November 27, 2021
Home » निसर्ग अनुभवायलाच हवा
विश्वाचे आर्त

निसर्ग अनुभवायलाच हवा

कृत्रिम जगाला नैसर्गिक जगाची ओळख ही एखादा प्रकोप झाल्यानंतरच होते. त्सुनामी, भूकंप, प्रलय, महापूर अशा घटनांतून त्यांना निसर्गाची ओळख होते. निसर्ग त्यांना भयानक वाटू नये यासाठी निसर्गातील गोडी, चव चाखण्याचीही सवय त्यांना लावण्याची गरज भासणार आहे. अध्यात्म हे सुद्धा नैसर्गिक आहे. कृत्रिम नाही.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा ।

मुर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ।। 198 ।। अध्याय 3

ओवीचा अर्थ – किंवा ज्या प्रमाणे चंद्राचा उदय कावळ्यांच्या उपयोगी पडत नाही. त्याप्रमाणे हा विचार मुर्खांना रुचणार नाही.

चांदण्याचा स्वाद

चंद्राचा प्रकाश हा शीतल असतो. त्याचा त्रास होत नाही. त्यामध्ये दाहकता नसते. पूर्वी घराघरांत वीज नव्हती. अशावेळी रात्रीचा हा चंद्राचा शीतल प्रकाश हवाहवासा वाटायचा. पण आता चंद्र उगवतो कधी आणि मावळतो कधी हे सुद्धा लक्षात येत नाही. विजेच्या क्रांतीमुळे चंद्राचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. मानवाला आता त्याची गरज वाटत नाही. कृत्रिम पर्याय उपलब्ध झाल्याने आता नैसर्गिक गोष्टींचे अस्तित्व जाणवेणासे झाले आहे.

नैसर्गिक जिवंतपणा

तंत्रज्ञानाच्या प्रगती ही कृत्रिम आहे. यामुळे सगळे जीवनच कृत्रिम होत आहे.. भावनाही कृत्रिम होऊ लागल्या आहेत. स्तुतीही कृत्रिम वाटत आहे. यामध्ये जिवंतपणा वाटत नाही. जिवंतपणा हा नैसर्गिक असतो. अंतःकरणातून येतो. तो वरवरचा नसतो. कृत्रिम जिवंतपणा मात्र अद्याप संशोधकांना आणता आलेला नाही. कृत्रिम मानव त्यांनी तयार केला आहे. रोबोट तयार केला आहे. तो मानसाची सर्व कामे करू शकतो. पण त्याला भावना नाहीत. त्याला विचार नाही. त्याला मन नाही. नैसर्गिकपणा नाही. त्यामुळे नैसर्गिक चव काय असते हे नव्या पिढीला अनुभवता येत नाही. कृत्रिम जगाचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला आहे. नैसर्गिक जगाची ओळख नव्या पिढीला करून देण्याची गरज भासू लागली आहे. निसर्गाचा आस्वाद घ्यायला त्यांना शिकवावे लागणार आहे. इतकी ही नवी पिढी कृत्रिम होत आहे.

प्रकोपानंतरच निसर्गाची ओळख

कृत्रिम जगाला नैसर्गिक जगाची ओळख ही एखादा प्रकोप झाल्यानंतरच होते. त्सुनामी, भूकंप, प्रलय, महापूर अशा घटनांतून त्यांना निसर्गाची ओळख होते. निसर्ग त्यांना भयानक वाटू नये यासाठी निसर्गातील गोडी, चव चाखण्याचीही सवय त्यांना लावण्याची गरज भासणार आहे. अध्यात्म हे सुद्धा नैसर्गिक आहे. कृत्रिम नाही. आत्मज्ञान ही सत्‌ पुरुषांना मिळालेली निसर्गाची देणगी आहे. ही नैसर्गिक देणगी त्यांनी अभ्यासाने आत्मसात केली आहे. तसे निसर्गाचा स्वादही नव्यापिढीला आत्मसात करायला शिकवायला हवे. यामुळे निसर्गाचे भय त्यांच्यामध्ये राहणार नाही. निसर्ग जपण्यासाठी त्यांच्यामध्ये जागृती करण्याची गरज आहे.

नैसर्गिक गोडवा जपावा

संकरित बियाण्यामुळे आज नैसर्गिक गोडवा नष्ट झाला आहे. ती नैसर्गिक गोडी जपण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. उत्तम आरोग्यासाठी नैसर्गिकपणा जोपासायला हवा. कृत्रिम गोष्टी ह्या क्षणिक असतात. विजेची निर्मिती केली जाते. ही वीज क्षणिक आहे. त्याची निर्मिती बंद केल्यानंतर ती आपणास उपलब्ध होऊ शकत नाही. पण चंद्राचा प्रकाश हा नैसर्गिक आहे. कृत्रिम प्रकाशाची झापड डोळ्यावर आल्याने हा प्रकाश आता आपणास दिसेनासा झाला आहे. त्याची गोडीही मनाला भावत नाही. आत्मज्ञानाचेही असेच आहे. कृत्रिम ज्ञानाचा प्रभाव वाढल्यानेच नैसगिक आत्मज्ञानामध्ये रस वाटेनासा झाला आहे. यासाठी नैसर्गिक गोष्टींचा स्वाद नव्या पिढीस सांगायला हवा.

अनुभवानेच होते निसर्ग ओळख

चंद्राचा प्रकाशात पक्षी फारसे विहार करताना दिसत नाहीत. कारण या प्रकाशाचा त्यांना फारसा उपयोग होत नाही. रात्रीच्यावेळी ते घरट्यातच राहतात. चंद्राचा प्रकाश मात्र अधारात चाचपडत जाणाऱ्यांना उपयोगी पडतो. सध्या आपली अवस्था अशीच झाली आहे. चंद्राकडे पाहायलाच आपणाला वेळ नाही. कावळ्यासारखे आपण झालो आहोत. ही झापड आता दुर करायला हवी. निसर्गाचा स्वाद आपण घ्यायला शिकले पाहीजे. निसर्ग आपण जेव्हा अनुभवाला लागू तेव्हांच आपणाला निसर्ग आपलासा वाटेल. तेव्हाच त्याच्याविषयी आपणास प्रेम वाटेल. धकाधकीच्या जीवनात पैशाच्या मागे धावणाऱ्यांना कदाचित हा विचार पटणार नाही. पण निसर्गाचा स्वाद घेऊनच निसर्गाची ओळख होते. त्याची गोडी वाढते.

Related posts

भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां वोवियाफुले मोकळी । ( एकतरी ओवी अनुभवावी )

Atharv Prakashan

ज्ञानप्राप्तीसाठी जाणून घ्या अज्ञानी लक्षणे

Atharv Prakashan

फलसूचक कर्म…

Atharv Prakashan

Leave a Comment