टाळा,
घरात राहा – कोरोनाला हटवा,
घरीच राहा – सुरक्षित राहा,
नियम पाळा – कोरोना टाळा
यासारख्या सूचना देत गावातून फिरणार्या गाड्या, शाळेत क्वारंटाईन असलेली माणसे अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेले सिमेंटचे जंगल आणि त्यात सहलीच्या निमित्ताने पहिल्यांदाच फेरफटका मारणारी जंगली जनावरे यांचा हा रंजक सहलीचा प्रवास बाल वाचकांना खिळवून ठेवणारा आहे. यात लेखकाने प्राण्यांचे संवाद रंजकतेतून आणि माणसांवर ओढवलेली परिस्थिती बालवाचकांनाही सहज समजेल अशी कादंबरीची मांडणी केली आहे.
मानवी हव्यासामुळे प्राण्यांच्या अधिवासावर झालेले अतिक्रमण असेल किंवा जंगलातील अन्नाची कमतरता भागवण्यासाठी असेल, प्राणी आणि मानव यांच्यांत नेहमी द्वंद्वाची परिस्थिती निर्माण झालेली दिसून येते. परंतु या कादंबरीत मात्र कोरोनामुळे लाॅकडाऊन पडलेल्या गावात प्राण्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक सुजय हत्तीसर सिमेंटचे जंगल बघायला सहल काढतात. एरवी माणसांना बघून घाबरून पळणारे प्राणी घरात बंदिवान झालेल्या माणसाची वस्ती बघण्यासाठी लाॅकडाऊनचा काळ सुवर्णसंधी समजून हौसेने सहलीला जातात. वानरेसर संपूर्ण सहलीचे नियोजन करतात. थांबायचे कुठे, न्याहारी कुठे करायची, विश्रांती कुठे किती वेळ घ्यायची याची आखणी ते करतात.
सहल गावाच्या दिशेने निघाल्यावर रस्त्यात प्राण्यांची पिल्ले आंबा – फणसाची, चिंच-जांभळाची न्याहारी करतात. मांसाहारी वाघाची पिल्ले ऊसाच्या फडाजवळील कुत्र्याच्या पिल्लांची शिकार करून न्याहारी करतात. परंतु तिथे त्यांना अडवायला कुणीही माणसं नसतात. विहिरीचं गार पाणी पिऊन प्राणी गावाकडे निघतात. गावातील चकचकीत रस्ते बघून सर्व प्राणी चकित होतात. गावातील मुख्य रस्त्याने सहल पुढे पुढे जात राहते. तेव्हा घरातील खिडक्यांतून डोकावून बघणारी माणसे प्राण्यांना दिसतात. यावेळी सर्व प्राणी मोबाईलने फोटो, सेल्फी काढण्याचा आनंद लुटतात. सहलीत प्राणी माणसांनी बांधलेले मंदिर, शाळा, कौलारू घरं, झोपड्या, बंगले, ग्रामपंचायत, दूध डेअरी, पतसंस्था, वाचनालय बघतात.
कोरोनाने त्रासलेल्या माणसाला दंगा करून अजून त्रास न देण्याचा वानरेसरांचा सल्ला सर्व वन्य प्राण्यांच्या स्वभावगुणाचे दर्शन घडवतो. गावातील वेगवेगळ्या प्रकारची घरे समाजातील विषमतेकडे बोट दाखवतात. वन्य प्राण्यांच्यात नसलेली गरीब-श्रीमंतांची दरी वन्य प्राणी सिमेंटच्या जंगलात प्रत्यक्ष बघतात. नेहमी प्राण्यांना घाबरवणारा माणूस कोरोनाने भयभीत झालेला आहे. प्रदूषित नदीतील पाणी न पिण्याचा वानरेसरांचा सल्ला माणसाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा आहे.
सिमेंटच्या जंगलात दिवसभर फेरफटका मारून प्राण्यांची सहल आपल्या जंगलात परतते. त्यानंतर परिपाठात शाळेतील प्राणी सहलीसंदर्भातील आपले अनुभवकथन करतात. यावेळी जंगलांवर अतिक्रमण केल्याने माणसांवर नाराज असलेले प्राणी आपला रागही व्यक्त करतात. शेवटी सहलीवर आधारित अनुभवकथन, निबंध लेखन, चित्र रेखाटन स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसे वितरणानंतर कादंबरीचा शेवट होतो.
या कादंबरीतून कोरोना रोगाच्या भीतीने भयभीत झालेली माणसे, क्वारंटाईन असलेली माणसे यातून कोरोना संकटाची भिषणता तसेच माणसांनी जंगलावर केलेले अतिक्रमण, प्राण्यांची केलेली बेसुमार शिकार याकडेही ही कादंबरी वाचकाचे लक्ष वेधते. सोबतच कोरोना या विषाणूमुळे माणूस आज जरी संकटात असला तरी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तो संशोधन करून, लस निर्मिती करून, औषध निर्मिती करून या संकटावर एक दिवस नक्की मात करेल हा आशावादही लेखकाने कल्पकतेने व्यक्त केला आहे. मुलांच्या भावविश्वात वावरणारे प्राणी, त्यांचे संवाद, स्वभाव गुण यांनी सजलेली ही सप्तरंगी बालकादंबरी बाल वाचकांना नक्की आवडेल यात शंका नाही.
पुस्तकाचे नाव – सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल (बालकादंबरी)
लेखक – डाॅ. श्रीकांत पाटील
प्रकाशन – हृदय प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठे – ६४
किंमत – २५० रू.