December 5, 2022
Worship by mind article by rajendra ghorpade
Home » शुद्ध अंतःकरणाच्या चौरंगावर गुरुमंत्राचे पुजन
विश्वाचे आर्त

शुद्ध अंतःकरणाच्या चौरंगावर गुरुमंत्राचे पुजन

अंतरंगातील पुजेचे महत्त्व हे यासाठीच जाणून घ्यायला हवे. साधनेत मानस पुजेला महत्त्व अधिक आहे. साहजिकच मनाच्या शुद्धतेला अधिक महत्त्व आहे. मनातील विचार देवासमोर धामडधिंगा करायचा असा असेल तर साधनेचे उद्दिष्ट कसे गाठता येईल. यासाठी प्राणप्रतिष्ठापणा, घटस्थापना का केली जाते हे विचारात घ्यायला हवे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

आता हृदय हें आपुलें । चौफळुनियां भलें ।
तरी बैसऊं पाउलें । श्री गुरूंची ।। १ ।। ज्ञानेश्वरी अध्यात्म १५ वा

ओवीचा अर्थ – आता आपल्या शुद्ध अंतःकरणाचा चौरंग करून त्यावर श्री गुरुंच्या पावलांची स्थापना करुं.

कार्याचा शुभारंभ करण्यापूर्वी प्राणप्रतिष्ठापणा किंवा नव्या घरात राहायला जाण्यापूर्वी तेथे घटस्थापना करण्याची परंपरा आहे. नवे कार्य नव्या संकल्पनेने केले जाते. बाह्यपुजा आणि अंतरंगातील पुजा या दोन्हींचा मिलाप यामध्ये असतो. पण हल्ली बाह्यपुजाच होताना पाहायला मिळते. अंतरंगातून पुजाच होत नाही. कार्याचे उद्दिष्ट्च नष्ट झाले आहे. मग फलप्राप्ती कशी होणार ? गणेशाची, देवीची प्रतिष्ठापना केली जाते अन् गणपती अन् देवीची आरास करण्यावरच जास्त खर्च केला जातो. देव सुंदर दिसावा यात काहीच दुमत नाही. पण बाह्य सौंदर्य अन् अंतरंगातील सौंदर्य समजून घ्यायला हवे. देवाला कशी व कोणती पुजा पसंत आहे हे विचारात घ्यायला हवे.

सदगुरुंच्याची पादुकांचे पुजन केले जाते. त्यांची समाधी विविध फुलांनी सजवली जाते. पण त्यांना काय अभिप्रेत आहे याकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणजेच बाह्यपुजेबरोबरच अंतरंगातील पुजाही तितकीच महत्त्वाची आहे. बाह्यपुजेतून अध्यात्मिक विकास होत नाही. यासाठी अंतरंगातील पुजा महत्त्वाची आहे. हे विचारात घ्यायला हवे. सध्या अंतरंगातील पुजेचा विचारच कोणी करत नाही. अशामुळे पुजेचा मुळ उद्देशच बाजूला राहीला आहे.

अंतरंगातील पुजेचे महत्त्व हे यासाठीच जाणून घ्यायला हवे. साधनेत मानस पुजेला महत्त्व अधिक आहे. साहजिकच मनाच्या शुद्धतेला अधिक महत्त्व आहे. मनातील विचार देवासमोर धामडधिंगा करायचा असा असेल तर साधनेचे उद्दिष्ट कसे गाठता येईल. यासाठी प्राणप्रतिष्ठापणा, घटस्थापना का केली जाते हे विचारात घ्यायला हवे. मनातील विचार शुद्ध असतील तर मन त्या पुजेच्या क्रियेत शुद्ध राहील. शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध विचाराने केलेल्या पुजेतून मनाची स्वच्छता होते. मन शुद्ध होते. साधनेसाठी मनाची शुद्धता गरजेची आहे. तरच साधनेतून फलप्राप्ती होणार आहे.

सार्वजनिक उत्सवांचा उद्देशच मुळात अन्य असतो. त्यामुळे अशा उत्सवातून अध्यात्मिक विकास साधने अशक्यच आहे. आपणाला अध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर स्वतःच्या मनाचा विकास प्रथम करायला हवा. सदगुरुंच्या पुजेसाठी स्वतःच्या मनाची स्थिती शुद्ध ठेवायला हवी. अंतःकरण शुद्ध असेल तर पुजेतून मिळणारा आनंद मनाला शांती, समाधान देतो. पुजेसाठी चौरंग लागतो. हा चौरंग कसा असावा ? बाह्य अन् अंतरंगातील चौरंग हा शुद्ध असावा. शुद्ध अंतःकरणाच्या, शुद्ध विचारांच्या या चौरंगावर सदगुरुंच्या पादुकांची प्रतिष्ठापना करायची आहे. सदगुरुंनी दिलेल्या मंत्राने पुजन करायचे आहे. साधनेसाठी शुद्ध मनाची तयारी व्हावी हा या मागचा उद्देश आहे. स्थिर मनाने साधनेत रमता येते. या शुद्धतेतूनच शुद्ध आत्मज्ञानाची अनुभुती येते.

धकाधकीच्या जीवनात हे कसे शक्य आहे ? हा प्रश्न सर्वांनाचा पडतो. आपणास आजचे जीवन धकाधकीचे वाटते. पूर्वीच्या काळीही असेच धकाधकीचे जीवन होते. जीवन जगण्याचा संघर्ष हा सर्वांच्याच वाट्याला आला आहे. तो पूर्वीही होता व आत्ताही आहे. पूर्वी नसता तर त्याकाळात युद्ध कला विकसित झाली नसती. फक्त काळानुसार त्यामध्ये बदल झालेला आहे. जीवनाचा संघर्ष हा कायमच आहे. या संघर्षमय जीवनात आपण मनावर विजय मिळवून प्रगती साधायची आहे. तरच जीवनात यशस्वी होऊ.

Related posts

सो ऽ हमभाव आहे तरी काय ?

संप्रेरकांच्या मदतीने उत्तम वाढ, भरघोस उत्पादन

वाटाड्या अन् रक्षक सदगुरु…

Leave a Comment