February 22, 2025
Namdev Dhasal birthday special article
Home » भारतीय साहित्याचे निर्माते – नामदेव ढसाळ
मुक्त संवाद

भारतीय साहित्याचे निर्माते – नामदेव ढसाळ

१५ फेब्रुवारी… नामदेव ढसाळ यांचा जन्मदिवस ! यानिमित्त हे स्मरण…

विष्णू पावले

भारतीय साहित्यातील एक प्रमुख कवी म्हणून नामदेव ढसाळ (१९४९-२०१४) यांची ओळख आहे. त्याचबरोबर राजकीय-सामाजिक चळवळीतील एक लढवय्या कार्यकर्ता, साठोत्तर साहित्यातील, लघुनियतकालिक चळवळीतील अग्रगण्य म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कर्तेपणाची, साहित्यविषयक कामगिरीची, विचारविश्वाची यथार्थ नोंद प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी घेतली आहे. ‘भारतीय साहित्याचे निर्माते – नामदेव ढसाळ’ हा अभिनिबंध (Monograph) नुकताच साहित्य अकादमी, नवी दिल्लीकडून प्रकाशित झाला आहे.

‘प्रास्ताविक’, ‘व्यक्तिमत्त्वाची जडणघडण आणि कार्य’, ‘कविताविश्व’, ‘कादंबरीलेखन’, ‘गद्यलेखन’, ‘उपसंहार’ आणि ‘परिशिष्ट’ अशी एकूण या अभिनिबंधाची मांडणी आहे. विषमतायुक्त गावगाडा ते आंबेडकरी जाणिवेचे काव्य व्हाया महानगर अशी साठोत्तर काव्यपरंपरेत विस्तारदृष्टी असणारे नामदेव ढसाळ ‘कवी’ म्हणून ‘संस्कृतिचिंतक’ होते. ढसाळ यांच्या चिंतनाचा वाढता पैस शिंदे यांनी समोर आणला आहे. यासाठी ‘उत्क्रांतशील विचारविश्व’ असा शब्दप्रयोग त्यांनी केला आहे.

ढसाळ यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीमागे आवतीभोवती लोककलांचा वारसा होता. श्रमसंस्कृतीतील उपासक कलावंत होते. समृद्ध असा गोतावळा होता. अभावाच्या परिस्थितीने त्यांना घडवले होते. त्यांचे वाचन विविधांगी परंतु अफाट होते. त्यांनी विविध भाषांमधले विचारप्रवाह समजून घेतले होते. त्यांची तत्त्वदर्शने आणि वाङ्‌मय-कलाविषयक जाणीव निराळी होती, अशा दृष्टीने शिंदे यांनी वेध घेतला आहे. ‘नामदेव ढसाळ यांचे लेखन समाजशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्यांच्या लेखनास इतिहासकथनाचे स्वरूप लाभले आहे.’ गद्याविषयी असे निरीक्षण शिंदे यांनी नोंदविले आहे.

विशेषतः ‘कृतज्ञतागुणगान’, ‘मनोगतकविता’, ‘श्रमसंस्कृतीची कैवारजाणीव’ अशा शब्दकळेने हे लेखन फुलले आहे. यातील ‘कविताविश्व’ हे प्रकरण तर ढसाळ यांच्या कवितेची अनेक वैशिष्ट्यं सांगणारे आहे. मानवमुक्तीचा सर्वंकश विचार करणारे, लोककल्याणाची उदात्त भावना असणारे नामदेव ढसाळ कवी आणि माणूस म्हणून थोर होते. या थोर व्यक्तिमत्त्वाची ओळख या अभिनिबंधामधून होते.

ढसाळ यांच्या कवितेतून प्रकटते सर्व तऱ्हेच्या विषमतेविरूद्ध द्रोहाची जाण 

नामदेव ढसाळ (1949-2014) यांची एका श्रेष्ठ कवीबरोबर, राजकीय, सामाजिक चळवळीतला झुंजार कार्यकर्ता आणि नेता म्हणून ओळख आहे. त्यांनी कवितेबरोबरच कादंबरी आणि गद्यलेखन केले. ढसाळ यांच्या कवितेने जात आणि वर्ग जाणिवांचा सखोल आणि सर्वांगीण आविष्कार घडविला. त्यांनी राजकीय कविता लिहिली. स्त्री विषयक उन्नतभावाची चित्रे रेखाटली. ती नर-नारीच्या समतेची आणि विश्वबंधूतेची आहे. वंचित आणि आंबेडकरी समूहाच्या अपरिचित अनुभव प्रदेशाचे निर्भिड चित्र रेखाटले. त्यांच्या कवितेत मानवतावादाचा विशाल आणि व्यापक पट सामावला आहे. ढसाळ यांच्या कवितेतून सर्व तऱ्हेच्या विषमतेविरूद्ध द्रोहाची जाण प्रकटली.

ढसाळ यांच्या कवितेने इतिहास आणि परंपरेकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. सर्वहारा वर्गाचे दुःख आणि शोषणाची अस्वस्थचित्रे रेखाटली. आंबेडकरी जीवनदृष्टी, चिंतनशीलता, काव्यात्मता, विद्रोही काव्यभाषा, दीर्घकविता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृतज्ञतागुणगान व मनोगतकविता ही ढसाळ यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत.

ढसाळ यांच्या प्रज्ञेची झेप विलक्षण होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या काव्यशैलीत कमालीची विविधता आणि रूपसंपन्नता आणली. नागर, ग्रामीण, प्रदेश बोली व व्यक्ती बोलीचा नवा सहजाविष्कार घडविला. कवितेचा रूपबंध खुलो, लवचिक आणि प्रसरणशील करण्यात ढसाळ यांच्या कवितेचा महत्त्वाचा वाटा आहे. या गुणांमुळे त्यांची कविता भारतीय परंपरेतील श्रेष्ठ कविता ठरते.

नामदेव कोळी

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading