July 27, 2024
Mira Utpat Tashi article on Sharad season
Home » रूपरम्य शरद
मुक्त संवाद

रूपरम्य शरद

या ऋतूतील ही आत्ताची निसर्गाची अनंत रूपं खरोखरच मनाला भुरळ पाडतात..मग कालिदासाच्या काळातील बहरलेला अम्लान निसर्ग त्याच्या कविमनाला साद घालत त्याच्या साहित्यातून उत्कटतेने प्रकट झाला त्यात नवल ते काय?.

मीरा उत्पात-ताशी
9403554167.

निसर्ग अमर्याद आहे.. त्याचं नित्यनूतन रूप मन मोहवून टाकतं.. प्रत्येक ऋतूची एक वेगळीच खासियत असते.. वेगवेगळे विभ्रम असतात.. सरत्या भाद्रपदात अश्विन मिसळूनच येतो. अत्यंत तरल सीमारेषा असते दोघांच्या मध्ये.. फारच सुंदर दिवस असतात हे.. पावसाच्या वर्षावाने पोसलेली, परिपक्व झालेली शेतं.. ओल्या पिकांचा, गवताचा वास हवेत भरून राहिलेला असतो.. पाऊस कमी होऊन सोनेरी पिवळ्या उन्हाचे दर्शन होतं.. आणि निसर्गाचं ऐश्वर्यसंपन्न रूप मन आणि डोळे सुखावून टाकतं..

कालिदासाने ऋतुसंहारात शरदाचं फार सुंदर वर्णन केलं आहे..

काशांशुका विकचपद्म मनोज्ञवक्रा।
सोन्मादहंसरूतनूपुरनादरम्या।
आपक्वशालिललितानतगात्रयष्टिः रूचिरानतगात्रयष्टिः।
प्राप्ताशरन्नववधूरिवरम्यरूपा।।

शरदाला त्याने धवलवस्त्र नेसलेली रूपरम्य नववधू म्हटले आहे..महामूर पाऊस पडून झाल्यावर गढुळपणा टाकून संथ झालेल्या नद्या. त्यात पोहणाऱ्या मासोळ्या. काठावरचे पक्षी.. तुडुंब भरलेली तळी..त्यात विहरणारे हंस.. स्वच्छ झालेले आकाश.. आकाशातील धवल चंद्र चांदणे असं मनमोहक निसर्ग चित्र रेखाटले आहे..

तो म्हणतो कारंडव पक्षांनी चोची पाण्यात बुडवल्याने नदीच्या लाटांच्या रांगा विदीर्ण झाल्या आहेत. काठाचा भाग कादंब, सारस पक्षांच्या थव्यांनी गजबजून गेला आहे. कमळाच्या परागांनी नदीचा काठ लालसर झालेला आहे आणि या नद्या हंसाच्या कलरवांनी गजबजलेल्या आहेत. त्यामुळे आजूबाजूचे लोक नद्यांकडे आकृष्ट होत आहेत… किती सुंदर वर्णन केलं आहे !! ऋतुसंहारातील सर्वोत्तम सर्ग म्हणजे शरद !!

कालिदासाच्या काळाइतका नसला तरी रम्य निसर्ग माझ्या भोवताली आहे.. त्याचं नित्यनूतन रूप मला नेहमीच भावतं.. माझ्या भाग्याने मी रहात होते आणि आता रहाते आहे त्या ठिकाणी तळी आहेत. त्यामुळे निसर्ग चित्रे जास्त रेखीव दिसतात.. राजाराम महाविद्यालयाच्या आवारात एक छोटीशी खण होती.. छोटंसं तळ्ंच म्हणाना!! एकदा याच ऋतूत पाऊस ओसरल्यावर फिरताना त्यात फुललेली असंख्य कमळं मला दिसली.. सूर्य अस्ताला जात होता. आकाश मनोहर रंगांनी रंगून गेले होते. मावळतीच्या सोनेरी पिवळ्या उन्हाचे प्रतिबिंब पाण्यावर पडले होते. फुललेली ताजी कमळं त्या सोनेरी किरणांनी न्हाऊन निघाली होती.. मी भान हरपून पाहतच राहिले.. ते दृश्य मी आजन्म विसरू शकणार नाही..

शिवाजी विद्यापीठाच्या माळावर रहायला आल्यावर याच ऋतूत एके सकाळी खूप दिवसांनी पडलेल्या कोवळ्या उन्हात समोर फुललेली असंख्य रानफुलं पाहून मी थक्कच झाले होते. निरनिराळ्या रंगांच्या फुलांची मैफिलच जमली होती..त्यात मध्यभागी असंख्य इवली इवली पांढरी शुभ्र फुलं फुलली होती..जणू काल रात्री चांदण्या आकाशात जायच्या विसरल्या.. इथेच थांबल्या.. आजूबाजूला घरं नव्हती तो पर्यंत असे फुलांचे फुललेले लांबच्या लांब गालिचे मन मोहवून टाकायचे.. आताही ते गालिचे आहेत..पण आकसले आहेत..

या दिवसात अजून एक सुंदर दृश्य म्हणजे अथांग पसरलेल्या हिरवाई वर थव्यांनी उतरणारे बगळे.. गर्भरेशमी हिरव्या गवतात हे पांढरे शुभ्र बगळे रांगोळीच्या ठिपक्यासारखे दिसतात.. आता दिवस लहान होतील..रात्र दीर्घ होईल..

तारागणप्रचुरभूषण मुद्वहन्ती।
मेधोपरोधपरिमुक्तशशांकवक्त्रा।
ज्योत्स्नादुकूलममलं रजनीदधाना।
वृद्धिंप्रयात्यनुदिनं प्रमदेवबाला।।

तारकापुंजांचे अनेक अलंकार धारण करणारी, मेघांच्या गराड्यातून मोकळी झालेली, शुभ्र चांदण्यांचे रेशमी वस्त्र परिधान करणारी निशा नुकत्याच तारूण्यात पदार्पण केलेल्या कन्येसारखी वाढत जाते. किती अचूक निरीक्षण.. सुंदर वर्णन!! कालिदासाच्या महान प्रतिभेला मनापासून दाद देत मी दररोज त्याच्या नजरेतून निसर्ग पाहते.. अगदी तसाच दिसतो..

या ऋतूतील ही आत्ताची निसर्गाची अनंत रूपं खरोखरच मनाला भुरळ पाडतात..मग कालिदासाच्या काळातील बहरलेला अम्लान निसर्ग त्याच्या कविमनाला साद घालत त्याच्या साहित्यातून उत्कटतेने प्रकट झाला त्यात नवल ते काय?.. त्यानं त्याचं यथार्थ वर्णन करून आपल्यालाही पाहण्याची एक वेगळी दृष्टी दिली….नाही का ?


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

कृषी क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत सरासरी वार्षिक वाढीचा दर 4.18 टक्के – आर्थिक पाहाणी अहवाल

नारळाच्या करवंटीपासून राखी…

जोतिबाच्या नावानं चांगभलं…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading